गाण्याची शोभा वाढवणारा गाण्यातला कोरस!

गाण्याची शोभा वाढवणारा गाण्यातला कोरस!

काही गाणी अशी असतात की जी कोरसशिवाय अपुरी असतात

काही गाणी अशी असतात की जी कोरसशिवाय अपुरी असतात किंवा त्यांना कोरसचा आधार म्हणा किंवा टेकू हा लागतोच. कोरस म्हणजे समूहाने गाणं. यामुळे त्या गाण्यात रंग भरतात, गाण्याला वेगळाच उठाव येतो. गाण्याच्या उद्योगनगरीत कोरसमध्ये गाणार्‍या गायक कलाकारांची एक वेगळी जमात असते, यावरून कुणालाही समजावं की कोरस ही काही गाण्यांची अत्यावश्यक बाब असते, काही गाण्यांची सपोर्ट सिस्टिम असते.

कोरसची सगळ्यात अपरंपार गरज कुणाला असते तर ती देशभक्तीपर गीतांना. ‘आनंदमठ’मधलं लता मंगेशकरांनी अजरामर करून ठेवलेल्या ‘वंदे मातरम’ या गाण्यातला कोरस ते गाणं एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. गाण्यात दाटलेली सगळी स्फूर्ती एकवटून व्यक्त करतो. कवीने त्याच्या शब्दांत लिहिलेली आशयघनता या कोरसमुळे दाटून येते. ‘उपकार’मधल्या ‘मेरे देश की धरती, सोना उगले उगले हिरे मोती’ या देशभक्तीपर गीतात तर बैलांच्या गळ्यातल्या घुंगरानेही जणू कोरस दिला आहे असा भास होतो. ‘मेरे देश की धरती’ या गाण्यातला कोरस तसा मुद्दाम रांगड्या आवाजातला वापरण्यात आला आहे.

मुळात महेंद्र कपूरनी त्या गाण्यात आपल्या खड्या आवाजाचा वापर खूप खुबीने केला आहे. ‘शहीद’मधल्या ‘ऐ वतन, ऐ वतन, हम को तेरी कसम’ या गाण्यातल्या कोरसमध्ये एक प्रकारची कवायती शिस्त आहे. ‘मेरा रंग दे बसंती चोला’ या गाण्यात तर देशासाठी मरमिटण्याचा निग्रह, कणखरपणा ठायी ठायी दिसतो असं त्या गाण्यातलं भारावून टाकणारं वातावरण आहे. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेल्या मराठीतल्या ‘अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे’ या देशभक्तीपर गाण्यातही कोरसचा छान वापर करून घेण्यात आलेला आहे. त्यातल्या ‘मातीमधल्या कणाकणातून, स्वातंत्र्याचे घुमते गायन’ या अंतर्‍यातल्या शब्दांसाठी तर खर्जातला कोरस फारच भारावून टाकतो. हृदयनाथ मंगेशकरांनी शरद जांभेकरांकडून हे गाणं गाऊन घेतलं तो काळही स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा असला तरी स्वातंत्र्याची महती, किंमत कळलेला होता. अशा काळात हे गाणं खूप मोठा संदेश देऊन गेलं.

हृदयनाथ मंगेशकरांचा विषय निघालाच आहे आणि आपण जर गाण्यात देण्यात येणार्‍या कोरसविषयी आपण बोलणार असू तर ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’ या गाण्याचा विषय येणं कोणत्याही परिस्थितीत अपरिहार्य आहे. याचं कारण या गाण्यातला कोरस हे या गाण्याचं देखणं नेपथ्य आहे किंवा या गाण्यातली बारीक नक्षीदार कलाकुसर आहे. सुरेश भटांनी लिहिलेल्या आणि घनगंभीर सामाजिक आशय असलेल्या या कवितेला हृदयनाथ मंगेशकरांनी लावलेल्या चालीतच मुळात एक धीरोदात्त विचार आहे. त्यामुळे या गाण्याची सुरुवात होतानाच जो आर्त कोरस सुरू होतो ती आर्तता ऐकणार्‍याच्या अगदी अंगावर येते. ते गाणं संपतानाही तसं सहजासहजी संपत नाही. गाणं संपताना हळूहळू अस्तंगत होत जाणारा तो कोरस ते संपूर्ण गाणं आपल्या अंतर्मनात ठेवून जातो, गाण्यात मांडलेल्या वेदनेचा, विवंचनेचा खोल खोल चटका लावून जातो. या गाण्यातला कोरस म्हणूनच निव्वळ अविस्मरणीय ठरलेला आहे. कोरसचा वापर कलात्मक पध्दतीने करून घेणं हे खरं तर संगीतकाराचं कसब असतं आणि मुरब्बी संगीतकार त्याचा वापर किती चलाखीने आणि चतुराईने करून घेत असतो त्याचा सुरेल नमुना म्हणजे ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’ हे हृदयनाथ मंगेशकरांचं गाणं आहे.

‘ब्रह्मचारी’ या हिंदी सिनेमातल्या ‘दिल के झरोको में तुज को बिठा कर’ या गाण्यातला फक्त महिलांच्या आवाजाचा वापर करून घेतलेला कोरसही ऐकणार्‍याच्या कानांचा वेध घेतल्याशिवाय राहत नाही. खरंतर हा कोरस गाऊन घेताना त्यांना कोणतेही शब्द देण्यात आलेले नाहीत. हा कोरस फक्त सुरावट गाऊन जातो. पण त्यातली गंमत शब्दात सांगता येणार नाही इतकी वेगळी आहे. ‘जल बिन मछली, नृत्य बिन बिजली’ या सिनेमातल्या ‘तारों में सज के’ या गाण्यातही महिलांच्याच आवाजातला कोरस आहे. पण तो खोल खोल डोहासारखा गूढ असला तरी ऐकायला इतका गोड वाटतो की पुन्हा पुन्हा ऐकत राहावासा वाटतो. या गाण्याच्या अंतर्‍यातले ‘है घटा ओं के दो नैन में काजल, रूप का मुख पर डाले सुनहरा सा आंचल’ हे शब्द या कोरसमध्ये ऐकताना तर आत कुठेतरी ओरखडा उमटवून जातात. असाच आतून हलवून टाकणारा कोरस आहे तो ‘संबंध’मधल्या ‘चल अकेला, चल अकेला, चल अकेला, तेरा मेला पिछे छुटा राही चल अकेला’ या गाण्यात. इथेही महिलांच्याच आवाजातला कोरस आहे. पण तो संपूर्ण गाण्यात व्यक्त झालेल्या एकटेपणाच्या वेदनेची छाया गडद करून टाकतो आणि गाणं ऐकणार्‍याच्या कानामनापर्यंत ते कारूण्य पोहोचवतो.

‘ओह रे ताल मिले नदी के जल में’ या ‘अनोखी रात’मधल्या गाण्यात तर ‘ओ हा अई रे, अई रे, अई रे’ असा गाण्याच्या सुरुवातीलाच येणारा कोरस अतिशय रहस्यमय वाटतो. आणि त्यानंतर कोरसमध्ये ऐकू येणारं ते गुणगुणणं खरोखरच वेड लावणारं आहे. गाण्यातल्या या कोरसमुळेच हे गाणं गायलेल्या मुकेशदांचा आवाज अधिक उठावदार होतो हे नाकारता येत नाही.

1990 च्या सुमारास श्रीधर फडकेंनी संगीत दिलेला आणि सुरेश वाडकरांनी गायलेला ‘ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था’ हा अभंग इथल्या आध्यात्मिक वातावरणात वाजू लागला आणि कॅसेटच्या त्या युगात या अभंगाने विलक्षण जादू केली. या अभंगातला ‘तुज नमो’ असा कोरसही निश्चितच मंत्रमुग्ध करून टाकणारा आहे. ‘तुज नमो’ या शब्दांसाठी कोरसचा वापर करण्याची कल्पनाच मुळात विलक्षण आहे. देवळाच्या गाभार्‍यात घुमणार्‍या सुरांसारखा हा कोरस हा अभंग संपल्यावरही मनात तरळत राहतो हा या कोरसचा विशेष आहे.

निरनिराळ्या गाण्यातल्या निरनिराळ्या कोरसची अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. गाण्याची शोभा वाढवणारा कोरस हा कधी कधी गाण्याचा अवयव होऊन जातो. दुसर्‍या शब्दात सांगायचं तर गाण्यातून हा कोरस वजा केला तर गाणं हे अवयव निखळलेल्या देहासारखं वाटू लागेल! कोरस हा म्हणूनच गाण्याच्या गळ्यातला अलंकार म्हटला तर वावगं ठरू नये!

First Published on: February 3, 2019 4:05 AM
Exit mobile version