बॉलिवूडचा ‘ऐतिहासिक’ नॉस्टॅलजिया

बॉलिवूडचा ‘ऐतिहासिक’ नॉस्टॅलजिया

‘पद्मावत’ चित्रपटातील दृष्य

मराठी चित्रपटसृष्टी असो वा बॉलिवूड, दोन्हींकडे चित्रपटांचे अनेकविध ट्रेंड पाहायला मिळतात. त्यात हिंदीमध्ये मागचा बराच काळ ‘बायोपिक’ चित्रपटांना उधाण आलंय. कोणी क्रीडापटूंवर चित्रपट बनवतंय तर कोणी राजकीय नेत्यांवर. मराठीतही काही बायोपिक बनलेत, त्याला रसिकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. बायोपिकचा ट्रेंड अद्याप काही संपलेला नाही. मात्र आता मराठी व हिंदीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांचा ट्रेंड जोरात असल्याचे चित्र दिसतेय.

शालेय जीवनात इतिहास वाचायला व लक्षात ठेवायला जरा कठीणच वाटतो. तो चित्ररूपात मात्र रंजक आणि सोपा वाटतो. मग, त्यात शिवाजी महाराजांचा इतिहास, झाशीची राणी, राजा अशोका, महात्मा गांधी अशा दिग्गजांचा इतिहास यु ट्युबवरही पाहायला मिळतो. लहान मुलं, विद्यार्थ्यांसोबतच मोठ्या व्यक्तींनाही रुपेरी पडद्यावर भव्यदिव्य पद्धतीनं इतिहास पाहायला जास्त भावतो. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकवर्गांची चांगलीच पसंती मिळताना दिसते. तसंच ऐतिहासिक चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही अडकतात. कारण असे चित्रपट तयार करताना सत्याचा किंवा इतिहासाचा विपर्यास होणार नाही याचे भान राखावे लागते. आता उदाहरण द्यायचं झालं तर मराठीत नुकताच प्रदर्शित झालेला ‘फर्जंद’ आणि हिंदीतील ‘पद्मावत’. ‘फर्जंद’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यात शिवाजी महाराजांचा शूर सरदार कोंडाजी फर्जंद यांच्या पराक्रमाची गाथा सांगण्यात आलीय. या सिनेमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. चित्तोडची राणी पद्मावतीवर आधारीत ‘पद्मावत’ खूप वादग्रस्त ठरला होता. आता आगामी काळात बरेच ऐतिहासिक सिनेमे रसिकांच्या भेटीला येणार आहेत. यात ‘केसरी,’ ‘पानिपत,’ ‘बॅटल ऑफ सारागढी,’ ‘तानाजीः द अनसंग वॉरियर,’ ‘मणिकर्णिका, ‘छत्रपती शिवाजी महाराज,’ ‘पृथ्वीराज चौहान’ असे काही ऐतिहासिकपट पाहायला मिळतील.

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो अक्षय कुमारचा ‘केसरी’ व रणदीपचा ‘बॅटल ऑफ सारागढी’ चित्रपट वैशिष्ट्यपूर्ण असेल. १८९७ सालच्या सारागढी युद्धावर आधारीत तीन चित्रपट येत आहेत. अक्षय कुमारचा ‘केसरी,’ रणदीप हुड्डाचा ‘बॅटल ऑफ सारागढी’ आणि अजय देवगणचा ‘सन्स ऑफ सरदार’ या चित्रपटांचा समावेश आहे. शीख रेजिमेंटच्या २१ जवानांच्या मदतीने सुमारे १० हजार अफगाणी सैनिकांविरोधात लढाई करून सारागढीच्या किल्ल्यावर विजय मिळवला होता. यामध्ये शहीद झालेल्या २१ जवानांच्या शौर्याची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. आता एकाच विषयावर तीन चित्रपट येताहेत म्हटल्यावर त्यांच्यातील चढाओढ पाहणं औत्सुकतेचं ठरणारेय.

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारीत ‘पानिपत’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. यात अर्जुन कपूर, संजय दत्त आणि क्रिती सॅनॉन मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील. या सिनेमातून मराठ्यांचे शौर्य व संघर्ष रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ‘तानाजीः द अनसंग वॉरियर’ चित्रपटात लढवय्या तानाजी मालुसरे यांची वीरगाथा पाहायला मिळणार आहे. कोंढाणा किल्ला सर करण्याची जबाबदारी महाराजांनी आपल्यावर सोपवल्याचं कळताच, मुलाचं लग्न बाजूला ठेवून तानाजी मालुसरे सज्ज झाले होते. ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी गर्जना करत ते मोहीम फत्ते करण्यासाठी गेले होते. त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे मावळ्यांनी किल्ला जिंकलासुद्धा; पण शत्रूशी बेभान होऊन लढताना हा सिंह धारातीर्थी पडला होता. त्यांच्याच स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा किल्ल्याचं नाव सिंहगड असं ठेवण्यात आलं आहे. या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत अभिनेता अजय देवगण दिसणार आहे. त्यांची वीरगाथा रुपेरी पडद्यावर पाहणे विलक्षण ठरेल. १९ व्या शतकातील झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट असून या चित्रपटात १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यावेळी लक्ष्मीबाई यांचा ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीशी लढा दाखवला जाणार आहे. झांशीच्या राणीच्या भूमिकेत बॉलिवूडची क्वीन कंगना रानौत दिसणारेय. तिला या भूमिकेत पाहणं औत्सुकतेचं असेल. छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर अनेक चित्रपट बनलेत. अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुख शिवाजी महाराजांवरील मराठी चित्रपटाची निर्मिती करताहेत.

या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका रितेश साकारणार आहे. या चित्रपटाचे बजेट जवळपास २२५ कोटींचे असून हा चित्रपट हिंदीतही येणार आहे. या चित्रपटात जास्त कलाकार व अ‍ॅक्शन पाहायला मिळेल. बाराव्या शतकातील राजपूत राजा पृथ्वीराज चौहान यांच्यावर चित्रपट येत असून यात पृथ्वीराज चौहान यांचा रोल अक्षय कुमार करणार असल्याचे समजते आहे. पृथ्वीराज चौहान यांचा जन्म ११६८ साली झाला होता. ते अजमेरचे राजा सोमेश्वर चौहान यांचे सुपूत्र होते. पृथ्वीराज चौहान यांनी वयाच्या तेराव्या वर्षी राजगडची गादी सांभाळली होती. पृथ्वीराज चौहान यांच्याकडे एक योद्धा राजा म्हणून पाहिले जाते. यात अक्षय व्यतिरिक्त कोण कलाकार आहेत, हे अद्याप समजलेलं नाही. ‘केसरी,’ ‘पानिपत,’ ‘बॅटल ऑफ सारागढी,’ ‘तानाजीः द अनसंग वॉरियर,’ ‘मणिकर्णिका व छत्रपती शिवाजी महाराज,’ ‘पृथ्वीराज चौहान’ या ऐतिहासिक व्यक्तिरेखा व प्रसंग रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. मात्र कोणत्याही वादाच्या भोवऱ्यात न अडकता ऐतिहासिकपट प्रदर्शित होतील का हे पाहावे लागेल.


तेजल गावडे

(लेखिका ‘आपलं महानगर’च्या प्रतिनिधी आहेत)

First Published on: June 24, 2018 12:05 AM
Exit mobile version