गणेशमूर्तिकारांना करोनाचा विळखा!

गणेशमूर्तिकारांना  करोनाचा विळखा!

पावसाळा सुरू झाला की आपल्याला आतुरता असते श्री गणेश उत्सवाची. आनंदाचा आणि समाधानाचा विघ्नहर्त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आतुरलेला असतो. यंदा २२ ऑगस्ट रोजी श्री गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. मात्र, यंदाचे वर्ष हे नेहमीपेक्षा वेगळे आहे. अनेक आव्हानांनी भरलेले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून केवळ आपले राज्यच नव्हे तर आपला भारत देश आणि संपूर्ण जग करोना महामारीच्या विळख्यात पिळून निघत आहे. करोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या कारणामुळे मानवी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. त्याचा दूरगामी परिणाम जवळपास सर्व क्षेत्रांवर झालेला आढळतो. त्यातून आमचा मूर्तिकलेचा व्यवसाय सुटलेला नाही. मूर्तिकामावर अवलंबून असणारा संपूर्ण कारागीर वर्ग या परिस्थितीला सामोरा जात आहे. अवस्था बिकट आहे. प्रचंड इच्छाशक्ती असूनही पूर्ण क्षमतेने कुठल्याही कारागीराला काम करता येणे शक्य होत नाही आहे. याला असंख्य पैलू आहेत. मूर्ती बनवण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता असते. त्यावर उपजीविका असणारा विशिष्ट कामगार वर्ग आणि ग्राहक वर्ग यंदाच्या वर्षी संभ्रमात आहे.

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेला श्री गणेशाचा उत्सव आपल्यासाठी आनंदाची आणि समाधानाची पर्वणी असते. परंतु, यंदाचे वर्ष हे अपवाद आहे. साधारण दिवाळीनंतर मूर्तिकार गणेशमूर्तींची कामे सुरू करतात. त्यावेळेस त्या कामासाठी आवश्यक असणारा कच्चा माल आणला जातो. कुठल्या प्रकारच्या मूर्ती बनवायच्या याची संख्या ठरवली जाते. पर्यावरणाचे प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारी २०२० रोजी एका जनहित याचिकेवर निकाल देताना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यावर बंदी घातली आहे, पण या निर्णयामुळे ज्यांनी आधीच पीओपीच्या मूर्ती बनवल्या आहेत, असे मूर्तिकार अडचणीत आले होते. मूर्तिकार संघटना आणि इतर संस्थांनी निवेदन देऊन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आपली व्यथा मांडली. एक वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी केली. आदित्य ठाकरे यांनी मूर्तिकारांचे हित लक्षात घेऊन एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.

या मूर्तिकला व्यवसायावर हजारो कुटुंबे अवलंबून आहेत. त्यावर यांचा उदरनिर्वाह चालतो. या व्यवसायाची बाजारपेठेत शेकडो कोटींची उलाढाल होत असते. त्याला खूप मोठ्या प्रमाणात खीळ बसणार आहे. कच्च्या मालाची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे कारागीर मूर्ती घडवू शकत नाहीत. व्यापारी आणि ग्राहक संभ्रमात आहेत. रायगड जिल्ह्यातील पेण, हमरापूर, जोहे, पनवेल येथे मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती बनविल्या जातात. त्या मूर्तींना जगभर मागणी आहे. या भागात गावागावात मूर्ती बनविल्या जातात. पीओपी हे कोणत्याही स्थानिक दुकानात उपलब्ध असते. त्यापासून बनवता येणारे गणपती हे अत्यंत सोप्या पद्धतीने बनवणे शक्य असते. किंबहुना, शाडू मातीपासून बनवल्या जाणार्‍या गणेशमूर्तींवर मोठ्या प्रमाणात कलाकुसर करावी लागते. त्यात कलाकारांना बराच वेळ आणि श्रम खर्ची घालावे लागतात.

सद्य:स्थितीत खालील काही मुद्यांवर विचार होणे आवश्यक आहे

* करोनामुळे शेकडो कोटींची उलाढाल ठप्प.
* मूर्तिकला हा हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे.
* स्थानिक कारागिरांकडून मूर्ती घेणे गरजेचे आहे, कारण वाहतूक खर्च आणि मूर्ती तुटण्याची भीती कमी असते. याउलट बाहेर गावाहून येणार्‍या मूर्ती तुटण्याची भीती जास्त असते.
* स्थानिक उद्योगधंद्यांना लॉकडाऊनमुळे प्राधान्य द्यायला शिकलो आहोत. हेच मूर्तिकलेच्या बाबतीत आता आपल्याला करावे लागणार आहे.
* सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेतले तरच माणसाचा टिकाव लागतो. आपल्या सभोवतालच्या हवामानात पिकते तेच अन्न आपल्या शरीराला पोषक असते. समाजाचेही तसेच आहे. आपण एकमेकांना व्यवसायाच्या बाबतीत परस्पर
पूरक झालो तर आपल्या आणि पर्यायाने समाजाच्या आरोग्यासाठी पोषक ठरेल.
* एकमेकांना सहाय्य करण्याच्या भावनेतून बारा बलुतेदार पद्धती चालत होती. त्यातूनच आजचा सुसंघटित समाज निर्माण झाला.
* सिंधू, हडप्पा संस्कृतीची ओळख आपल्याला त्यांच्या मूर्तिकलेतून, शिल्पकलेतून आणि वापरातील खेळणी भांडी यामधून होते. याच्या मागचा उद्देश असा की त्या सर्व वस्तू कलाकारांनी निर्माण केल्या होत्या. कुठूनही आयात केल्या नव्हत्या.

मयूर शांताराम मोरे (लेखक प्रसिद्ध शिल्पकार आहेत)

First Published on: June 14, 2020 5:15 AM
Exit mobile version