भाजपचा भस्मासूर आणि अगतिक शिवसेना!

भाजपचा भस्मासूर आणि अगतिक शिवसेना!

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिवसेनेचा 53 वा वर्धापनदिन तीन दिवसांपूर्वी पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आमचं ठरलंय… एका युतीची ही दुसरी गोष्ट आहे… असे जाहीर केले. छान झाले. महाराष्ट्राच्या तमाम जनतेने ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ हे नाटक पाहण्याऐवजी फडणवीस आणि उद्धव यांचे एक अंकी नाटक पाहिले… डोळे भरून आले, ओठ थरथरू लागले आणि काळजाचे ठोके काही म्हणता थांबायला तयार नव्हते. ते आता लिहीत असतानाही थांबायचे नाव घेत नाहीत. शिवसेनेच्या वर्धापनदिनी दुसर्‍या पक्षाचा राज्याचा प्रमुख येणे, असा इतिहासाला साक्षी ठेवण्याचा सोहळाही या निमित्ताने पार पडला.

वर, प्रसार माध्यमांना दोन सुनवायला मुख्यमंत्र्यांनी कमी केले नाही… आम्ही पत्रकारांना फार किंमत देत नाही. त्यांनी काय लिहायचे आणि काय बोलायचे ते बोलू दे. आम्ही त्याची पर्वा करत नाही. एक बरे आहे, जसे वर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात, तसेच खाली देवेंद्र गातात… आमच्या दृष्टीने पत्रकार महत्त्वाचे नाहीत, हे तर मोदींनी 2014 साली सत्ता हाती घेतल्यानंतरच दाखवून दिले होते. आता संविधानला शपथविधीवेळी वाकून नमस्कार करणे वेगळे (कॅमरे सुरू आहेत आणि सारा देश बघतोय हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवून) आणि संविधानाचा मान राखणे वेगळे आहे तसेच पत्रकारांना किंमत देण्यासारखे आहे. आपल्या भक्त पत्रकारांना जवळ करून प्रश्न विचारणार्‍या पत्रकारांच्या पोटावर पाय आणण्यासारखी ही कूटनीती आहे. जी प्रसारमाध्यमांची हालत तीच प्रादेशिक पक्षांची अवस्था भाजपरुपी भस्मासूर करत सुटलाय. ज्याच्या डोक्यावर हात ठेवायचा त्याला भस्म करून टाकायचे… या भस्मासुराला मोहिनी होऊन रोखायचे की आपण राख होऊन जायचे, हे सामान्य मराठी माणसांशी नाळ तुटत चाललेल्या शिवसेनेला समजत नाही. अगतिक होऊन ती या भस्मासुराच्या मागे फरफटत चालली आहे. उद्धव ठाकरे यांची ही अगतिकता शिवसेनेसाठी धोक्याची घंटा आहे.

भाजपची केंद्रात एक हाती सत्ता दुसर्‍यांदा आली आहे. आता त्यांना मैदान मोकळे आहे. ते म्हणतील ती पूर्व दिशा असे वातावरण असून एनडीए घटक पक्षांतील शिवसेना आणि नितीशकुमार यांचा जनता दल संयुक्त या दोन पक्षांना अनुक्रमे 18 आणि 16 खासदार निवडून आणूनही मोदींनी काडीची किंमत दिलेली नाही. प्रकाशसिंह बादल आणि रामविलास पासवान यांचे तसेच एनडीएतील अन्य छोटे छोटे प्रादेक्षिक पक्ष जवळपास संपवत आणल्यानंतर आता नितीश आणि उद्धव यांना संपवायचे भाजपने बाकी ठेवले आहे. ते संपवण्याची प्रक्रिया कधीच सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात दोघांनाही वाटण्याच्या अक्षता लावून ते मोदींनी दाखवून दिले.

आता त्यांच्या राज्यात त्यांना भस्म करून टाकायचे, यासाठी भाजपचे डावपेच सुरू झाले आहेत. नितीशकुमार यांनी हा विश्वासघात वेळीच ओळखला आहे. उद्धव यांना तो दिसत नाही किंवा दिसत असून ते डोळेझाक करत आहेत. ही अगतिकता आहे सत्तेसाठी. ती सोबत असली की त्याचे दृश्य आणि अदृश्य फायदे घेण्याची. यात मराठी मातीतील जमिनीशी घट्ट मुळे रोवून ठेवणारी बाळासाहेब ठाकरे यांची केडर बेस शिवसेना संपत चालली आहे, हा त्यातला मुख्य धोका आहे. मुळे तुटत चालली की झाड कोसळायला फार वर्षे लागत नाही. भाजपने हे बरोबर हेरले आहे. हिंदुत्वाच्या गोंडस नावाखाली शिवसेनेचा मेंदू ताब्यात घेऊन महाराष्ट्रात सेनेची ताकद असलेला मराठी माणूस आणि त्याची व्होट बँक आपल्याकडे खेचून आणण्याचे डाव कधीच पटावर भाजपकडून फेकले गेलेत आणि मातोश्री डोळ्यावर पट्टी बांधून मग्न तळ्याकाठी बसली आहे. युगांत उलटून जातील तेव्हा उद्ध्वस्त धर्मशाळा झाल्यासारखी शिवसेनेची अवस्था झालेली असेल…

शिवसेनेचा जीव हा अजूनही मुंबई महापालिकेत अडकला असून महाराष्ट्रावर एकहाती राज्य मिळवण्याचे लक्ष्य ते विसरले आहेत. मुंबई महापालिकेसारख्या एका छोट्या राज्याचा मुख्यमंत्री होण्यात ज्यांना आनंद वाटतो त्यांना चांदा ते बांदा अशा उभ्या आडव्या महाराष्ट्रावर भगवा फडकला पाहिजे असे का वाटत नाही, यात भाजपमागे फरफटत जाण्याची अगतिकता आहे. नितीश आपल्या एकट्याच्या ताकदीवर आणि भाजपला आपल्या मागे फरफटत नेत बिहारचे मुख्यमंत्री होऊ शकतात तर उद्धव यांना ते का जमत नाही. याच्या उत्तरासाठी मोठा विचारच करायचा नाही. मुंबई म्हणजे अजूनही त्यांना महाराष्ट्र वाटत असेल तर भाजप त्यांना आपल्या मागे ओढत नेणारच.

मुख्य म्हणजे शिवसेनेचा जीव अडकलेली मुंबई महापालिकाही ताब्यात घेण्याचे भाजपचे सत्तेचे प्रयोग मागच्या निवडणुकीत झाले होते. दोन तीन नगरसेवकांच्या फरकाने मागे असलेल्या भाजपने ठरवले असते तर मुंबई महापालिका कधीच ताब्यात घेतली असती… पण, शिवसेनेला हळूहळू संपवायचे आहे. विषाचा प्याला एकदम तोंडाला लावला तर बोभाटा होईल, त्यापेक्षा हळूहळू विष दिले तर आरडाओरडाही होणार नाही आणि वर गळ्यात गळे घालून रडायलाही सोपे जाईल… याला म्हणतात कुटनीती! नितीशकुमार यांनी ती ओळखली आणि तुम्ही आम्हाला काय संपवणार. जगलो तर आमच्या बळावर आणि संपलो तर आमच्या लढाईने. पण, तलवार म्यान करणार नाही.

औरंगजेबाच्या फौजा महाराष्ट्रावर आक्रमण करून आल्या असताना शिवाजी महाराजांनी त्याला ताकद कमी असूनही प्राण पणाला लावून मुकाबला केला. जे महाराजांनी केले तेच त्यांच्या शूरवीर पुत्र संभाजी महाराजांनी केले. औरंग्याच्या नाकात दम आणला. स्वराज्य तोरण खाली पडू दिले नाही. प्राण गेला तरी वाकले नाहीत. आणि हीच प्रेरणा घेऊन पुढे शिवाजी महाराजांचा वारसा सांगणार्‍या मर्द मावळ्यांनी मुगली वादळाला सळो की पळो करत औरंगजेबाचे मावळ मराठा ताब्यात घेण्याचे स्वप्न साकार तर होऊ दिले नाहीच. पण याच मातीत त्याला गाडला! हा इतिहास शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घालताना आणि प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना नमस्कार करताना शिवसेना विसरते कशी? इतिहास विसरला तो भविष्य साकारू शकत नाही.

प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती भगवा देताना मराठी माणसांची संघटना उभी करण्याचे बाळकडू पाजले. त्यामागे मराठी माणूस हाच केंद्रस्थानी होता आणि पुरोगामी महाराष्ट्राची मोठी परंपरा होती. जातपात, देवधर्म आणि गरीब श्रीमंत असा भेद नव्हता. तर स्वराज्य तोरण चढे, मराठी पाऊल पडते पुढे हा मंत्र होता! बाळासाहेबांनी या रोपट्याचा वटवृक्ष करताना मुंबईत मराठी माणसाला ताठ मानेने उभे तर केले; पण त्यापेक्षा त्याच्या भाजी भाकरीचा प्रश्न सोडवला. स्थानिय लोकाधिकार समितीने बँका, विमा, सरकारी आणि निमसरकारी आस्थापने, विमान कंपन्या, खाजगी क्षेत्र आणि जेथे जेथे शक्य आहे तिकडे मराठी माणूस कामाला ठेवून हजारो कुटुंबांना उभे केले. ही अदृश्य ताकद उभी करत मुंबईसह कोकण हा आसपासचा परिसर ताब्यात ठेवला. मात्र हा विस्तार गावखेड्यात करण्याची मोठी गरज असताना काही भागांपुरती शिवसेना मर्यादित राहिली. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र असे पुंजक्या पुजक्यांनी राज्य केले. खरेतर गडचिरोलीपासून नंदुरबार, सातारा, सांगली अशी बांधणी व्हायला हवी होती. पण, बाळासाहेब असतानाच अटलबिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन यांच्याबरोबर युती करताना देशाच्या सत्तेची स्वप्ने पाहिली. भाजप मात्र त्यावेळी शिवसेनेचे बोट धरून मोठा होत असताना शिवसेना हिंदुत्वाच्या नको तितक्या प्रेमापोटी आपली भूमीपुत्रांची मुळे खिळखिळ करत गेली.

भाजपला 90 च्या दशकानंतर देशव्यापी हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा असलेला नेता हवा होता. देशाच्या आर्थिक राजधानीत बसून बाळासाहेबांनी आवाज कुणाचा करत भाजपला मोठी साथ दिली आणि त्यांना मोठे करण्यात मोठा वाटा उचलला. पण, बाळासाहेबांमध्ये वाजपेयी असो की महाजन असो, त्यांना रोखण्याची जबर ताकद होती. मुळात 2 खासदार असलेल्या भाजपचे लक्ष्य ठरले होते. त्यामागे रेशीम बागेचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेंदू काम करत होता. त्यांच्या देशावर राज्य करण्याच्या कल्पना प्रत्यक्षात उतरत होत्या आणि शिवसेना मात्र राज्यापुरतीच मर्यादित राहत होती. मुळात ती महाराष्ट्रावर राज्य करणारी राहिली असती तरी आज भाजपच्या मागे फरफटत जाण्याची वेळ आली नसती. संघ आणि त्यांचा राजकीय पक्ष भाजप कधीच कुठली गोष्ट आपले फायदे, आपले विचार आणि ठराविक समाज हेच लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून करत आलेला आहे. ते गोड बोलतील, तुमच्या गळ्यात गळे घालतील, एकाच ताटात जेवतील, देव, देश आणि धर्म हे तुमच्या डोक्यात घालतील. शेवटी तुम्ही आणि तुमचा मेंदू ताब्यात आला की तुम्ही कुठेही जाणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करतील. आज शिवसेनेबरोबर तोच डाव खेळून भाजपने त्यांना ताब्यात घेतले आहे.

अयोध्येत राम मंदिर बांधायला आज शिवसेनेला धावायची काय गरज आहे. जेव्हा अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टी तुम्हाला पूर्ण करता येत नाहीत तेव्हा तुम्हाला देवळांचा आधार घ्यावा लागतो. पाकिस्तानचे आज काय झाले ते जगासमोर आहे. धर्म पोट भरू शकत नाही आणि मग जगासमोर भीक मागण्याची वेळ येते, या भयानक वास्तवाला आज इम्रान खानला सामोरे जावे लागत आहे. उत्तम शिक्षण, चांगले आरोग्य, पोट भरू शकणारी शेती आणि हाताला काम देणारा रोजगार या माणूस म्हणून जगू शकणार्‍या चार मूलभूत प्रश्नांना आज हात घातल्यास शिवसेना भविष्यात टिकून राहील.

जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीविरोधात देशभर रान उठवताना इंदिरा गांधींचे एक हाती साम्राज्य खाली खेचले. त्याच जयप्रकाश यांचा शिष्य नितीश बिमारु बिहारला आपल्या ताकदीने हात देत राज्य करत आहे. प्रबोधनकार आणि बाळासाहेब यांचा वारसा सांगणार्‍या उद्धव यांना महाराष्ट्र स्वतःच्या ताकदीवर उभा करता येऊ शकतो. त्यासाठी कोणामागे फरफटत जाण्याची गरज नाही… आणि तसे जायचेच ठरवले तर भाजपचा भस्मासूर एक दिवशी शिवसेनेला संपवल्यावाचून राहणार नाही.

First Published on: June 23, 2019 4:09 AM
Exit mobile version