मराठी चित्रपटातील पहिला सुपरस्टार

मराठी चित्रपटातील पहिला सुपरस्टार

डॉ. काशीनाथ घाणेकर

पेशाने दंतवैद्यक असणारे डॉ. काशीनाथ घाणेकर यांनी अभिनय कलेच्या जोरावर मराठी-हिंदी रंगमंचासह चित्रपटसृष्टी गाजवली. १९६० ते १९९० या काळातील ते मराठीतील पहिले सुपरस्टार होते. शनिवार, १४ सप्टेंबर त्यांचा जन्मदिवस. १४ सप्टेंबर १९३२ रोजी रत्नागिरीतील चिपळूण येथे त्यांचा जन्म झाला. या ठिकाणीच त्यांचे सर्व शिक्षण पार पडले. डॉ. काशिनाथ घाणेकर व्यवसायाने दंत शल्यचिकित्सक होते. स्त्रीरोगतज्ज्ञ इरावती कर्णिक या काशीनाथ घाणेकर यांच्या पहिल्या पत्नी. त्यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर काशीनाथ घाणेकरांनी अभिनेत्री सुलोचनाबाईंच्या कन्या कांचन लाटकर यांच्याशी विवाह केला.
१९६० ते १९८० या कालावधीत मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार ठरलेले डॉ. काशीनाथ घाणेकर त्या काळात सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातील संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे घाणेकरांना अफाट लोकप्रियता मिळाली. अंगकाठी नसूनही केवळ जरब बसवणारे डोळे, उत्भेदक अभिनय आणि आवाज या हुकमी अस्त्रांवर त्यांनी साकारलेले संभाजी महाराज बघताना अंगावर शहारे येत असत. डॉ. काशीनाथ घाणेकर अभिनीत ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे नाटक तेव्हा कमालीचे गाजले. त्यामुळे संभाजी महाराज म्हटले की डॉ. काशीनाथ घाणेकर असेच समीकरण झाले होते. या नाटकाशिवाय त्यांनी इतर अनेक नाटकांमध्ये उत्तम अभिनय केला. यामध्ये लेखक वसंत कानेटकर लिखित ‘अश्रूंची झाली फुले’, ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकांसह ‘आनंदी गोपाळ’, ‘गारंबीचा बापू’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘मधुमंजिरी’, ‘शितू’ आणि ‘सुंदर मी होणार’ आदी नाटकांमध्ये डॉ. काशीनाथ घाणेकरांनी कमालीचा अभिनय केला. रंगमंचावरील भूमिकांमुळे नाटक गृहात प्रेक्षकांना शिट्टी वाजवण्यास डॉ. काशीनाथ घाणेकरांनी भाग पाडले. नाटक रंगमंचावर पहिली शिट्टी पडली ती डॉ. काशीनाथ घाणेकर यांना.
१९६८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मधुचंद्र’ या मराठी चित्रपटातील भूमिकेनंतर डॉ. काशीनाथ घाणेकर एक मोठे चित्रपट स्टार झाले. राजदत्त दिग्दर्शित एन. दत्ता यांचे संगीत असलेल्या या चित्रपटातील सर्व गाणी लोकप्रिय झाली. त्याबरोबरच या चित्रपटातील डॉ. काशीनाथ घाणेकर आणि उमा यांच्या प्रमुख भूमिकासुद्धा गाजल्या. ‘मराठा तितूका मेळवावा’, ‘पाहू किती रे वाट’, ‘एकटी’, ‘झेप’, ‘देवमाणूस’, ‘पाठलाग’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘सुखाची सावली’, ‘धर्मपत्नी’, ‘पडछाया’, ‘लक्ष्मी आली घरा’, ‘प्रीत शिकवा मला’, ‘मानला तर देव’, ‘घर गंगेच्या काठी’, ‘अन्नपूर्णा’, ‘चंद्र होता साक्षीला’, ‘अजब तुझे सरकार’ यांसारख्या मराठी चित्रपटांमधील भूमिकांमुळे डॉ. काशीनाथ घाणेकर प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले होते. मराठीप्रमाणेच डॉ. काशीनाथ घाणेकर यांनी ‘दादी माँ’ आणि ‘अभिलाषा’ या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले होते.
पेशाने डॉक्टर असूनही डॉ. काशीनाथ घाणेकर यांचे अभिनय कलेवर नितांत प्रेम होते. त्यामुळेच ते सुपरस्टार झाले. २ मार्च १९८६ रोजी अमरावती शहरात नाटकाच्या प्रयोगादरम्यान काशीनाथ घाणेकर यांना हृदयविकाराचा झटका आला. प्रयोगानंतरच काही वेळातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी लेखिका कांचन घाणेकर यांनी ‘नाथ हा माझा’ या पुस्तकात स्वतःच्या वैवाहिक सहजीवनाबाबत लिहिले आहे. काशीनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर ‘आणि.. डॉ. काशीनाथ घाणेकर’ नावाच्या चित्रपटाचीसुद्धा निर्मिती करण्यात आली होती. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे यांनी डॉ. काशीनाथ घाणेकर यांची प्रमुख भूमिका केली होती.

First Published on: September 14, 2019 6:35 AM
Exit mobile version