गुरुदत्तच्या हातून निसटलेला ‘चेम्मीन’

गुरुदत्तच्या हातून निसटलेला ‘चेम्मीन’

‘चेम्मीन’ या चित्रपटाबाबत प्रथमपासूनच आकर्षण होते. कारण गुरुदत्तला हा चित्रपट निर्माण करायचा होता. मल्याळम् भाषेतील मूळ कादंबरी ही चेम्मीन या नावाचीच आहे. ताझाखी शिवशंकर पिल्ले यांनी ती लिहिली आहे. परंतु गुरुदत्त यांचा बेत त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे साकार होऊ शकला नाही. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर जेमतेम वर्षभरातच 1965 साली मल्याळम्मध्ये हा चित्रपट दिग्दर्शक रामू करियात याने तयार केला आणि तो प्रदर्शितही झाला. त्याबरोबर रामू करियातलाही चांगली प्रसिद्धी आणि कीर्ती मिळाली. प्रेक्षकांना त्याचा चित्रपट आवडला, यात आश्चर्य नव्हते. कारण लोकप्रिय कादंबरीवरील चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता असतेच. त्यामुळे त्याला चांगले यश तर मिळालेच; पण विशेष म्हणजे राष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळवणारा पहिलाच मल्याळम् चित्रपट हा बहुमान चेम्मीनने मिळवला होता.

‘चेम्मीन’ या मल्याळममधील शब्दाचा अर्थ कोळंबी-झिंगा असा आहे. शिवशंकर पिल्ले यांची ही कथा केरळमधील किनारी प्रदेशातील, पावित्र्य-अव्यभिचाराची महती सांगणार्‍या, पारंपरिक लोककथेवर आधारलेली आहे. या कथेवरून पटकथा तयार करण्याचे काम पूरम सदानंदन यांनी केले. या लोककथेनुसार मच्छीमार समाजातील कुणा विवाहित महिलेने पतीशी तो समुद्रावर गेलेला असताना प्रतारणा केली, तर समुद्रदेवता-कडालम्मा म्हणजे समुद्रमाता, तिच्या पतीचा बळी घेते. केरळच्या किनार्‍यावरील मच्छिमारांच्या एका लहानशा गावात घडणारी ही कथा आहे. ‘चेम्मीन’ची नायिका करुतम्मा ही चेंबनकुंजू या महत्त्वाकांक्षी हिंदू मच्छिमाराची मुलगी असते. तिच्या पारीकुट्टी या तरुण मुस्लीम व्यापार्‍याबरोबरच्या विवाहपूर्व आणि विवाहोत्तर प्रेमसंबंधांची ही कथा आहे.

चेंबनकुंजूचे आयुष्यात एकच ध्येय असते. ते म्हणजे त्याला स्वतःच्या मालकीची बोट आणि जाळे असायला हवे असते. त्याचे हे स्वप्न पुरे करण्यासाठी पारीकुट्टी त्याला पैसे देतो. मात्र पारिकुट्टीची एकच अट असते. ती म्हणजे चेंबनकुंजूने बोटीच्या सहाय्याने केलेल्या मच्छिमारीत मिळालेली सारी मासळी-म्हवरा फक्त पारिकुट्टीलाच विकायचा. करुतम्माची आई चक्की हिला तिच्या मुलीचे प्रेमप्रकरण समजते. त्यामुळे ती करुतम्माला आपण कडक सामाजिक रूढींच्या बंधनात आयुष्य काढत आहोत आणि त्या मर्यादांमध्ये राहणेच आपल्याला भाग आहे याची जाणीव करून देते. त्यासाठी अशा प्रकारच्या प्रेमप्रकरणापासून तू दूरच राहायला हवे असेही ती बजावते.

आईच्या उपदेशाला मान देऊन करुतम्मा प्रेमावर पाणी सोडून, चेंबनकुंजूला मच्छिमारीच्या एका मोहिमेदरम्यान भेटलेल्या अनाथ मुलाबरोबर, म्हणजे पलानी बरोबर, विवाह करते. विवाह पार पडल्यानंतर प्रथेनुसार ती पलानीबरोबर त्याच्या गावी जाते. खरे तर त्यावेळी तिची आई खूप आजारी असते आणि वडील तिला काही दिवस येथेच रहा असे सांगतात, तरीही त्यांचे न ऐकता ती पलानीच्या गावी जाते. त्यामुळे रागावलेला चेंबनकुंजू तिरीमिरीने, तिचे आता या घराशी संबंध तुटले असे सांगतो. स्वतःच्या मालकीची बोट आणि जाळे मिळाल्यावर थोड्याच काळात चेंबनकुंजूकडे पैसा येतो आणि तो दुसरी बोट खरेदी करतो. पण त्याबरोबरच तो आणखी लोभी आणि निष्ठूर बनतो. पैशाच्या लोभानेच अप्रामाणिकपणाने तो पारिकुट्टीचे पैसे बुडवून त्याला दिवाळे काढणे भाग पाडतो.

बायकोच्या मृत्यूनंतर तो पप्पीकुंजूशी लग्न करतो. पप्पीकुंजू ही त्याने पारिकुट्टीकडून मिळालेल्या पैशाने ज्या माणसाकडून पहिली बोट विकत घेतलेली असते, त्याची आता विधवा झालेली पत्नी असते. सावत्र आई आल्यामुळे चेंबनकुंजूची धाकटी मुलगी पंचमी घर सोडून मोठ्या बहिणीकडे-करुतम्माकडे जाते. चेंबनकुंजूच्या पैशांची त्याची दुसरी बायको पप्पीकुंजू अफरातफर करते. आयुष्यातील त्या मोठ्या धक्क्याने चेंबनकुंजूची अवस्था वेड्यासारखी होते. दरम्यानच्या काळात करुतम्मा मोठ्या जिद्दीने प्रयत्न करून चांगली बायको आणि आई बनलेली असते. नीटपणे संसार करत असते.

पण नेमक्या त्याच काळात तिच्या आणि पारीकुट्टीच्या प्रेमप्रकरणाची गोष्ट गावभर पसरते. त्यामुळे पारीकुट्टीचे मित्र त्याच्यावर बहिष्कार टाकतात आणि त्याला त्यांच्याबरोबर मासेमारीसाठी घेऊन जाण्याचे नाकारतात. त्यातच करुतम्माच्या दुर्दैवाने एका रात्री तिची आणि पारीकुट्टीची अचानक गाठ पडते आणि त्यांच्यातील पूर्वीच्या काळातील प्रेम पुन्हा बहरते. एका रात्री पलानी एकटाच मासेमारीसाठी जातो. त्या मोहिमेवर असताना त्याला एक शार्क दिसतो. आणि शार्कला पकडण्यासाठी पलानी त्याचा पाठलाग करत करताना, सागरात निर्माण झालेल्या एका मोठ्या भोवर्‍यात सापडतो आणि सागर त्याला गिळंकृत करतो. योगायोग असा की, या दुर्दैवी घटनेच्या दुसर्‍याच दिवशी करुतम्मा आणि पारीकुट्टी दोघेही हातात हात घेतलेल्या स्थितीत समुद्रातून वाहून येऊन गावाच्या समुद्र किनार्‍यावर पडलेले आढळतात. आणि तेथून थोड्याच अंतरावर पलानीने पकडलेला मोठा थोरला शार्क मासा आणि पलानी दोघेही मृतावस्थेत किनार्‍यावर पडलेले आढळतात. तेथेच चित्रपट संपतो.

ताकाझी शिवशंंकर पिल्ले यांच्या कादंबरीवरून या चित्रपटासाठी पटकथा एस. एल. पुरम सदानंदन यांनी तयार केली होती. कानमणी फिल्म्स या बॅनरखाली निर्माण झालेल्या या चित्रपटाचे निर्माते होते बाबू इस्माइल सैत. रामू करियातने कादंबरीचे हक्क आठ हजार रुपये देऊन घेतले होते. त्या काळात मल्याळम कादंबरीसाठी ही रक्कम चांगलीच मोठी होती. पण त्याचा निर्णय बरोबरच होता हे चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद आणि पारितोषिकांवरून सिद्ध झाले.

या चित्रपटातील नायिकेच्या म्हणजे करीतम्माच्या भूमिकेसाठी त्याने अभिनेत्री शीला हिची निवड केली. ती मल्याळम चित्रपटांतील सर्वात लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री होती. त्या काळातली ती सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री होती. आणखी एक गोष्ट सांगायलाच हवी. शीलाच्या नावावर एक, बहुधा अबाधितच राहील असा विक्रम आहे. तिने प्रेम नझीर या अभिनेत्याबरोबर तब्बल 130 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळेच या जोडीची लोकप्रियता किती होती, हे वेगळे सांगण्याची आवश्यकताच भासू नये. कोट्टरक्कारा श्रीधरन नायर याने करुतम्माच्या वडिलांची, म्हणजे चेंबनकुंजूची भूमिका चांगल्या प्रकारे निभावली आहे. काही प्रसंगात त्याचे वागणे पाहून प्रेक्षकांनाही चीड यावी, एवढे ते प्रभावी आहे. फारसे न बोलणारा आणि अनेकदा स्वतःतच मग्न असणारा पारीकुट्टी अभिनेता मधू माधवन नायरनेे साकार केला आहे, तर करुतम्माच्या नवर्‍याच्या भूमिकेत सत्यन आहे. पण त्याला फारसे काम नाही आणि आहे, ते त्याने नीटसपणे केले आहे. चक्कीची त्या मानाने लहान भूमिका अदूर भवानी या अभिनेत्रीने साकारली आहे, तर पंचमीच्या भूमिकेत लता राजू आहे. इतर कलाकारांनीही चित्रपटाच्या दर्जाला साजेशीच कामे केली आहेत.

पण चित्रपटाचे खरे मानकरी सांगायचे झाल्यास दिग्दर्शक रामू करियात आणि छायाचित्रण करणारे मार्कस बार्टली (आणि अर्थातच शीला) यांचा उल्लेख करायलाच हवा. या दोघांनी या कलाकृतीवर असा ठसा उमटवला आहे, की त्यांच्याशिवाय अन्य कुणाची नावे या कामासाठी सुचूच नयेत. कथेचा वेग रामूने कुठेही कमी होऊ दिलेला नाही, त्यामुळे प्रेक्षकांना कंटाळा येण्याची शक्यताच नाही एवढे सारे खिळवून ठेवणारे आहे. समुद्राचे या कथेतील महत्त्व लक्षात घेऊन समुद्राच्या विविध अवस्थांचे आणि विविध काळातील समुद्राच्या रूपाचे दर्शन मार्कस बार्टली यांनी असे घडवले आहे की त्याचे विस्मरणच होऊ नये. (समुद्राची अशी विविध रूपे पाहताना अपरिहार्यपणे ‘रायन्स डॉटर’ या डेव्हिड लीन यांच्या चित्रपटाची आठवण होते. त्याबाबत याच सदरामध्ये पूर्वी लिहिले आहे.) समुद्र हा या कथेमधील एक पात्र आहे, हे ओळखून या दोघांनी त्याला यथोचित न्याय दिला आहे. चित्रपटातील काही दृश्ये तर एवढी प्रभावी आहेत, की त्यांची फ्रेम करून लावावी असे वाटते. त्यासाठी योग्य रंगसंगती आहे हे वेगळे सांगायला नको. चित्रपटाचे बहुतेक काम आटोपल्यावर मार्कस बार्टली यांना दिलीप कुमारच्या एका चित्रपटाच्या कामासाठी जायचे होते त्यामुळे बाकी राहिलेले थोडे काम राजगोपाल यांनी पूर्ण केले.

मल्याळम चित्रपटाला संगीत देण्याची जबाबदारी प्रथमच सलील चौधरी यांनी पत्करली होती आणि त्यांनी त्यांची निवड या कामासाठी किती अचूक होती ते आपल्या कामगिरीने दाखवून दिले आहे. मन्ना डे यांनी या चित्रपटात एक गीत गायले आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीसाठी करियातने अनेकांना विचारले होते. पण चित्रपट या कादंबरीच्या जवळपासही येऊ शकणार नाही, असे अनेकांचे मत होते. त्यामुळे रामू करियातला निर्माता मिळणे अवघड जात होते. त्याने अनेकांकडे तसेच केरळच्या राज्य सरकारकडेही मदत मागितली होती, पण कोठूनच त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर केवळ नशिबाने त्याची गाठ जेमतेम पंचविशीच्या तरुण इस्माइल सैतबरोबर पडली आणि इस्माइलने फायनान्सरची भूमिका पत्करली. कादंबरीत घडणारी कहाणी ही मलाप्पझुच्या किनार्‍यावर घडणारी असली, तरी तेथील पुराक्कड या गावातील काही लोकांनी बोटी वापरण्यासाठी पैसे मागितल्याने रामू करियातने तेथे चित्रीकरण न करता, त्याला परिचित असलेल्या नत्तिका या गावात केले. नंतर चित्रपटाला 40 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच्या कार्यक्रमात मधूने सांगितले होते की, नत्तिका येथील लोकांनी अगदी आपलेपणाने बोटीच काय त्यांच्या झोपड्याही आम्हाला मुक्तपणे वापरण्यासाठी दिल्या होत्या. शार्कच्या पकडण्याच्या शूटिंगच्या वेळी सत्यम समुद्रात बुडता बुडता वाचला होता हेही त्याने सांगितले.

सर्वोत्तम राष्ट्रीय चित्रपटाच्या सुवर्णपदकाबरोबर चेम्मीनला शिकागोच्या महोत्सवात प्रशस्तीपत्रक मिळाले होते, तर कान्स महोत्सवात माकैस बार्टली यांना छायाचित्रणासाठी सुवर्णपदक मिळाले होते. हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजीमध्येही डब करण्यात आला होता. त्यांची नावे अनुक्रमे ‘चेम्मीन लहरेयं’ आणि ‘अँगर ऑफ द सी’ अशी होती. उत्सुकता असलेल्यांनी इंटरनेटवर उपलब्ध असलेला चित्रपट आवर्जून पहायला हवा.

– आ. श्री. केतकर

First Published on: September 22, 2019 6:43 AM
Exit mobile version