समुद्रकिनारे फुलले! सु्ट्टीसाठी लोकांनी केली गर्दी!

समुद्रकिनारे फुलले! सु्ट्टीसाठी लोकांनी केली गर्दी!

समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीची मजा

मे महिना आणि भटकंती हे समीकरण नेहमीचेच. परीक्षा संपल्या सुट्टी लागली आता पुढे काय? हा प्रश्न नेहमीचाच. आजकालच्या मुलांना टीव्ही, गॅजेट्स यापासून दूर ठेवणे म्हणजे पालकांसाठी एक मोठा टास्कच आहे. पण तरीही सुट्टी लागली की, समुद्रकिनारे माणसांनी फुलून जातात. यासाठी मुंबईचे समुद्रकिनारे देखील अपवाद नाहीत. विविध समर क्लासेस झाल्यानंतर मुलांना आणि पालकांनादेखील वेगळे काहीतरी करण्याची इच्छा असते. मुंबईमध्ये समुद्रकिनाऱ्यावर जाऊन पाण्यात खेळणे आणि वाळूचे डोंगर बनविणे यामधील मजा काही औरच! सध्या हीच मजा लुटताना मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी पाहायला मिळते आहे.

सुट्टी लागल्यापासून येणारा प्रत्येक शनिवार आणि रविवार मुंबईतील गिरगाव चौपाटी, मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी, अक्सा हे समुद्रकिनारे माणसांनी अगदी फुलून गेले आहेत. मुलांना आवडणाऱ्या काटूर्न्सचे फुगे, पाईपचे साबणाचे फुगे, थंडगार बर्फाचे गोळे, चौपाटीवरील मिळणारे चाट, गरम गरम मसालेदार चणे आणि वाळूने भरलेले मुलांचे हात हा देखावाच बघणाऱ्यांना एक आनंद देऊन जातो. पालकही यावेळी मुलांबरोबर लहान होतात आणि आपले लहानपण अनुभवत असतात. अगदी फुगे घेऊन हवेत सोडून देण्यापासून ते वाळूमध्ये किल्ले बनविण्यापर्यंत पालकही आपल्या मुलांच्या आनंदात सहभागी होताना दिसत आहेत. वाळूपासून मुलांना लांब न ठेवता त्यांच्या बरोबरीने आपणही लहान होऊन त्यांना साथ देण्यातच खरी मजा आहे. सध्या मुंबईतील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर हेच दृष्य दिसत आहे.

आजकाल मोबाईल आणि टॅबलेटच्या जगात रमणारी मुलं अशी चौपाटीवर खेळताना आणि रमताना पाहणं हादेखील वेगळेपणाच म्हणावा लागेल. मुलांना या गॅजेट्सपासून दूर ठेवण्यासाठी समुद्रकिनारा हा खूपच चांगला पर्याय पालकांसमोर असतो. किनाऱ्यावर मुलं वेगवेगळ्या खेळांमध्ये रमताना दिसत आहेत. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून मुलांसाठी वेळ काढून समुद्रकिनाऱ्याचा आनंद लुटणारे पालक सध्या मुलांबरोबरच सुट्टीचा आनंद घेत आहेत. मुलांनादेखील एक वेगळ्या प्रकारचे आयुष्य यातून मिळते आहे हे नक्की आणि ते घरात बसून गॅजेट्सच्या दुनियेत रमण्यापेक्षा नक्कीच वेगळे आणि विलोभनीय आहे.

First Published on: May 8, 2018 10:54 AM
Exit mobile version