पहिली महिला क्रांतिकारक

पहिली महिला क्रांतिकारक

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांप्रमाणेच अनेक स्त्री स्वातंत्र्यसैनिकांनी महत्वपूर्ण योगदान दिले. पण झाशीच्या राणी पूर्वीही एका रणरागिणीने शौर्य-धैर्य यांचे अलौकिक प्रदर्शन करत इंग्रजी सत्तेला आव्हान दिले. त्या होत्या कित्तूरची राणी चेन्नम्मा. १८५७च्या बंडापूर्वी ३३ वर्षे आधी चेन्नम्मा यांनी ब्रिटीश राजवटीला आपल्या शौर्याच्या सहाय्याने आव्हान दिले. पण त्यांचे कार्य आणि शौर्य याबाबत अनेकांना माहिती नाही. आज राणी चेन्नम्माची जयंती आहे. त्यानिमित्त तिच्या कार्याची माहिती घेऊया. २३ ऑक्टोबर १७७८ मध्ये कर्नाटक मधील काकती या छोट्याशा गावात धुलप्पा आणि पद्मावती या दाम्पत्याच्या पोटी चेन्नम्माचा जन्म झाला. पुढे कित्तूरचे संस्थानिक मल्लसर्जा देसाई यांच्याशी चेन्नम्मांचा विवाह झाला. चेन्नम्मा कन्नडसह संस्कृत, मराठी आणि उर्दू भाषांची जाणकार होती. त्याचप्रमाणे ती तेजस्वी रणरागिणीसुद्धा होती. कर्नाटकातील कित्तूर हे आजचे शहर बेळगाव जिल्ह्यातील संपगांवच्या दक्षिणेला सुमारे ७ कोस अंतरावर आहे. कित्तूरची राणी होण्यापूर्वीच लहानपणीच लोक तिच्या बहादुरीमुळे तिला ओळखायचे. बालवयातच चेन्नम्माने घोडेस्वारी, तलवारबाजी, तिरंदाजी अशा त्याकाळच्या युद्धकलेतल्या महत्वाच्या अंगांचे शिक्षण घेतले होते. मल्लसर्जा देसाईचे चेन्नम्माशी लग्न होण्यापूर्वी रुद्राम्माशी पहिले लग्न झाले होते. रुद्रम्मापासून त्याला शिवलिंग हा मुलगा झाला होता. रुद्रम्माच्या पश्चात चेन्नम्मेचा विवाह मल्लसर्जाशी झाल्यावर तिला एक मुलगा झाला. पण त्याचा लवकरच मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर अल्पावधीतच मल्लसर्जाचेही निधन झाले. पोटचा मुलगा आणि पतीचे निधन झाल्यानंतर चेन्नम्माने तिचा सावत्र मुलगा शिवलिंग याला गादीवर बसवले. त्याचा राज्याभिषेक केला. पण १८२४ मध्ये शिवलिंगाचाही मृत्यू झाला. शिवलिंगप्पाच्या पश्चात चेन्नम्माने नात्यातील गुरुलिंग मल्लसर्जा याला दत्तक घेतले. त्याचाही तिने राज्याभिषेक केला. यावेळी ब्रिटीशांनी तिचे दत्तकपत्र नामंजूर करुन कित्तूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. चेन्नम्माने इंग्रजांविरुद्ध लढण्याची पूर्ण तयारी केली. ब्रिटीशांच्या प्रचंड फौजफाट्याला न घाबरता तिने बंडाळी करुन स्वतःचं सैन्य उभं केलं.
२३ ऑक्टोबर १८२४ च्या लढाईत संस्थान खालसा करणारा, धारवाडचा तेव्हाचा कलेक्टर थॅकरे, चेन्नम्माच्या सैन्याने मारला. चेन्नम्माची ही लढाई फार काळ चालली नाही. ३ डिसेंबर १८२४ रोजी चेन्नम्माला पकडली गेली. कित्तूरचे राज्य बेळगाव जिल्ह्याला जोडले गेले. युद्धबंदी बनवून चेन्नम्माला बैलहोनंगळच्या किल्ल्यात पाठवलं आणि तिथेच तिचा २१ फेब्रुवारी १८२९ साली मृत्यू झाला. कित्तूर संस्थान खालसा केलं. यावेळी इंग्रजांनी किल्ल्यांमध्ये जी लूट केली त्यामध्ये १६ लाख रुपये रोख व ४ लाखांचे जवाहीर, घोडे, उंट, हत्ती यांसह ३६ तोफा, बंदुका, तलवारी आणि प्रचंड दारूगोळा असा बराचसा माल होता.
राणी चेन्नम्माच्या निधनानंतर १८२९ मध्ये सांगलीच्या रायाप्पा पाटलाने देसायांच्या दत्तक मुलास पुढे करुन इंग्रजांपुढे आव्हान उभे केले. परंतु या आव्हानालासुद्धा ब्रिटीशांनी शह दिला. बेळगावपासून ५० किमी अंतरावर कित्तूरचा किल्ला आजही चेन्नम्मांची कहाणी सांगत उभा आहे. आपल्या जनतेच्या हक्कासाठी ब्रिटीशांसोबत दोन हात केलेल्या चेन्नम्माच्या शौर्याच्या खुणा कर्नाटक आपल्या अंगावर अभिमानाने मिरवत आहे. चेन्नम्माच्या कार्याची दखल घेत ११ सप्टेंबर २००७ रोजी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते संसदभवनच्या प्रांगणात राणी चेन्नम्मा यांच्या दिमाखदार पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. राणी चेन्नम्मा या पहिल्या स्त्री क्रांतिकारकाच्या शौर्यगाथेस प्रणाम.

First Published on: October 23, 2019 6:35 AM
Exit mobile version