वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस

वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस

डॉ. जगदीशचंद्र बोस यांचा आज स्मृतिदिन. जगदीशचंद्र हे एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते. भारतीय महान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे वनस्पती विषयावरील कार्य महान आहे. त्यांचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ रोजी पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बोस हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला ऑफिसर होते. जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजुबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्रसुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असत.

सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्‍याची तांबूस असा फरक का पडतो? असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पूर्ण करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले. इंग्लंड व कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात १८८५ ते १९१५ अशी ३० वर्षे भौतिकशास्त्र शिकवत असतानाच जगदीशचंद्रांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पोइंकर आणि जे. जे. थॉम्पसन यांच्या लिखाणात या शोधाचा उल्लेख आला आहे. नेमेलाइटच्या मदतीने संदेश पाठवण्यात त्यांना यश मिळाले होते.

विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस हे वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदु:ख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अ‍ॅपरेटस, रेझोनंट रेकॉर्डर्स ही दोन उपकरणे तयार करुन त्यांनी त्यांच्या सहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. भारतीय वैज्ञानिक सोहिनी चक्रबोर्ती यांनी २०१६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून ही प्रक्रिया उलगडून दाखविली आहे. वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली. अशा या जगविख्यात शास्त्रज्ञाचे 23 नोव्हेंबर 1937 रोजी निधन झाले.


 

First Published on: November 23, 2021 6:07 AM
Exit mobile version