भारताची चंद्राला गवसणी

भारताची चंद्राला गवसणी

भारताचा चांद्ररोव्हर, लँडर असलेले ऑर्बिटर अशा कक्षेत पृथ्वीभोवती फिरत आहे. आपली कक्षा ठरावीक काळात रुंदावत तो चंद्राच्या कक्षेत शिरून मग चंद्राभोवती फिरणार आहे. त्यानंतर सॉफ्ट लँडर, रोव्हरला घेऊन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.

भारताची चांद्रयान-२ मोहीम ६० टक्के यशस्वी झाली. चंद्रावर उतरून तेथील परिस्थितीचा अभ्यास करणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे चांद्ररोव्हर घेऊन भारताचे जीएसएलव्ही अर्थात प्रक्षेपक यान चंद्राच्या दिशेने झेपावले. या प्रक्रियेतील पहिला टप्पा हा अतिशय महत्त्वाचा असतो. एखादी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून अवकाशात पाठवणे ही अतिशय कठीण प्रक्रिया असते. कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आणि वातावरणामुळे होणार्‍या घर्षणातून एखादी कितीही मोठी वस्तू जाळून नष्ट करू शकते. त्यामुळे हा टप्पा अतिशय महत्त्वाचा होता. तो टप्पा भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी यशस्वीरित्या पार केला. इतकेच नव्हेतर यानाला पृथ्वीच्या कक्षेत व्यवस्थितरित्या प्रस्थापितही करण्यात आले. भारताच्या या चांद्र मोहिमेची अमेरिकन अवकाश संशोधन संस्था, नासा आणि परदेशी मीडियाने जोरदार प्रशंसा केली आहे. भारत हा देवळे, देव, गारुडी, दरवेशींचा देश, अशी प्रतिमा पाश्चिमात्य देश आणि अमेरिकेत तयार झाली होती. या प्रतिमेतून बाहेर येऊन भारताने अवकाश संशोधन क्षेत्रात केलेली कामगिरी ही निश्चित कौतुकास्पद आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशीच आहे. या मोहिमेचे अजून एक वैशिष्ठ्य आहे. ते म्हणजे या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्त्व दोन भारतीय स्त्रिया करीत आहेत.

भारतात स्त्री म्हणजे ‘चूल आणि मूल’ असा समज होता. त्यात चुकीचे असे काहीच नव्हते. भारतात स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने समानतेचा दर्जा मिळाला नाही. भारतातील बहुसंख्य महापुरुषांना घडवणारी एक स्त्रीच असली तरी ती मात्र दुर्लक्षित राहिली होती. तिला विचार, आचार स्वातंत्र्य नव्हते. अजून या परिस्थितीत फारसा मोठा बदल झाला असे नाही. पण निदान स्त्रिया शिकू लागल्या. स्वतंत्र विचार आणि आचार करू लागल्या. अवकाश संशोधन क्षेत्रातही स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेचे नेतृत्व इस्रोच्या दोन महिला करत आहेत. देशाच्या इतिहासात प्रथमच अवकाश मोहिमेचे नेतृत्व महिलांकडे देण्यात आले आहे. वनिता मुथय्या या देशाच्या दुसरी चंद्र मोहीम, चांद्रयान-२ च्या प्रकल्प संचालक आहेत, तर रितू करिधाल या मोहीम संचालक आहेत. वनिता या डाटा हाताळण्यातील तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडे अडचणी सोडवण्याचे चांगले कसब असून त्या टीमचे व्यवस्थापन योग्यरित्या करू शकतात. त्यांनी या अगोदर चांद्रयान-१ मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यावेळी अवकाश यानाच्या विविध भागांतून येणारा डाटा इंटरसेप्ट केला होता. आता त्या चांद्रयान-२ मोहीम यशस्वीरित्या कशी पूर्ण होईल हे पहात आहेत. रितू करिधाल याही इस्रोच्या अनेक अवकाश मोहिमेत सहभागी झालेल्या आहेत. त्यांचे प्रमुख काम हे अवकाश यानाला चंद्राच्या कक्षेत स्थिर करण्याचे असेल. करिधाल या अगोदर मंगळ कक्षा मोहिमेच्या उप ऑपरेशन संचालक होत्या. ही मोहीम २०१३ साली राबवण्यात आली होती.

चांद्रयान-२ मोहिमेत सहभागी झालेल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांबद्दल इस्रोचे अध्यक्ष के. शिवन म्हणतात, कामाची सीमा मर्यादित करणे शक्य नाही. प्रत्येक प्रकल्पात इस्रोचे १७ हजार कर्मचारी आपल्यापरिने सहभागी होतात. हे नेटवर्क कल्चर आहे. येथे एका व्यक्तीला श्रेय देता येत नाही. हजारोंनी अज्ञात हिरो कार्यरत आहेत. त्यामुळे टीम इस्रो असे म्हणणेच योग्य ठरेल. मात्र, इस्रोचे सर्वच कर्मचारी मोहिमेत कोणत्या ना कोणत्या प्रकारे सहभागी असले तरी सुमारे ३०० सदस्य हे इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेचे अविभाज्य घटक आहेत. त्यात २० ते ३० टक्के महिला आहेत.इस्रोच्या अवकाश मोहिमांमध्ये महिलांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तरुण महिला शास्त्रज्ञांच्या टीमने भारताच्या मंगळयान मोहिमेत आपल्या पुरुष सहकार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. भारताची मंगळ मोहीम हे मोठे आव्हान होते. आम्हाला १८ महिन्यांपूर्वीपासूनच त्याची तयारी करावी लागली आहे. पृथ्वीवरून नियंत्रण सुटले तरी अवकाश यान कार्यरत राहील, असे स्वयंपूर्ण सॉफ्टवेअर तयार करणे हे खूपच अवघड काम आहे. ते अवघड असले तरी आम्ही न थकता काम केले आणि १० महिन्यांतच हे सॉफ्टवेअर तयार केले, असे करिधाल यांनी एका टॉक-शोदरम्यान सांगितले होते.

भारताच्या गगनयान मोहिमेंतर्गत भारताकडून दोन पुरुष अवकाशवीरांसोबत एका महिला अवकाशवीरालाही अवकाशात पाठवण्याची योजना तयार केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतीय महिला शास्त्रज्ञ व्हीआर ललिथांबिका या मानवसहित अवकाश कार्यक्रम कार्यालयाच्या प्रमुख आहेत. गगनयान मोहिमेचे संचालक उन्नीकृष्ण नायर यांच्या हाताखाली इतर सहकार्‍यांसोबत त्या काम करत आहेत. भारताच्या अवकाश विज्ञानात पुरुषांचे प्राबल्य राहिले आहे. घरची कामे सांभाळून काम करणार्‍या महिला शास्त्रज्ञांचीही त्यात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. मात्र, मंगळयान आणि चांद्रयान मोहिमांनी हे दाखवून दिले की देशातील महिला कितीही मोठे आव्हान स्वीकारण्यास तयार आहेत.

भारताची चांद्रयान-२ ही मोहीम चांद्रयान-1 या मोहिमेचा हा दुसरा टप्पा आहे. भारताच्या चांद्रयान-१ मोहिमेत चंद्रावर पाण्याचा रेणू सापडला होता. या चंद्रावर सापडलेल्या पाण्याच्या रेणूंवर आणखी अभ्यास करणे गरजेचे आहे. हा रेणू नेमका कसा तयार होतो, तो कुठे आहे, चंद्राचा पृष्ठभाग, चंद्राचा केंद्र आणि चंद्रावरील वातावरण याचा अभ्यास करून चंद्रावरील पाण्याचे मूळ शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. आतापर्यंत अमेरिका, रशिया, चीन आणि भारताने आपली याने चंद्राच्या विषुववृत्तीय प्रदेशात उतरवली आहेत. त्याचे कारण म्हणजे चंद्राचा हा भूभाग सपाट आहे. तेथे दरी, डोंगर यांची संख्या कमी आहे. त्या तुलनेत चंद्राचा दक्षिण ध्रुव हा खडबडीत आणि दर्‍याखोर्‍यांचा आहे. त्यामुळे या भागात रोव्हर उतरवणे आणि चालवणे हे तुलनेत एक आव्हान आहे. त्यामुळे अनेक देशांनी दक्षिण ध्रुवावर आपला रोव्हर उतरवण्याचे धाडस केलेले नाही. मात्र, भारताचा रोव्हर हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फिरणार आहे. त्याचे येथे सॉफ्ट लँडिंग होणार आहे. हे अतिशय कठीण आणि किचकट काम भारतीय शास्त्रज्ञांना करावे लागणार आहे. या चांद्रयान-२ मोहिमेत चंद्रावरील भूरचना, तिथली खनिजे, वातावरण, चंद्राचा गाभा यांचा अभ्यास करणे हे या चांद्रयान-२ मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मोठा प्रदेश सूर्याच्या सावलीत असतो. तेथे सूर्याची किरणे कमी प्रमाणात पोहोचतात. त्यामुळे हा प्रदेश कायम थंड असतो. येथील तापमान सुमारे -१२३ अंश असते. कायम अंधारात असणार्‍या या प्रदेशात पाण्याचे अंश किंवा खनिजे असतील असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

या चांद्रयानाचे तीन भाग आहेत. त्यात ऑर्बिटर, लँडर आणि सहाचाकी रोव्हरचा समावेश आहे. त्यापैकी लँडरचे नाव विक्रम असे ठेवण्यात आले आहे. भारतीय अंतराळ मोहिमेचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ लँडरचे नाव विक्रम असे ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे चंद्रावर उतरणारा जो रोव्हर आहे तो संपूर्ण भारतीय बनावटीचा आहे. एकेकाळी अमेरिका, रशिया यांनी भारताला जीएसएलव्हीचे तंत्रज्ञान देण्यास नकार दिला होता. आता इस्रोने ना केवळ संपूर्ण भारतीय बनावटीचे जीएसएलव्ही बनवले, तर चंद्रावर उतरणारा रोव्हरही तयार केला. हा रोव्हर पृथ्वीवरून नियंत्रित केला जाणार आहे. या रोव्हरचे नाव प्रग्यान असे ठेवण्यात आले आहे, तर ऑर्बिटर हा चंद्राभोवती फिरत राहणार आहे. विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग तंत्राने उतरेल. त्यातून प्रग्यान बाहेर पडेल आणि चंद्रावरील भूरचनेची माहिती गोळा करण्याचं, वेगवेगळे प्रयोग करण्याचे काम करेल. नंतर हे यान मँझिनस-सी आणि सिंपेलीयस-एन या दोन क्रेटर म्हणजे खोलगट दर्‍यांच्या मधल्या भागात उतरेल. दुसरा भाग म्हणजे रोव्हर हे चंद्रावरील दिवसभराच्या मोहिमा आणि वेगवेगळे प्रयोग करण्याचे काम करेल. चंद्रावरचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरच्या 14 दिवसांएवढा लांब असतो. इस्रोच्या अशा मोहिमांनी देशात एकप्रकारे आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. देशातील तरुणांना अवकाश संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

First Published on: July 24, 2019 5:25 AM
Exit mobile version