झापडबंद प्रेमाची आत्मघातक परिणती !

झापडबंद प्रेमाची आत्मघातक परिणती !

बॉलीवूडस्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला तब्बल 50 दिवसांनतर वेग आला आहे. ईडी आणि सीबीआयने हे प्रकरण हाती घेतल्याने सुशांतच्या मृत्यूचे गूढ उलगडण्याबरोबरच त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिचीही पोलखोल होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. रियाने सुशांतला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं, त्याच्याकडून पैसे उकळले, धमकावले या आरोपांवरून सोशल मीडियावर तिच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे. जणू काही रियाच्या निमित्ताने जो तो आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहे. एकमात्र नक्की, प्रेमाच्या नावाखाली जोडीदाराकडून फसवणूक झालेल्या प्रत्येकासाठी सुशांत आत्महत्या प्रकरण आज पर्सनल झालं आहे.

कारण हे प्रकरण डोळ्यावरची प्रेमाची झापडं काढणारं आहे. सध्या तरी असाच सिनॅरिओ आहे. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं… ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या या कवितेच्या ओळी प्रेमवीरांच्या कायम ओठांवर असतात. सुशांत काय किंवा प्रेमात पडलेली दुसरी सामान्य व्यक्ती काय जोडीदाराबद्दल दोघांच्याही भावना वरील कवितेच्या ओळीसारख्याच असणार. पण सुशांतच्या बाबतीत म्हणायचं तर तो ज्या बॉलीवूड नावाच्या चंदेरी दुनियेत वावरत होता ते तर गोकुळच आहे. पैसा, प्रसिद्धी आणि आजूबाजूला असलेला सुंदर ललनांचा वावर यात तोही गुरफटला. छोट्या पडद्यावर व पडद्यामागे जडलेले अभिनेत्री अंकिता लोखंडेबरोबरचं सहा वर्षांचं नात एका क्षणात मोडीत काढत तो रियाच्या बाहूपाशात विसावला. अंकिताबरोबर त्याचा ब्रेकअप का झाला, याची अनेक कारणे आज चर्चेत आहेत.

खरं कारण दोघांनाच माहीत. पण रियाजवळ आल्यानंतर सुशांत बदलल्याचं त्याचे जवळचे सांगत आहेत. रियाने सुशांतच्या मनावरच नाही तर त्याच्या आर्थिक सुबत्तेवरही ताबा मिळवला.

घऱातल्यांपासून त्याला दूर केलं. समोर येत असलेल्या माहितीवरून तरी असंच चित्र दिसत आहे. तिथेच खरं तर सुशांत पांगळा झाला. सुशांत सुशिक्षित होता.

भविष्याची अनेक स्वप्नं त्याच्या डोळ्यात होती. 50 हून अधिक स्वप्नांची त्याची बकेट लिस्ट होती. पण चुकीच्या संगतीने आणि नात्यामुळे तो रित्या हातानेच या जगातून निघून गेला.

डायरीत लिहून ठेवलेली बकेट लिस्ट त्यातच बंद झाली. सुशांतचं नेमकं काय चुकलं हे सांगणे कठीण आहे. कारण 34 वर्षांच्या सुशांतला चूक काय आणि बरोबर काय हे कळत होतं.

पण डोळ्यावर प्रेमाची झापडं लावल्याने त्याला समोरचं दिसेनासं झालं होतं, असं त्याचे निकटवर्तीय सांगत आहेत. पण आयुष्यच उद्ध्वस्त होत असेल तर वेळीच सावध होणे किंवा समोरच्याला सावध करणे गरजेचे आहे. प्रेम आणि फसवणूक यातील फरक वेळीच कळायला हवा नाही तर पश्चातापाशिवाय हाती काही लागत नाही.

जे सुशांतच्या बाबतीत झालं ते कोणाच्याही बाबतीत होता कामा नये. दरम्यान, सुशांत प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. यामुळे येत्या काळात हे प्रकरण चांगलंच तापणार यात शंका नाही.

यात मोठ्या माश्यांबरोबर छोटे मासेही ईडी व सीबीआयच्या गळाला लागणार. मीडिया रोज त्याच्या ब्रेकींग देणार. पण सुशांत काही परत येणार नाही हे त्याच्या कुटुंबीयांना माहीत आहे. पण सुशांतच्या मृत्यूला जबाबदार असणार्‍यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं एवढंच त्यांच्या हातात आहे. सुशांतने जर वेळीच सावध होत कुटुंबाची मदत घेतली असती तर आज चित्र वेगळं असतं. पण त्याने तसे केले नाही. रियाच्या दबावापुढे तो झुकत गेला.

यासाठी आजच्या प्रत्येक तरुण व तरुणीने कुठलंही नात निवडताना आंधळेपणाने नाही तर डोळसपणे निवडायला हवे. प्रचंड टॅलेंट असलेल्या या पिढीने नको त्या नात्याच्या जाळ्यात स्वत:ला गुरफटवून न ठेवता त्यातील खरेपणा वेळीच ओळखायला हवं. फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच शहाणपणा दाखवत ते नाते फार लांबवू नये.

योग्य चर्चा करुन त्यातून मार्ग काढावा. स्वार्थी माणस पावलापावलावर भेटतात, पण खर्‍या अर्थाने एखाद्याच्या सुखदु:खात समरसून जाणारे तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करणारे मित्र मैत्रीणी दुर्मिळच असतात. यामुळे मित्र मैत्रिणी निवडताना सतर्क राहा, सावध राहा. सुशांत प्रकरणावरून प्रत्येकाने काहीना काही शिकण्यासारखं आहे. सुशांतला आज ना उद्या न्याय मिळेलच. पण त्यासाठी त्याला द्यावी लागलेली किंमत ही खूप मोठी आहे. यावरून प्रत्येकाने बोध घ्यायलाच हवा.

First Published on: August 9, 2020 5:42 AM
Exit mobile version