शास्त्रीय गायक दत्तात्रय पलुसकर

शास्त्रीय गायक दत्तात्रय पलुसकर

पंडित दत्तात्रेय विष्णु पलुसकर उर्फ बापूराव पलुसकर यांचा आज स्मृतिदिन. दत्तात्रय पलुसकर हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनशैलीतले प्रसिद्ध गायक होते. त्यांचा जन्म १८ मे १९२१ गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुसकर व रमाबाई या दाम्पत्यापोटी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड (जि. कोल्हापूर) येथे झाला. दत्तात्रय यांना बापूराव व डी. व्ही. अशा नावानेही ओळखत असत. त्यांना बालपणापासूनच विष्णु दिगंबरांनी गायनाची तालीम देण्यास सुरुवात केली. विष्णु दिगंबरांचे निधन (१९३१) झाल्यामुळे दुर्दैवाने ही तालीम अल्पजीवी ठरली. पुढील काही काळ बापूरावांना त्यांचे चुलत बंधू चिंतामणराव यांचीही तालीम मिळाली. पुढे विष्णु दिगंबरांचे ज्येष्ठ शिष्य विनायकबुवा पटवर्धन यांनी पलुसकर कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांनी बापूरावांना १९३५ साली पुण्यात आणले आणि गांधर्व महाविद्यालयात त्यांचे पुढील गाण्याचे शिक्षण सुरू झाले. या काळात विनायकबुवांची वैयक्तिक तालीम तसेच बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य मिराशीबुवा यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. शिवाय पं. नारायणराव व्यास यांच्या हाताखालीही त्यांनी संगीतसाधना केली. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची संगीत प्रवीण ही सर्वोच्च परीक्षा ते उत्तीर्ण झाले. काही वर्षे त्यांनी गांधर्व महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य देखील केले. वडिलांची आणि ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात करून अल्पावधीतच ते आपल्या स्वतंत्र प्रतिभेमुळे श्रेष्ठ गायक बनले. वयाच्या १४ व्या वर्षी जालंधर येथे झालेल्या त्यांच्या गायनामुळे त्यांना प्रथम प्रसिद्धी मिळाली. त्यांनी त्यांची स्वतःची गायनशैली निर्माण केली व चौफेर वाढविली.

बापूरावांचा आवाज निकोप, निर्मल आणि अतिशय सुरेल होता. सादरीकरणात सुंदर, सुरेल आलापी ते करायचे. बहारदार सादरीकरण, रागाची विलक्षण वेगळी पण आकर्षक मांडणी, सुरांचा आर्त प्रवाहीपणा, रागाचे शुद्ध स्वरूप, भावपूर्ण प्रकटीकरण, स्वच्छ, जलद पण वजनदार तानांच्या लडी या वैशिष्ठ्यांमुळे त्यांचे गायन कमालीचे रंजक आणि वेगळी अनुभूती देणारे होई. भारत सरकारने १९५५ सालच्या पूर्वार्धात चीनला पाठविलेल्या सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळात त्यांचा समावेश केला होता. तिथे त्यांचे अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. त्यांच्या गायनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका निघाल्या. त्यांमध्ये तिलक कामोद (कोयलिया बोले), गौडमल्हार (बनरा ब्याहन), गौंडसारंग (पिऊ पलन लागी), नंद (अज हूँ नही आये), ललत (अरे मन राम), श्री (हरि के चरण कमल) या ध्वनिमुद्रिका आहेत. रागदारी गायनाबरोबरच भजन गायनावरही त्यांनी आपला ठसा उमटविला होता. ‘रघुवीर तुम को मेरी लाज’, ‘चलो मन गंगा जमुना तीर’, ‘ठुमक चलत रामचंद्र’, ‘वैष्णव जन तो’ या भजनांनी त्यांना खूप प्रसिद्धी प्राप्त झाली. बैजू बावरा या १९५२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी उस्ताद अमीरखाँ यांच्याबरोबरची देशी रागातील ‘आज गावत मन मेरो’ ही जुगलबंदी त्यांच्या अलौकिक गायनाची प्रचिती देते. अशा या महान शास्त्रीय गायकाचे २५ ऑक्टोबर १९५५ रोजी निधन झाले.

First Published on: October 24, 2021 11:45 PM
Exit mobile version