भाजपला काँग्रेस हाच राष्ट्रव्यापी पर्याय?

भाजपला काँग्रेस हाच राष्ट्रव्यापी पर्याय?

Supporters of BJP

पुण्यात गाजलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांच्याशी बातचित करताना जाणता राजा शरद पवार यांनी भाजपला काँग्रेस हाच राष्ट्रव्यापी पर्याय असल्याचे निर्विवाद सांगून टाकलेले आहे. पवार २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस सत्तेत यावी व देशाची सत्ता काँग्रेसप्रणित आघाडीकडे यावी, अशा कामाला लागल्याचा तो संकेत आहे. मागल्या काही दिवसांपासून त्यांनी विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू केल्याच्या वार्ता येतच होत्या. आता तर त्यांनी त्यामागचे राजकीय तर्कशास्त्रच मांडलेले आहे. अर्थात त्यात नवे काही नाही आणि अनेक राजकीय निरीक्षकांनी यापुर्वी अनेकदा तेच तर्क मांडलेले आहेत. किंबहुना कुठल्याही बाजूला झुकणारा राजकीय अभ्यासक असो, त्याने भाजपला काँग्रेसच देशव्यापी टक्कर देऊ शकते, असेच प्रत्येकवेळी सांगितलेले आहे. कारण अन्य पक्ष स्वत:ला कितीही राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेत असले, तरी व्यवहारात ते प्रादेशिक वा राज्यापुरते पक्ष आहेत. एका मोठ्या राज्यात त्यांच्या पाठीशी चांगला मतदार आहे आणि इतर दोनतीन राज्यात नाव घेण्यापुरते अस्तित्व असल्याने, त्यांना कायद्याने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे.

बाकी एकदोन राज्याबाहेर अशा राष्ट्रीय पक्षांना स्थान नाही. काँग्रेसची कहाणी वेगळी आहे. भाजप प्रयत्नपूर्वक अनेक राज्यांत जाऊन पोहोचला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रत्येक राज्यात व जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आधीपासूनच होता. त्याला कोणी पर्याय नव्हता, तो पर्याय मोदींच्या भाजप रुपाने मिळाला आहे. त्यामुळे भाजपला काँग्रेस हाच पर्याय असू शकतो, हे विधान काहीसे हास्यास्पद आहे. काँग्रेसने आपल्याला भाजपच्या रुपाने पर्याय का निर्माण होऊ दिला, याचा उहापोह होण्याची गरज आहे. पर्याय या शब्दाचा अर्थ मूळ गोष्ट उपलब्ध नसते, तेव्हा स्वीकारायची व्यवस्था होय.कुठलाही ग्राहक त्याला हवे असलेले मिळत नसेल, तर तशाच अन्य पर्यायाकडे वळत असतो. काँग्रेस हा देशव्यापी पक्ष होता, कारण स्वातंत्र्यासाठी झालेल्या चळवळीला लोक काँग्रेस म्हणून ओळखत होते आणि तिचेच रुपांतर पुढल्या काळात पक्ष संघटनेत झाले. त्यानंतर विविध राजकीय भूमिका व विचारसरणीचे पक्ष उदयास येत गेले.

त्यांना जनमानसात स्थान मिळायलाही काही दशके गेली. अनेक दुबळ्या पक्षांनी एकत्र येऊन आघाड्या केल्या वा विलीनीकरणातून काँग्रेसला पर्याय उभारण्याचाही प्रयास झाला. जनता पक्ष वा जनता दल हे त्याचेच दाखले होते. पण त्यांना कधी काँग्रेसला पर्याय होता आले नाही. अशा आघाड्या वा विलीनीकरणाने निवडणुकाही जिंकल्या गेल्या. पण त्यात एकत्र आलेल्या नेत्यांना एकजीव होता आले नाही, की गुण्यागोविंदाने पक्ष म्हणून नांदता आले नाही. म्हणून २०१४ पर्यंत राजकीय स्थिती काय होती? काँग्रेसला पर्याय नाही, असेच बोलले जात होते. अगदी भाजपलाही आज आपण एकमेव राजकीय प्रमुख पक्ष आहोत, असा आत्मविश्वास आलेला नाही. म्हणून विविध प्रादेशिक पक्षांना हाताशी धरून भाजपलाही वाटचाल करावी लागते आहे. पण दरम्यान सत्तर वर्षांत काँग्रेसने आपले स्थान कसे गमावले व कशामुळे गमावले, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. चार वर्षांपूर्वी जो देशातील एकमेव राष्ट्रव्यापी पक्ष होता, तो आज अनेक राज्यातून अस्तंगत कशाला झाला? मुळच्या देशव्यापी पक्षाला आता पर्याय म्हणून कशासाठी विचारात घेतले जाते, ही बाब महत्वाची आहे. नेहरू – इंदिराजींच्या जमान्यात साडेतीनशे जागांवर आरामात निवडून येणार्‍या काँग्रेसला आज तीनशे जागाही पूर्ण शक्तीनिशी लढणे अशक्य झाले आहे. बिहार, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, बंगाल, आंध्र अशा राज्यातून काँग्रेस नामशेष झाली आहे. अनेक राज्यांतील प्रादेशिक पक्ष अशी काँग्रेसची दुर्दशा झाली आहे.

ही बाब लक्षात घेतली पाहिजे. भाजपला काँग्रेस हा पर्याय असल्याचे शरद पवार म्हणतात, याचा अर्थच स्वबळावर देशाची सत्ता मिळवण्याची कुवत काँग्रेसमध्ये उरली नसल्याचे सांगतात. तेवढेच नाही तर, अन्य प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊनच काँग्रेसला भाजपशी सामना करावा लागणार असल्याचाही संदेश त्यातून देत असतात. थोडक्यात मागील दोन दशकात भाजपने जी रणनिती आखली व राबवली, ती काँग्रेसने आता स्वीकारली पाहिजे; असा पवारांचा खरा रोख आहे. श्रेष्ठी म्हणून दिल्लीत बसून आपलेच हुकूम लादण्यातून काँग्रेसला बाहेर पडावे लागेल. संघटना दुबळी झालेल्या राज्यात तिथे प्रबळ असलेल्या पण भाजपविरोधी असलेल्या पक्षांच्या कलाने राजकारण करावे, असे सोनिया वा राहुलना पवार सांगत आहेत. पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, हरयाणा, हिमाचल, आसाम, कर्नाटक अशा राज्यात काँग्रेसच भाजपशी टक्कर देणारा पक्ष आहे. पण अन्य राज्यात काँग्रेस दुर्बळ वा नगण्य आहे. बंगाल, तामिळनाडू, ओडिशा, आदी राज्यांत प्रादेशिक पक्षांशी जुळते घेऊन पुढे जावे लागेल. कर्नाटकात देवेगौडा वा महाराष्ट्रात शरद पवार, उत्तरप्रदेशात मायावती वा मुलायम, बिहारमध्ये लालू वा ओडिशात नवीन पटनायक यांना सोबत घेतले; तरच काँग्रेसला आपले स्थान टिकवता येईल. अन्यथा हळुहळू त्याही राज्यातील काँग्रेस नामशेष होऊन जाईल. भाजप जसा स्थानिक नेते व पक्षांना सोबत घेऊन विस्तारला तसे जमले पाहिजे. आघाडी व मैत्रीतून काँग्रेसला भाजपशी टक्कर द्यावी लागेल, हा त्यातला मतितार्थ आहे. युपीए काळात काँग्रेसने तसे समजूतदार राजकारण केले असते, तर व्यापक आघाडी होऊन भाजपला एकहाती बहुमताचा पल्ला गाठता आला नसता, की आज काँग्रेसची इतकी दुर्दशा झाली नसती, हेच पवारांचे गर्भित आकलन आहे. काँग्रेस आता १९९६ सालातील भाजप झाला आहे, हा त्याचा सरळ अर्थ आहे.

१९८९ पासून भाजपने काँग्रेसला पर्याय होण्यासाठी प्रयत्नपूर्वक आरंभ केला. त्यासाठी कुठल्याही प्रादेशिक पक्षाशी जुळवून घेतले, जागावाटप केले. प्रसंगी सत्तेबाहेर बसून पाठिंबे दिले, किंवा सत्तेत भागिदारीही केली. पण त्या प्रत्येक प्रयत्नात आपल्या विस्ताराप्रमाणेच काँग्रेसच्या खच्चीकरणाला प्राधान्य दिलेले होते. ९१ खासदार असलेल्या भाजपने विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. उलट १९९८ सालात सीताराम केसरी यांनी देवेगौडा-गुजराल यांच्या सरकारमध्ये मंत्रीपदे मिळाली नाहीत, म्हणून त्यांची सरकारे पडण्याच्या उचापती केल्या. बिहारमध्ये नितीश वा महाराष्ट्रात शिवसेनेला मोठा भाऊ मानून तडजोडी करणारा भाजप आणि आजची काँग्रेस सारखेच आहेत. पण आजची काँग्रेस तितकी लवचिकता दाखवत नाही. काँग्रेसला पर्याय होण्यासाठी भाजपने प्रसंगानुसार दाखवलेली लवचिकता काँग्रेसने अंगी बाणवली पाहिजे, असे यातून पवारांना सुचवायचे आहे. ते कितीजणांना उमजले असेल? त्याचे उत्तर त्या मुलाखतीनंतर दिसलेले नाही. कारण मुलाखत झाल्यावर धुरळा खुप उडाला व उडवला गेला आहे. पर्याय याही बाबतीत मतप्रदर्शन झाले आहे. पण जणू काँग्रेस स्वबळावर पुन्हा सत्तेत येणार असल्याच वल्गना झालेल्या आहेत. काँग्रेसच्या वास्तविक बळाचे आकलन व मिमांसा झालेली नाही. परिस्थितीनुसार काँग्रेसने राज्याराज्यात कुठले पर्याय स्वीकारले पाहिजेत, त्याचाही कुठे उहापोह होताना बघायला मिळालेला नाही. पवार नेहमी गोलमाल बोलतात. ‘लेकी बोले सुने लागे’ अशी त्यांची भाषा असते. त्यामुळे विषयाचा उलगडा होण्यापेक्षा नवेच प्रश्न व विषय चर्चेत येतात. गदारोळ खुप होतो. पण त्यातला आशय कुठल्या कुठे हरवून जातो. आताही त्यांनी प्रमुख असलेल्या काँग्रेस पक्षाच्या दुर्दशेवर नेमके बोट ठेवले आहे. पण इशारा काफी असला, तरी समजून घेणारे हवेत ना?

भाऊ तोरसेकर

First Published on: December 10, 2018 5:33 AM
Exit mobile version