भारत में इंडिया

भारत में इंडिया

गांधी बाबाचा फोटो लावायचा आणि एकदम त्याच्या विचारांच्या विरुद्ध वागण्याची सध्या पद्धत आहे. पण बापूंचा विचार डोक्यात घेतल्याशिवाय, तो आचरणात आणल्याशिवाय आपल्याला पुढे जाणे आजतरी अडचणीचे आहे. बापू म्हणाले होते की, ‘विकास म्हणजे काय तर, समाजातल्या सर्वात खालच्या माणसाला डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी मिळून विचारपूर्वक टाकलेले एक पाऊल.’

भारतात कुठेही जा तुम्हाला दोन देश एकत्र रहात आहेत असे जाणवेल. मी सध्या रहाते आहे त्या जव्हार- मोखाडा भागात तर हे फारच जाणवते आहे. शेजारचा जिल्हा जगाची आर्थिक राजधानी आणि त्याच्या दोन तासांवरच्या गावांमध्ये अजूनही लहान मुलं मरतात. कारण त्याचं पोषण व्यवस्थित झालं नाही म्हणून. पहिल्यांदा मी इथे आले आणि आमच्या एका संचालकाबरोबर फिल्ड पहायला गेले होते तर जेवढी माणसे पाहिली ती सर्व फक्त हड्डी दिसणारी. पहिल्यांदा वाटलं की फिल्ड दाखवत आहेत तेव्हा मला दुःख कळावं यासाठी खास निवडलेली गावं असावी. पण जसजसा प्रवास होत होता तस तसं माझ्या लक्षात आलं की, सगळीकडे सारखंच आहे. ते संचालक संस्थेच्या कामाचा परिचय करून देताना म्हणाले, ‘आपण अशा लोकांबरोबर काम केले किंवा पुढेही करणार आहोत त्यांना ‘भूक’ नावाची गोष्ट असते हे सांगावे लागते’. पहिल्यांदा ही अतिशयोक्ती वाटली होती, आता रोजच अनुभवते आहे.

एकीकडे आठशे का कितीतरी करोड रुपयांचे घर असलेले लोक आहेत आणि इथे गरोदर स्त्रीला बेसिक तपासण्या करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचे असेल तर बससाठी लागणारे रोख चाळीस रुपये नसल्यामुळे पोटात काहीतरी गडबड आहे हे कळत असूनही दवाखान्यात न जाता गावठी इलाज करीत मृत्यूला सामोरे जाणार्‍या शेकडो स्त्रिया एकीकडे. एका शासकीय अधिकार्‍यांच्या बैठकीत आदिवासी लोकांसाठी काय केले तर त्यांचे अकाली मृत्यू थांबवू शकतो अशी गंभीर चर्चा सुरू होती. मी त्यात अशी सूचना मांडली की डोंगराळ प्रदेशामुळे आणि विखुरलेल्या लोकवस्तीमुळे कोणाचेही सरकार आले तरी शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र प्रत्येक गावापर्यंत पोहोचवता येणार नाही. मग आपण शिक्षणासाठी आश्रमशाळा सुरू केल्या. त्या फार छान चालताहेत असं नाही; पण एक व्यवस्था तयार झाली आणि त्यामुळे शिक्षणाची संधी अनेकांना उपलब्ध झाली. तसं शासनाने मोखाडा-जव्हार सारख्या अतिदुर्गम भागात गरोदर स्त्रियांना बसचा प्रवास मोफत करू द्यावा. तिचं गरोदर असणं हेच प्रमाणपत्र. तर पहिली प्रतिक्रिया आली की बायका याचा गैरवापर करतील. मला तर हसूच आले; पण राज्यकर्त्यांच्या नजरेने विचार करून पाहिला तरी मनात प्रश्न आला, किती बायका गैरफायदा घेतील? शासनाचे किती नुकसान होईल? समजा झाले नुकसान तर काय? निरव मोदीने केलेल्या नुकसानीचे आपण काय केले? पण कुठलीही बचत कायम गरिबांपासूनच सुरू होते. कशाचीच का लाज वाटत नाही आम्हाला? तुम्ही म्हणाल यात लाज का वाटायची? आणि ती आम्हाला का वाटेल? ते त्यांच्या कर्माने गरीब राहिले. झेपवत नाही तर एवढी मुलं कशाला जन्माला घालता? खरं आहे तुमचं. कदाचित या फुकटच्या बस प्रवासाने प्राथमिक आरोग्य केंद्रात एकदा का हे गरीब पोहोचले की त्यांच्यात कुटुंब नियोजनाबद्दल बोलण्याची एक संधी निर्माण होते असं का आपण याकडे पहात नाही? हा माझा प्रश्न आहे.

त्यांना विकास करायची इच्छा असती तर त्यांनी आमच्यासारखे शहरात येऊन कष्ट करायचे होते. हा एक विचार कायम शहरात राहणार्‍या माणसाच्या मनात असतो. खरं तर हे मला आधीपासून माहिती होते की, हे गावाकडचे अडाणी लोक गावाला सांभाळून राहिले नसते आणि त्यांनीही तुमच्यासारखे शहराकडचे रस्ते धरले असते तर तुम्हाला मला शहरात ज्या बागा, मोकळ्या जागा शिल्लक दिसत आहेत ना त्या दिसल्या नसत्या. विचारा कसं? खरं तर आपणही सर्व कुठल्या ना कुठल्या गावाकडूनच शहरात आलो. जेव्हा आपण आलो होतो तेव्हाही आपल्या आधी आलेल्याने आपल्या नावाने बोटेच मोडली होती आणि ते हे विसरुन गेले की आपणही कधीतरी असेच गावाहूनच आलेलो आहोत. ते विसरले तसे आपणही विसरलो. दिवसेंदिवस शहरं फुगत चालली आहेत. आपली शहरं कशी बेढब वाढत आहेत, ढेरपोट्या माणसासारखी हे पाहायचे असेल तर एकदा विमानाने प्रवास कराच. गुजरातवरून मुंबईला येताना आपण समुद्रावर काय डेंजर अतिक्रमण केले आहे याचा अंदाज येईल. समुद्राने थोडी जरी हालचाल केली तर काय होईल हे निसर्गाने आपल्याला मिठी नदीच्या रुपाने दाखवून दिले आहे. पण एका अनुभवाने सुधारलो तर आपण माणसं कसली?

मी तुम्हाला सांगते आहे. कारण तरुण देशाचे नेतृत्व करीत आहेत. २०१४ ला कोणाच्या तरी प्रचारात मिळालेली माहिती खरी आहे हे मानलं आणि आधीच्यांना घरी पाठवून नवीन विकास करू पाहणार्‍यांना संधी तुम्ही दिलीत आणि त्याच्या गौरवात तुम्ही पुढची तीन वर्षे रमलात. प्रश्न सत्तेवर ‘हे’ का ‘ते’ असा नाहीच आहे. प्रश्न आहे आपण कशाला विकास म्हणायचे. मला आसरा मिळाला, दोन वेळची भाकरीची व्यवस्था झाली म्हणजे विकास झाला की अजूनही कोणीतरी माझ्या इतका जेवायचा बाकी आहे आणि तीही माझीच जबाबदारी आहे, असं मानून विकासाची व्याख्या करायची हा खरा प्रश्न आहे. प्रसिद्ध नेते भाऊ फाटक यांना भेटायला आम्ही गेलो होतो. चर्चा सुरू होती आणि कोणीतरी त्यांना प्रश्न विचारला, ‘भाऊ, तुम्ही कसे चळवळीत आलात, तुमचं तर घरी चांगलं होतं?’ ‘मी जेव्हा माझ्या आनंदासाठी बागेत जातो आणि तिथं कोणीतरी जेव्हा एक वेळच्या भाकरीसाठी भीक मागत असतो, मला आनंदाने ती बाग अनुभवता येत नाही, तो आनंद मला घेता यावा यासाठी समानता, सर्वांना आदरयुक्त जगण्याची संधी मिळावी म्हणून मी चळवळीत आलो.’ कधीच विसरलं जात नाही भाऊंचे हे उत्तर.

सध्या आपण काहीतरी पैसे कमवायला जातो, विचार करीत नाहीत की हा मार्ग बरोबर आहे का? कशासाठी पैसे कमवायचे हे ठरलेले नसल्यामुळे टार्गेटच्या जाळ्यात अडकतो, मग मरेस्तोवर पळतो टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी. आपण जितके पळतो तेवढे टार्गेट वाढतच जाते. मग थकतो आणि किती पळालो याचा हिशेब काढायला जातो तर कमावलेला पैसा, त्यासाठी गमावलेली वेळ, दुखावलेली माणसं आणि तणावातून आलेल्या आजारांना थोपवण्यासाठी भरलेली डॉक्टरची बिलं यांचा हिशेब केला की लक्षात येतं अधिक वजा करून हाती फार काही राहिलेलं नसतं आणि पुढे पळण्याची ताकदही उरलेली नसते. मग थोडं हळू जायला, विचार करून मग जायला काय हरकत आहे. यात ज्यांनी ज्यांनी भाऊंसारखा दुसर्‍याचा विचार केला, त्यासाठी जमेल तेवढा वेळ, बुद्धिमत्ता, पैसे, ज्ञान, श्रम गुंतवले त्यांचे आयुष्य आनंदाने जाण्याच्या शक्यता वाढल्या आणि त्यांच्या या निर्णयामुळे इतरांच्याही आयुष्यात आनंदाचे क्षण येण्याच्या शक्यता वाढल्या.

जोपर्यंत गाव, शहर एकत्र होती तोपर्यंत बरेच प्रश्न सोपे होते. तेव्हा किमान प्राथमिक आणि माध्यमिक शाळा एकत्र होत्या जिथे श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब एकाच शाळेत एकत्र होते. त्यामुळे सगळेच जमिनीवर राहण्याची शक्यता होती. आता केजीपासूनच श्रीमंताच्या, अतिश्रीमंताच्या शाळा वेगळ्या झाल्या आहेत. त्यामुळे गरीब हे आळशी असतात, त्यांना काम करण्याची इच्छा नसते किंवा मागच्या जन्माचे पापाचे फळ ते आता भोगताहेत किंवा सर्व श्रीमंत म्हणजे चोर असतात, त्यांनी कमावलेला प्रत्येक पैसा हा त्यांनी चोरीतूनच कमावलेला असतो आणि ते सतत कोणाला ना कोणाला लुबाडत असतात, असे दोन्ही बाजूने गैरसमजाचे इमलेच्या इमले तयार होतात आणि समाज अधिकाधिक एकमेकांविरुद्ध कडवा होत जातो.

गांधी बाबाचा फोटो लावायचा आणि एकदम त्याच्या विचारांच्या विरुद्ध वागण्याची सध्या पद्धत आहे. पण बापूंचा विचार डोक्यात घेतल्याशिवाय, तो आचरणात आणल्याशिवाय आपल्याला पुढे जाणे आजतरी अडचणीचे आहे. बापू म्हणाले होते की, ‘विकास म्हणजे काय तर, समाजातल्या सर्वात खालच्या माणसाला डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी मिळून विचारपूर्वक टाकलेले एक पाऊल.’ थांबू या ना जरा. आपल्या समाजातल्या शेवटच्या माणसाला शोधूया. कदाचित फार शोधावं लागणार नाही, फक्त संवेदनशीलपणे डोळे उघडून बघण्याची गरज असावी लागेल. तुम्ही परत फिरण्याची, उलटा प्रवास करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही थोडं थांबलात तर त्या शेवटच्या व्यक्तीला तुमच्यापर्यंत पोहोचणे सोपे जाईल कदाचित. आणि मग सगळे मिळून चालूया हसत खेळत. कुठल्याही द्वेषाशिवाय. मग असेल भारत तरी किंवा कदाचित इंडिया तरी…

First Published on: May 12, 2019 4:05 AM
Exit mobile version