सिनेमांचा टाईमपास…?

सिनेमांचा टाईमपास…?

क्रिकेटमध्ये ट्वेंटी ट्वेंटी मॅचच्या युगात कसोटीचे प्रेक्षक आता जरा घटलेत, सामन्याचा निकाल पाचव्या दिवशी येणार म्हटलं की तेवढी एक्साईटमेंट उरत नाही. भारतातच नाही तर जगभरात लोकांचा माध्यमांकडे असो अथवा खेळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. धकाधकीच्या काळात मनोरंजनसुद्धा सुपरफास्ट हवं असतं, एकता कपूरच्या डेलीसोपप्रमाणे एक थापड मारली की, सगळ्या घराची प्रतिक्रिया दाखवण्यात आणि ती बघण्यात आता कुणाला रस उरला नाही. एकंदरीत काय तर सर्वकाही पटकन आणि क्रिस्पी मिळालं, तर प्रेक्षकांना ते अधिक भावतं, अशावेळी सिनेमांची लांबी कमी होणं साहजिक आहे. पण जेव्हा तीन-साडे तीन तासांचा सिनेमा बघण्याची सवय असणारा प्रेक्षक, अगदीच दीड अन् दोन तासांचे सिनेमे पाहणं पसंद करतो त्यावेळी निर्मात्यांना असे सिनेमे बनविण्याशिवाय पर्यायच उरत नाही. चांगला कंटेंट पडद्यावर दाखविण्यासाठी सिनेमाची लेंथ वाढवावीच लागते का? आणि सिनेमाची लेंथ वाढली म्हणजे सिनेमे रटाळ होतात का? असे अनेक प्रश्न आहेत, आता उत्तर कितपत मिळते हे पाहावं लागेल.

बॉलिवूडमध्ये कमी लांबीच्या सिनेमांची सुरुवात ही काही आजची नाही, बॉलिवूडचा पहिला सिनेमा राजा हरिश्चंद्र हा केवळ 40 मिनिटे लांबीचा होता. आता पहिलाच सिनेमा असल्याने साहजिकच त्याची लांबी कमीच असणार होती, पण त्यांनतरही अनेक कमी कालावधीचे बॉलिवूड सिनेमे आपल्याकडे येऊन गेले. सिनेमाची गुणवत्ता ही त्याच्या लांबीवर आधारलेली नसते तर त्यात असलेल्या आशयावर आधारलेली असते, आशय उत्तम असेल आणि तो सादर करणारा जर कमी कालावधीत तो सादर करू शकत असेल तर याहून चांगलं अजून काय? कमी कालावधीचे सिनेमे बनविण्याचे अनेक फायदे आहेत, एक म्हणजे लोकांकडे जास्त वेळ नसल्याने जर छोटा सिनेमा असेल तर ते अधिक चांगला प्रतिसाद देतात. निर्मात्यांना देखील हे सोयीचे असते, म्हणजे हंसल मेहता सारखा दिग्दर्शक जो एक दीड कोटींमध्ये सिनेमा बनवतो, तो अगदीच 95 मिनिटांत सिनेमा उरकून टाकतो. तिसरा फायदा होतो मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनवाल्यांना म्हणजे जिथं अडीच ते तीन तासांच्या सिनेमाचे दिवसाला 5 खेळ दाखविले जातात, तिथे दीड दोन तासांचा सिनेमा 6 ते 7 वेळा दाखवता येऊ शकतो. ज्याचा परिणाम सिनेमाच्या व्यवसायावर होतो.

व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला तर कमी कालावधीचा सिनेमा हा फायदेशीर आहे, पण याचा अर्थ असा नाही की, कमी कालावधीच्या सिनेमांच्या नावाखाली तद्दन फालतू असं काही तरी प्रेक्षकांसमोर सादर करणं. अगदी मागच्याच महिन्यात आलेला जय मम्मी दी हे त्याचच एक उदाहरण, 103 मिनिटांची लांबी असलेला हा सिनेमा कथा आणि सादरीकरण दोन्ही विषयात सुमार दर्जाचा होता. कमी कालावधीच्या सिनेमांची संख्या ही गेल्या काही वर्षांत अधिक झाली आहे, फार जुना असा विचार न करता केवळ मागच्या वर्षी आलेल्या कमी कालावधीच्या सिनेमांचा विचार केला तर ही बाब अधिक ठळक होईल. मागील वर्षी बदला (118 मिनिट), ब्लँक (107 मिनिट), गेम ओव्हर (102) ,अर्जुन पटियाला (107), फोटोग्राफ (110), द बॉडी (101) आणि मर्दानी 2 (103) यापैकी बर्‍याच कमी लांबीच्या सिनेमांना लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.

यातील बरेचसे सिनेमे थ्रिलर प्रकारातले होते आणि थ्रिलर सिनेमात लांबी ही एका मुख्य कलाकाराचे काम करत असते हे सत्य आहे, थ्रिलर सिनेमात आयटम साँग किंवा इतर वेळकाढू गोष्टींना स्थान दिले जात नाही. जर तसं केलं तर प्रेक्षकांचं लक्ष विचलित होण्याची शक्यता असते, अशावेळी मूळ कथेशी प्रेक्षकांची नाळ जोडून ठेवण्यासाठी यात कमीतकमी वेळेत उत्तम देण्याचा प्रयत्न केला जातो. बॉलीवूडमध्ये मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या कमी लांबीच्या थ्रिलर सिनेमांचे एक वैशिष्ठ्य होते. किती लोकांनी ते पाहिले माहीत नाही, पण यातील बहुतांश सिनेमे एकतर रिमेक होते किंवा इतर इंडस्ट्रीमध्ये प्रदर्शित झाले होते. द बॉडी, गेम ओव्हर, बदला हे त्यापैकी काही सिनेमे, म्हणजे अजूनही मूळ बॉलिवूडमध्ये थ्रिलरपटांच्या लांबीबाबत तेवढा विचार केलेला पाहायला मिळत नाही.

ऐतिहासिक सिनेमे किंवा इतर काही कथा ज्यांची मागणी ही अडीच ते तीन तासांची असते. कारण ऐतिहासिक सिनेमांत पात्रांची ओळख करून देण्यात आणि कथा बिल्ट करण्याला वेळ द्यावा लागतो. प्रत्येक पात्राची ओळख करून देण्यातच वेळ निघून जातो आणि सिनेमाची लांबी वाढते. अगदी गेल्यावर्षी आलेला पानिपत हे त्याचच एक उदाहरण. काहीवेळा कथेची डिमांड असल्याने देखील लांबी वाढते, म्हणजे गेल्यावर्षी ब्लॉकबस्टर ठरलेला कबीर सिंग सिनेमा हा जवळपास तीन तासांचा होता तरी प्रेक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. इतर प्रकारात जिथे कथेची मागणी कालावधीवर अवलंबून नाही तिथे मात्र निर्मात्यांना विचार करावा लागतो.

लांबी मोठी असेल आणि कथा उत्तम असेल तर आधी प्रेक्षक सिनेमा पाहायचे. एल ओ सी कारगिल, मेरा नाम जोकर पासून ते लगान, जोधा अकबर, मोहब्बतेंपर्यंत अनेक मोठ्या लांबीचे सिनेमे प्रेक्षकांनी पाहिले आहेत. हे सर्व मात्र काहींसाठीच मर्यादित आहे, हे निर्मात्यांनी लक्षात घ्यावे, जशी प्रेक्षकांची आवड बदलते तशीच सिनेमा सादर करण्याची पद्धत देखील निर्मात्यांनी बदलायला हवी. आता जा सिमरन जा असं अमरीश पुरीने म्हटल्यावर सिमरनने ट्रेनमध्ये बसायला 10 मिनिटे लावली तर सिमरनच्या ऐवजी प्रेक्षक बाहेर निघतील. म्हणून मोठ्या लांबीचे रटाळ सिनेमे बनवणं सहसा निर्मात्यांनी टाळावं, मागच्या वर्षी आलेले कलंक (166), दबंग 3 (160), पहिलवान (166), पल पल दिल के पास (154) यांसारखे मोठे सिनेमे प्रेक्षकांनी नाकारले आहेत. यांच्या अपयशात कथा आणि इतर दोषांसह लांबी हे सुद्धा एक कारण आहे.

उत्तम सिनेमा बनविण्यासाठी हवी असते चांगली कथा आणि त्या कथेला त्याहीपेक्षा उत्तम सादर करणारा दिग्दर्शक. कुठलाही दिग्दर्शक किंवा चित्रपट निर्माता आपल्याला दीड तासांचा सिनेमा बनवायचा आहे किंवा साडे तीन तासांचा सिनेमा बनवायचा आहे, असा विचार करून शुटिंग करत नसतो. त्याच्यासाठी उत्तम सिनेमा प्रेक्षकांपर्यंत गेला पाहिजे आणि त्याला प्रेक्षकांनी दाद द्यायला हवी हेच महत्त्वाचे असते. सिनेमाचा कालावधी हा त्याच्यासाठी गौण असतो. अशावेळी सिनेमाच्या एडिटरची भूमिका महत्त्वाची असते, सिनेमाचा दिग्दर्शकच जर उत्तम संपादक असेल तर सिनेमा देखील उत्कृष्ट बनतो. सिनेमाची लांबी वाढण्यात किंवा घटण्यात याच एडिटरची भूमिका असते. राजकुमार हिरानी सारखा चांगला एडिटर असेल तर कलाकृती पाहण्यालायक बनते, एकंदरीत काय तर, सिनेमा हा लांबलचक टाईमपास करणारा नसावा, ना कमी कालावधीच्या नावाखाली टाईम निभावून नेणारा असावा. कथेला सादरीकरणाची जोड देऊन निखळ मनोरंजन करणारा सिनेमा असेल तर तो नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.

-अनिकेत म्हस्के

First Published on: February 2, 2020 5:03 AM
Exit mobile version