संपादकीय : नीतिमत्ता लयाला गेली !

संपादकीय : नीतिमत्ता लयाला गेली !

राजकारणात नीतीमत्ता आता शिल्लक राहिलेली नाही. कोणताही पक्ष स्वत:ला कितीही स्वच्छ आणि पवित्र मानत असला तरी त्यात काही खरे नाही. प्रत्येक राजकीय पक्षाच्या केंद्रस्थानी सत्ता असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष सत्ता मिळण्यासाठी उपलब्ध सर्व साधनांचा वापर करतात. मग त्या साधनांची शुचिर्भूतता हा मुद्दा गौण असतो. ज्या पक्षाकडून सत्ता जाते तो मग नीतीमत्तेच्या गोष्टी सांगतो, तर ज्या पक्षाला सत्ता मिळते तो अशा कारवायांना राजकारण म्हणत असतो. त्यात खरं काय आणि खोटं काय हे ठरवण्याचा अधिकार अर्थातच जनतेचा असतो. देशात लोकशाही प्रस्थापित झाल्यापासून कमी अधिक फरकाने पवित्रता बासनात गुंडाळून अशा मार्गांचा अवलंब वारंवार होत आलेला आहे. देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी असताना अन्य पक्षाचे नेते, उमेदवार फोडणे, त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेणे अशा गोष्टी वारंवार घडत आल्या आहेत. मग त्याला विविध राज्यातील राजकारणदेखील अपवाद ठरलेले नाही. त्याचा परिणाम आता असा झाला की, अन्य पक्षाचे आमदार नेते फोडणे, त्यांना आपल्या पक्षात सामावून घेणे याबद्दल देशातील जनतेला फारसे काहीही वाटेनासे झाले आहे. त्यामुळे आताच कोणाला यात नीतीमत्ता शोधायची झाल्यास ते जनतेच्या दृष्टीकोनातून फारसे महत्त्वाचे राहिलेले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिन अहिर यांनी आपला पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, तेव्हा नीतीमत्ता आणि पावित्र्याच्या गोष्टी सांगितल्या गेल्या, पण खरंच अशा पावित्र्याच्या गोष्टी एखाद्या राजकीय पक्षाने बोलाव्यात काय? या देशातला मतप्रवाह राष्ट्रनिष्ठेचा होता आणि त्यावरच काँग्रेस विचारसरणीच्या नेत्यांनी पन्नास वर्षे सत्ता उपभोगलेली होती, पण या नेत्यांना आपल्याला निवडून देणार्‍या या मतप्रवाहाबद्दल पोटशूळ झाला. त्यामुळे मग त्यांनी राष्ट्रनिष्ठा हा विषयच बाजूला ठेऊन त्याचा पोरखेळ केला. राष्ट्रनिष्ठा म्हणजेच भाजप असा गैरसमज याच काँग्रेस आणि त्यातून फुटून बाहेर पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या वाचाळवाणीतून देशातील जनतेला करून दिला. एखादा कार्यकर्त्या अथवा नेता पक्ष संघटना वाढवत असतो तेव्हा तो जनतेच्या संपर्कात असतो. जनतेला काय हवंय, नकोय याचा त्याच्या इतका समज अन्य खचितच कोणाला असतो. अशावेळी तो स्थानिक नेता अथवा कार्यकर्त्याला तत्वज्ञान सांगून पक्षाची संघटना वाटत नाही. याच्या उलट त्याच्याकडून जनमानस काय आहे, हे जाणून घेऊन त्यानुसार नेतृत्त्वाला ध्येयधोरणांना मुरड घालणे आवश्यक आहे. त्याच पक्षाला मग भवितव्य असते. त्याचे भान सोडून नेते व पक्ष भरकटत गेला, तर स्थानिक नेता आणि कार्यकर्त्याला पर्याय रहात नाही. आपले स्थानिक राजकीय अस्तित्त्व टिकवण्यासाठी त्याला अशा नेतृत्त्वापासून दूर जावे लागते. सचिन अहिर यांना आपल्या मतदारसंघातून निवडून येण्याची शक्यता नव्हती. तसे त्यांनी जाहीररीत्या स्पष्टही केलेले आहे. ते जेव्हा अशी शक्यता वर्तवतात तेव्हाच ते पक्षनेतृत्त्व जनमताप्रमाणे कार्यरत नसल्याचा इशारा देत आहेत. त्यानुसार पक्षनेतृत्त्वाने आपला मतप्रवाह बदलला असता तर कदाचित सचिन अहिर पक्षातून दूर गेले नसते. त्यामुळे सचिन अहिर यांनी पक्ष बदलल्याचा दोष जितका त्यांचा आहे तितकाच तो पक्षनेतृत्त्वाचाही नाही का?
अहिर आज शिवसेनेत आले त्यांचा मुख्य उद्देश हा जिंकणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून जिंकू शकत नाही, याची कल्पना अहिर यांना आहे. त्यांच्याबाबतीत बोलायचे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज त्यांना जिंकण्याची शाश्वती देऊ शकत नाही. त्यामुळे सचिन अहिर यांनी आपला पक्षच बदलला आहे. अशावेळी त्यांना झुंजण्याचा सल्ला देणे यात काय हशील आहे? निदान लढण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्याचे काम तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाने करायला नको काय? त्यासाठी नेतृत्त्वाने प्रवाह आपल्या बाजूने फिरवणे गरजेचे आहे, पण तसे न करता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून लढायची हिंमत बाळगण्याचे सल्ले दिले जात आहेत. हे नेमके कशाचे प्रतिक आहे. सचिन अहिर यांनी लोकमत जाणून निर्णय घेतला आहे. हे लोकमत जर आज त्यांच्या पक्षाच्या विरोधात असेल तर ते आपल्या बाजूने फिरण्यासाठी पक्षनेतृत्त्वाला प्रयत्न करणे गरजेचे होते. तसे प्रयत्नच झाले नाहीत तर अहिर आणि त्यांच्यासारख्या राष्ट्रवादीतील असंख्य स्थानिक नेत्यांनी नेमके काय करावे? लोकमताच्या विरुद्ध जाऊन लोकशाहीत जिंकता येत नाही. सत्ता हाती असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जो पोरखेळ केला आज त्याचा परिणाम सचिन अहिर यांच्यासारख्या नेत्यांना सहन करावा लागत आहे. सत्ता हातात होती तेव्हा बहुतांश हिंदू समाजाला गुन्हेगार आणि दहशतवादी ठरवणे हे जनमताच्याविरोधी होते आणि ते जनमत इतके प्रक्षुब्ध झाले की, आज त्यात संपूर्ण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष वाहून गेले आहेत. मात्र, पक्षनेतृत्वाला त्यांची चूक उमगलेली नाही. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने आपला कौल कोणाच्या बाजूला, याचा ट्रेलर दाखवला होता. त्यातून शहाणपण घेऊन प्रवाहाच्या बाजूने पोहणे गरजेचे होते. मात्र, कथित पुरोगाम्यांच्या मागे लागत त्याच चुका कायम ठेवल्या. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना त्या चुका उमगल्या होत्या. कदाचित नेतृत्त्वाने असे प्रयत्न केलेही असतील, पण नेतृत्त्वाला आपल्या पारंपरिक राजकारणाला मुरड घालता आली नाही. हिंदूंच्या भावभावनांशी केलेला खेळ कायम राहिला आणि २०१९ सालातही जनमताच्या रेट्याने या पक्षांना खालसा केले. यावेळी मात्र स्थानिक नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा बांध तुटला आणि त्यांनी बाहेरचा रस्ता पकडला.
सचिन अहिर यांना जसा जिंकणारा पक्ष हवा होता तसेच शिवसेनेलाही जिंकणारा आणि पक्ष संघटना वाढवणारा नेता हवा होता. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा शिवसेनेचा मानस आहे. त्यांच्यासाठी सर्वात सुरक्षित म्हणून वरळीचा मतदारसंघ निश्चित करण्यात येत होता. मात्र, या मतदारसंघात सचिन अहिर यांचे आव्हान होते. ते पेलणे शिवसेनेला जड जाऊ शकत होते. मात्र, सचिन अहिर हेच शिवसेनेत आल्यामुळे आता वरळीचा मतदारसंघ हा आदित्य ठाकरेंसाठी आता मुंबईतील सर्वात सुरक्षित मतदारसंघ झाला आहे. त्यामुळे शिवसेनेनेही सचिन अहिर यांच्या प्रवेशाबद्दल कोणतेही आडेवेढे घेतलेले नाहीत. एका राजकीय पक्षाचा तोटा झाला असताना दुसर्‍या राजकीय पक्षाचा मात्र त्यातून फायदा होत आहे. राजकारण हे फायदा आणि तोट्यात कधीच सामावून गेले आहे. त्याचदृष्टीने आज त्याच्याकडे पाहिले जात आहे.

First Published on: July 27, 2019 10:32 AM
Exit mobile version