स्वच्छ! सुंदर! सिक्कीम

स्वच्छ! सुंदर! सिक्कीम

सिक्कीम

सुट्ट्यांमध्ये नेहमी पडणारा प्रश्न तो म्हणजे कुठे जायचे? उन्हाळी सुट्ट्या आणि दिवाळी सुट्ट्यांमध्ये मुंबईत जाणवणारा उकाडा असह्य होतो आणि आपसुकच सुट्ट्यांचे प्लॅनिंग थंड हवेच्या ठिकाणी केले जाते. गेल्या सुट्टीत मी आणि माझ्या आईच्या बकेट लिस्टमधील सिक्कीम टूर करायचे फायनल केले. मुंबई ते कोलकाता हा प्रवास विमानाने तर कोलकाता-सिक्कीम ट्रेनने करायचे ठरवले. कोलकाताहून ट्रेनने न्युजलपायगुडी हा ११ तासांचा ट्रेन प्रवास… पण हा प्रवास रात्री केल्यामुळे तो इतका जाणवला नाही. शिवाय मुंबई आणि कोलकात्याच्या उकाड्यातून बाहेर पडल्यानंतर एक सुखद गारवा प्रवासात जाणवू लागला.

घाटाघाटातून मार्ग काढत आमचा मिनी बसने प्रवास सुरु झाला. जाताना मध्येच दुधाळ वाहणारी नदी, त्या नदीत कपडे धुवायला आलेल्या महिला, लहान मुलं हे इतक्या लांबूनही स्पष्ट दिसत होतं. तिथे थांबल्यानंतर त्यांची आदरातिथ्य करण्याची पद्धत सगळं अगदी छान होतं. एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यावर तुम्ही लोकल फूड चाखलं नाही तर तुमची सगळी टूर व्यर्थ असते. त्यामुळेच आम्ही लोकल फूड खायचं ठरवलं आणि आमची मिनीबस प्रियांका नावाच्या एका छोटेखानी हॉटेलात थांबवण्यात आली. अगदी साधं पण चविष्ट जेवणाचा आनंद आम्ही तिथे घेतला. नंतर गंगटोकच्या प्रवासाला तृप्तीचा ढेकर देऊन निघालो.

उंच डोंगरावर वसलेली गावं. घरासमोर असलेली छोटी-छोटी फुलं झाडे बघून गंगटोकही स्वर्गापेक्षा कमी नाही असे वाटते. यात तिबेट म्युझियम, तिबेटीयन मॉनेस्ट्री, लाचुंग मोनास्ट्री फ्लॉवर व्हॅली, ताशी व्ह्यू पॉईंट, गंगटोक रोप वे, युमेसाम्डोंग (झीरो पॉइंट) बघतांग धबधबा, त्सोम्गो आणि चांगु लेक अशा काही ठिकाणांचा समावेश आहे. या शिवाय चीन बॉर्डरच्या जवळ असणारे हनुमान टोक आणि गणेश टोक ही दोन मंदिरेही सुंदर आहेत. दूर डोंगराकडे हात दाखवून लोकं चीन असल्याचे आवर्जून पर्यटकांना दाखवतात.

डोंगर-घाटावर असून देखील एखाद्या मेट्रो सिटीला मागे टाकेल असे सिक्कीम शहर आहे. अगदी वाहतुकीच्या नियमांपासून ते दुकानांच्या जागांपर्यंत सगळं काही ठरलेलं. ठिकठिकाणी ट्राफीक पोलिसांच्या छोट्या छोट्या चौकी अगदी प्रसन्नपणे गाड्यांना दिशा दाखवणारे पोलीस. मुळातच लोकसंख्या कमी असल्यामुळे कुठेही बोकाळलेली वस्ती नाही. त्यामुळे गाड्या कमी, शिवाय डब्यातून ओसंडून वाहणारा कचरा सिक्कीम शहरात कुठेच पाहायला मिळत नाही. गंगटोकमधील महात्मा गांधी मार्केट म्हणजे शॉपिंग करणार्‍यांसाठी पर्वणीच. बाजारात कोणालाही गाड्या घेऊन जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे गेटवर गाडी सोडून तुम्हाला मार्केटमध्ये जावं लागतं. गाड्या नाहीत त्यामुळे दोन्ही बाजूंना असणार्‍या दुकानांमध्ये तुम्ही मनसोक्त फिरु शकता. मधेच बसायची सोय केल्यामुळे बसूही शकता. ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये महिला या घर चालवण्यासाठी काम करताना दिसतात. सिक्कीमला देखील हीच पद्धत आहे. इथे महिला नोकरी करतात तर पुरुष गाड्या चालवण्याचे काम करतात. त्यामुळे तेथील दुकानांमध्ये महिला काम करताना अधिक दिसतात. विशेष म्हणजे मोठ्या पदांवर महिलाराज असल्याचे पाहायला मिळते.

जर तुम्ही डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये इथल्या नथुला बाय पासला गेलात तर तुम्हाला या ठिकाणी बर्फाच्छित परिसर पाहायला मिळतो. पण हे ठिकाण पाहायला मिळणे नशिबात असायला हवे. कारण या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर अनेकदा लँड स्लाईडिंग होते. अशावेळी हे ठिकाण पर्यटनासाठी बंद केले जाते. दुर्दैवाने आम्ही ठरविलेल्या वेळेत येथे मुसळधार पाऊस पडल्यामुळे आम्हाला नथुला बाय पास, बाबा मंदिर आणि सगळ्यात सुंदर अशा चांगु लेकचे दर्शन घेता आले नाही; पण ही ठिकाणे पाहण्यासाठी इतका प्रवास करुन पुन्हा जाण्याची मी आणि माझ्या आईची तयारी आहे. तेव्हा आता पुन्हा एकदा सिक्कीमला जाण्याचे प्लॅनिंग करायचे आहे.

-लीनल गावडे

First Published on: October 30, 2018 2:50 AM
Exit mobile version