काळानुरूप बदलणारे लॅमिंग्टन रोड मार्केट

काळानुरूप बदलणारे लॅमिंग्टन रोड मार्केट

लॅमिंग्टन रोड मार्केट

मुंबईतील इलेक्ट्रॉनिक्स मार्केट म्हणून नावारुपाला आलेले लॅमिंग्टन रोडवरील मार्केट हा एक अजुबाच मानावा लागेल. मुंबईतील हे एकमेव मार्केट आहे जे काळाशी सुसंगत राहिले आहे. साधारणत: स्वातंत्र्यानंतर १९५२ ते ५३ सालापासून हे मार्केट अस्तित्वात आले. तेव्हापासून आजपर्यंत काळानुरूप या मार्केटने आपले रागरंग बदलले आहेत. सुरुवातीला हे मार्केट इलेक्ट्रीक वस्तूंसाठी प्रसिद्ध होते. त्यानंतर हे मार्केट रेडिओसाठी नावाजले जाऊ लागले. त्यानंतर टीव्ही, व्हीसीआर, कॉम्प्युटर, मोबाईल अशी आधुनिकता या मार्केटने स्वत:मध्ये आणली. त्यामुळे आजही लॅमिंग्टन रोड हा मुंबईतील बाजारांचा कणा मानला जातो.

आज लॅमिंग्टन रोड हा डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग म्हणून ओळखला जातो. दक्षिण मुंबईतील ग्रॅण्ड रोड स्टेशनच्या पूर्वेला असलेल्या या मार्गाला इंग्रजांच्या काळात मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टन यांचे नाव देण्यात आले होते. लॅमिंग्टन हे १९०३ ते १९०७ या काळात मुंबईचे गव्हर्नर होते. या रस्त्याचे नाव सध्या बदलले असले तरी अजूनही हा रस्ता लॅमिंग्टन रोड म्हणूनच ओळखला जातो. हा रस्ता इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या होलसेल आणि रिटेल मार्केटसाठी प्रसिद्ध आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांमधून इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, टेलिव्हीजन आणि इतर वायरलेस वस्तू विकल्या जातात. येथील दुकानात मुंबईतील इतर भागांपेक्षा या वस्तूंची किमत कमी असते. त्यामुळे घाऊक खरेदी करणार्‍या लोकांचा येथे राबता असतो. हे मार्केट अस्तित्वात आले तेव्हा येथे इलेक्ट्रीकल वस्तू विकल्या जात होत्या. विद्युत हीटर, इस्त्री, गिझर, पंखे अशा वस्तूंना तेथे मागणी होती. मग रेडिओची क्रेझ आली आणि या मार्केटने आपला रंग बदलला. येथे चांगल्या कंपन्यांचे रेडिओ कमी किमतीत मिळू लागले. तसेच रेडिओचे स्पेअर पार्टही उपलब्ध होऊ लागले. तिच परिस्थिती टीव्ही, व्हीसीआर, कॉम्प्युटर आणि मोबाईलची आहे.

या बाजारातील दुकानात आधुनिक साहित्य तर मिळतेच पण त्याच बरोबर रेडिओचे आऊटडेटेड झालेले पार्ट, जसे ट्रान्सिस्टर, कॅपॅसिटर, केबल, साऊंड कार्ड, टीव्ही ट्युनर, अ‍ॅडॅप्टरही मिळतात. कॉम्प्युटरचे सर्वच स्पेअर पार्ट येथे मिळत असल्यामुळे ते खरेदी करून कॉम्प्युटर असेंबल करणारे मुंबईतील हजारो संगणक तज्ज्ञ आपल्या खरेदीसाठी येथेच येत असतात. कुठल्याही दुकाना तुम्ही शिरलात की नामांकित कंपन्यांचे स्पेअर पार्ट आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उपलब्ध होतात. पुन्हा पर्याय अनेक असल्यामुळे दर पटले नाहीतर दुसर्‍या दुकानात शिरण्याची सुविधाही येथे उपलब्ध होते. ही सर्व दुकाने अधिकृत असल्यामुळे येथे फसवले जाण्याची शक्यता नाही. यदाकदाचित फसवणूक झालीच दाद मागायला ही जागा असते. या मार्केटमध्ये साऊंड सिस्टीमही एकपेक्षा एक मिळतात. सोनीपासून व्हिडीओकॉनपर्यंत असंख्य कंपन्यांच्या साऊंड सिस्टीम या बाजारात उपलब्ध आहेत.

 विशेषत: मुंबईतील अनेक बाजार काळाच्या ओघात नष्ट होत असताना लॅमिंग्टन रोड मार्केटने आपले अस्तित्व मात्र टिकवून ठेवले आहे. त्याचे कारण फक्त आणि फक्त येथील विक्रेत्यांनी स्वत:मध्ये केलेले बदल हे आहे. बाजारात एखादी नवीन इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आली की मुंबईत प्रथम लॅमिंग्टन रोड मार्केटमध्ये मिळायलाच हवी असा या बाजाराच नावलौकीक आहे. ब्लू टूथ, वायर लेस इक्विपमेंट अशा असंख्य आधुनिकतेने हा बाजार रोज नवनवीन रुप धारण करतो. पण या बाजाराची एकच अडचण आहे. येथे तुम्हाला मनसोक्त फिरता येत नाही. कारण हा बाजार रस्त्यावर नसून तो दुकानांमध्ये आहे. त्यामुळे काहीतरी खरेदी करण्याचा बहाणा हा करावाच लागतो. तो करून मगच येथे जाणे सोयीस्कर असते. मुंबईतील या इलेक्ट्रॉनिक्स मार्केटला एकदा तरी भेट द्यायला हवी.

First Published on: December 9, 2018 4:29 AM
Exit mobile version