आद्य इतिहास संशोधक : चिं.वि. वैद्य

आद्य इतिहास संशोधक : चिं.वि. वैद्य

चिंतामण विनायक वैद्य हे संस्कृत भाषेतील विद्वान होत. ते एक थोर ज्ञानोपासक, महाभारत-रामायणाचे संशोधक – मीमांसक व चतुरस्र ग्रंथकार होते. संस्कृत भाषेच्या व्यासंगामुळे त्यांनी रामायण-महाभारतासारख्या पौराणिक इतिहासाच्या अनेक अपरिचित भागांवर प्रकाश टाकला. आज त्यांची जयंती. १८ ऑक्टोबर १८६१ मध्ये कल्याणमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विनायकराव हे वकील होते. ते कल्याणमध्येच वकिली करत. कल्याण तसेच मुंबईच्या एल्फिन्स्टन स्कूल व एल्फिन्स्टन कॉलेजात चिंतामणरावांचे शिक्षण पार पडले. १८८२ मध्ये एम.ए.ची पदवी मिळवल्यानंतर १८८४ मध्ये त्यांनी एल.एल.बी.ची पदवी संपादित केली. त्यानंतर कोल्हापूरमधील शिरोळ येथे त्यांनी काही काळ मुनसफ म्हणून नोकरी केली. त्यानंतर ठाण्याच्या कोर्टात वकील म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर उज्जैन येथे न्यायाधीश पदावर ते रुजू झाले. १८९५ ते १९०४ या कालावधीत त्यांनी ग्वाल्हेरच्या सरन्यायाधीशपदाची जबाबदारी पार पाडली. १९०५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी लोकमान्य टिळकांसोबत राष्ट्रीय कार्यात स्वतःला वाहून घेतले. कोलकाता, सुरत आदी ठिकाणी काँग्रेसच्या अधिवेशनांना ते टिळकांसोबत गेले. टिळकांच्या निधनानंतर त्यांनी महात्मा गांधीजींसोबत कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी निष्ठेने आणि आस्थेने राष्ट्रीय शिक्षणाचे कार्य केले. काही कालावधीनंतर चिंतामणरावांनी राजकारण सोडले. १८८९ ते १९३४ या कालावधीत वैद्यांनी विपुल लेखन केले. केसरी, विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन आदी नियतकालिकांमधून त्यांचे स्फुटलेखन प्रसिद्ध झाले. त्यांचे एकूण २९ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यामध्ये ९ इंग्रजी आणि २० मराठी ग्रंथांचा समावेश आहे. महाभारत – ए क्रिटिसिझम (१९०४), संक्षिप्त महाभारत (१९०५), रिडल ऑफ रामायण (१९०६), अबलोन्नतिलेखमाला (१९०६), एपिक इंडिया (१९०७), मानवधर्मसार -संक्षिप्त मनुस्मृति (१९०९), दुर्दैवी रंगू (१९१४), श्रीकृष्ण चरित्र (१९१६), महाभारताचा उपसंहार (१९१८), हिस्टरी ऑख मिडिव्हल हिंदु इंडिया ( ३ खंड, १९२१, १९२४ व १९२६), संस्कृत वाङ्मयाचा त्रोटक इतिहास (१९२२), मध्ययुगीन भारत (तीन खंड, १९२५), गझनीच्या महमूदाच्या स्वार्‍या (१९२६), ए हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचर (१९२६), वैद्यांचे ऐतिहासिक निबंध (१९३१), शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा स्वराज (१९३१), हिंदू धर्माची तत्त्वे (१९३१), महाभारताचे खंड – सभापर्व, विराटपर्व, उद्योगपर्व (१९३३-३५), संयोगिता नाटक (१९३४) हे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी काही ग्रंथ आहेत. चिं.वि. वैद्यांच्या ‘महाभारत ए क्रिटिसिझम’ या इंग्रजी ग्रंथावर लोकमान्य टिळकांनी केसरीतून सलग आठ अग्रलेख लिहिले. याद्वारे चिं.वि. वैद्य यांच्या ग्रंथांची मौलिकता स्पष्ट होते. त्यानंतर टिळकांनी आणखी एक अग्रलेख लिहीत रिडल ऑफ रामायण या ग्रंथाचे परीक्षण केले. वैद्यांनी महाभारताच्या संदर्भात एपिक इंडिया व श्रीकृष्ण चरित्र हे ग्रंथ लिहिले. मानवधर्मसार व हिंदू धर्माची तत्त्वे या मानवधर्मसार व हिंदू धर्माची तत्त्वे या दोन पुस्तिकांतून वैद्यांचे हिंदुधर्मविषयक विचार व्यक्त झाले आहेत. वैद्यांनी प्राचीन व मध्ययुगीन भारतीय इतिहासावर विविधांगी व प्रचंड संशोधन करून ग्रंथलेखन केले. त्यांपैकी ‘हिस्टरी ऑफ मिडिव्हल हिंदु इंडिया’ या ग्रंथाचे तीन खंड त्यांनी प्रथम इंग्रजीत लिहिले आणि त्यानंतर त्याचा तीन-खंडी मराठी अनुवाद ‘मध्ययुगीन भारत’ या नावाने प्रसिद्ध केला. याशिवाय ‘गझनीच्या महमूदाच्या स्वार्‍या’ आणि ‘शिवाजी द फाऊंडर ऑफ मराठा स्वराज’ हे त्यांचे दोन अन्य इतिहासविषयक ग्रंथ होत. १९०८ मध्ये पुणे येथे भरलेल्या सहाव्या मराठी साहित्य (ग्रंथकार) संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. २० एप्रिल १९३८ रोजी त्यांचे निधन झाले.

First Published on: October 18, 2019 8:14 AM
Exit mobile version