संगीतकार दीनानाथ मंगेशकर

संगीतकार दीनानाथ मंगेशकर

खाडिलकरांच्या ‘मानापमान’ या संगीत नाटकातील ‘शुरा मी वंदिले’ ‘रवी मी प्रेम सेवा शरण’ ‘भाली चंद्र असे’ ही पदे  तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘संन्यस्त खड्गं’ नाटकातील ‘शतजन्म शोधताना’, वीर वामनराव जोशी यांच्या रणदुंदुभिमधील ‘परवशता पाश दैवे’ या सारखी पदे आजही कानात रुंजी घालायला लावणारे स्वर्गीय आवाज लाभलेले अत्यंत देखणे आणि सुंदर व्यक्तिमत्व म्हणजे ‘दीनानाथ मंगेशकर’. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०० रोजी गोमंतकातील मंगेशी इथे झाला. दीनानाथांच्या पूर्वजांचे मूळ आडनाव नवाथे, वतनी नाव देसाई, पण देवस्थानाच्या संरक्षणासाठी त्यांनी अभिषेकी हे आडनाव घेतले. गणेशभट आणि येसूताई अभिषेकी यांना चार अपत्ये झाली; दीनानाथ थोरले, नंतर विजया (विजया कृष्णराव कोल्हापुरे), मग कमलनाथ आणि शेवटची देवयानी.

अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण दीनानाथ यांच्या अंगी होते. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणे आत्मसात केले. ते उपजत धीट आणि हजरजबाबी होते. शिवाय नृत्य आणि संगीत याची त्यांना लहानपणापासूनच आवड होती. त्यामुळे त्यांनी संगीतात केलेली प्रगती पाहून त्यांचा लौकिक सर्वत्र पसरला होता. त्याच कारणासाठी त्यांना एकदम तीन कंपन्यांची बोलावणी आली. पण ती नाकारून १९१४ मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीत दीनानाथांचा प्रवेश झाला. १९१५ मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. पुढे १९१८ मध्ये एका ध्येयवादी, नावीन्याची आवड असलेल्या ‘बलवंत संगीत मंडळी’ नावाच्या नाटक कंपनीची त्यांनी स्थापना केली. गावोगावी बळवंत संगीत मंडळीची नाटकं गाजू लागली. यशाच्या पायर्‍या एका मागोमाग एक सर होत होत्या. त्यावेळी त्यांनी शास्त्रीय गायनात आपले वेगळे स्थान निर्माण केले.

गडकर्‍यांनी ‘भावबंधन’ हे नाटक केवळ बलवंत मंडळींसाठीच लिहिले. या नाटकातली ‘लतिका’, ‘पुण्यप्रभाव’मधली ‘कालिंदी’, ‘उग्रमंगल’मधली ‘पद्मावती’, ‘रणदुंदुभी’मधली ‘तेजस्विनी’, ‘राजसंन्यास’मधली ‘शिवांगी’ या भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयाने विशेष गाजविल्या. ‘उग्रमंगल’ नाटकात ‘छांडो छांडो बिहारी’ या ठुमरीवर ते नृत्य करत. हा ‘ठुमरी नाच’ हे त्या काळी रंगभूमीवरचे फार मोठे आकर्षण ठरले होते. विश्राम बेडेकर यांनी लिहिलेले ब्रह्मकुमारी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेले संन्यस्त खड्गं या नाटकांना त्यांनी सुंदर संगीत दिग्दर्शनाने सजवले. त्यांच्या बलवंत पिक्चर्सने अंधेरी दुनिया, कृष्णार्जुन युद्ध, भक्त पुंडलिक असे काही हिंदी-मराठी चित्रपटही बनवले. या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन दीनानाथांचेच होते.

‘अंधेरी दुनिया’त त्यांनी भूमिकाही केली होती. ‘कृष्णार्जुन युद्ध’मध्ये ते ‘अर्जुन’ होते. ‘भक्त पुंडलिक’ मध्ये त्यांनी एका साधूची भूमिका केली होती. ते एक उत्तम गायक तर होतेच, पण उत्तम ज्योतिषीही होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थानं अशी दैवी देणगी लाभलेल्या या दिग्गज कलाकाराचे २४ एप्रिल १९४२ रोजी निधन झाले.

First Published on: December 29, 2020 5:02 AM
Exit mobile version