भूदान चळवळीचे प्रणेते – आचार्य विनोबा भावे

भूदान चळवळीचे प्रणेते – आचार्य विनोबा भावे

आचार्य विनोबा भावे

भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि भूदान चळवळीचे प्रणेते म्हणून आचार्य विनोबा भावे यांना ओळखले जाते. भारताचे राष्ट्रीय शिक्षक आणि महात्मा गांधी यांचे अध्यात्मिक उत्तराधिकारी असेही त्यांना म्हटले जाते. आज त्यांची जयंती. ११ सप्टेंबर १८९५ रोजी रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. १९०३ मध्ये त्यांचे कुटुंब बडोद्याला स्थलांतरित झाले. त्यामुळे बडोद्यालाच त्यांचे बालपण गेले. आजोबा आणि आईकडून विनोबांना बालपणीच धर्मपारायणतेचे संस्कार मिळाले. लहानपणीच त्यांच्यावर भगवद्गीता, महाभारत, रामायण यांचा प्रभाव पडला. तिसरी पर्यंतचे त्यांचे शिक्षण त्यांचे काका गोपाळराव यांच्याच घरी झाले. त्यानंतर बडोद्यात इंग्रजी शाळेत त्यांनी चौथीमध्ये प्रवेश घेतला. त्यांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले.
२५ मार्च इ.स. १९१६ मध्ये गृहत्यागाचा संकल्प केलेल्या विनोबा भावे यांनी इंटरची परीक्षा देण्यानिमित्त मुंबईला निघाले; पण आई-वडिलांना न सांगताच सुरतला उतरून त्यांनी वाराणसी गाठली. वाराणसी येथील हिंदू विश्वविद्यालयात एके दिवशी गांधीजींचे भाषण झाले. या भाषणाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. गांधीजींशी पत्रव्यवहार करून कोयरब आश्रमात त्यांनी गांधीजींची भेट घेतली. या ठिकाणीच विनोबांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा घेतली होती. एवढेच नाही तर आजन्म त्यांनी प्रतिज्ञेचे पालन केले. गांधीजींच्या परवानगीनेच वाई येथे त्यांनी वेदांताचे अध्ययन केले. १९२१ मध्ये जमनालाल बजाज यांनी वर्धा येथे सत्याग्रह आश्रमाची शाखा सुरू केली. त्या शाखेचे संचालक म्हणून महात्मा गांधीजींनी विनोबा भावे यांची निवड केली. त्यामुळे विनोबा भावे यांची वर्धा येथे रवानगी करण्यात आली. या ठिकाणीच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. वर्धा येथील आश्रमात विनोबा भावे दररोज सात ते आठ तास सूत कातणे, विणणे आणि शेतीकाम करत. प्रत्येक व्यक्तीने नियमीत शरीरश्रम करावे असे त्यांनी दिलेला सिद्धांत सांगतो. शरीर श्रमाबरोबर मानसिक आणि अध्यात्मिक साधनेकडेसुद्धा त्यांनी लक्ष दिले होते. इ. स. १९३० आणि इ. स. १९३२ मध्ये सविनय कायदेभंगाच्या चळवळीत आचार्य विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात कारावासाची शिक्षा भोगली. या कारागृहातच त्यांनी सुप्रसिद्ध गीताप्रवचने दिली. १९४० च्या वैयक्तिक सत्याग्रहाच्या आंदोलनासाठी महात्मा गांधीजींनी विनोबा भावे यांची पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून निवड केली. १० ऑक्टोबर १९४० रोजी विनोबांनी पवनार या ठिकाणी युद्धविरोधी भाषण केले. अशाप्रकारे भाषणस्वातंत्र्याचा हक्क बजावत त्यांनी पहिला वैयक्तिक सत्यागृह केला. यावेळीही त्यांना अटक होऊन तीन महिन्यांची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा १७ जानेवारी १९४१ रोजी विनोबा भावे यांनी सेवाग्राममधून सत्याग्रह केला. त्यामुळे त्यांना पुन्हा अटक होऊन एका वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली. ८ ऑगस्ट १९४२ रोजी गांधीजींनी मुंबईत ब्रिटिशांना ‘चले जाव’ चा इशारा दिला. सरकारने तत्काळ राष्ट्रीय नेत्यांची धरपकड केली. यावेळी विनोबांनासुद्धा अटक होऊन तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला सामोरे जावे लागले. त्यानंतर जुलै १९४५ मध्ये तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी स्वतःला हरिजनविषयक कामाला वाहून घेतले. ग्राम विकास मंडळ, महारोगी सेवा मंडळ आदी मंडळांची स्थापना करून विनोबा भावे यांनी ग्रामसेवेसह कुष्ठरुग्णांची सेवा केली. १८ एप्रिल १९५१ रोजी पोचमपल्ली या ठिकाणी ८० दलित कुटुंबियांशी विनोबा भावे यांनी संवाद साधला. पोचमपल्लीतील रामचंद्र रेड्डी या सधन शेतकर्‍याने शंभर एकर जमीन दान करण्याचे जाहीर केले. येथूनच विनोबा भावेंच्या भूदान चळवळीला प्रारंभ झाला. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारत फिरून लोकांना त्यांच्या जमिनीचा १ड़६ वाटा भूमिहीन शेतकर्‍यांना देण्यास प्रवृत्त केले. भूदानासाठी निघालेली पदयात्रा तब्बल १३ वर्ष ३ महिने आणि ३ दिवस चालली. या यात्रेत जवळपास ८० हजार किलोमीटरचे अंतर कापून शेकडो एकर जमीन मिळवली. त्यानंतर १९५४ मध्ये विनोबांनी ग्रामदान चळवळ सुरू केली. या चळवळीत त्यांनी संपूर्ण गावच दान करण्याचे आवाहन केले. या चळवळीत त्यांना जवळपास एक हजार गावे दानरुपात मिळाली. भारत भ्रमणाच्या कालावधीत विनोबांनी आश्रमांची स्थापना केली. समन्वय आश्रम (बोधगया), ब्रह्मविद्या मंदिर (पवनार), प्रस्थान आश्रम (पठाणकोट), विसर्जन आश्रम (इंदूर १९६०), मैत्री आश्रम (आसाम १९६२) आणि वल्लभ निकेतन (बंगलोर १९६५) हे सहा आश्रम त्यांनी स्थापन केले. विनोबा म्हणत की, १३ वर्षात मी संपूर्ण भारतभ्रमण केले. यावेळी स्थापन केलेले ६ गांधी आश्रम ही गोष्ट चिरकाल टिकणारी आहे. ७ ऑक्टोबर १९३० रोजी विनोबांनी गीताई लिहिण्यास प्रारंभ केला. ६ फेब्रुवारी १९३१ रोजी त्यांनी गीताईचा अखेरचा चरण लिहिला. त्यांनी गिताईचे ७०० श्लोक लिहिले. विनोबाजींनी २०० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. आयुष्यभर विनोबाजी अहिंसा तत्त्वाचे पुरस्कर्ते राहिले. हे विज्ञानयुग आहे, या विज्ञानाची अध्यात्माशी निरंतर जोड घातली, तर मनुष्यजातीचा उद्धार होईल ही शिकवण त्यांनी दिली. १९५८ साली समाज नेतृत्वासाठी दिलेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे विनोबा भावे पहिले मानकरी ठरले. १९८३ रोजी त्यांच्या कार्याची दखल घेत विनोबा भावेंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

First Published on: September 11, 2019 6:36 AM
Exit mobile version