काँग्रेसची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार

काँग्रेसची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार

सध्या संपूर्ण जगात करोना या विषाणूने कहर केला आहे. कहर कसला या विषाणूने भारतासह संपूर्ण जगाचे कंबरडेच मोडले आहे. करोनाच्या संकटापेक्षा आता अधिक संकट असणार ते म्हणजे अर्थव्यवस्थेचे. अर्थव्यवस्थेच्या संकटाची झळ जशी सगळ्या जगाला बसणार आहे तशीच ती कैकपटीने भारताला आणि विशेषतः महाराष्ट्राला बसणार आहे. भारतात तर करोनामुळे महाराष्ट्रासारखे राज्य पुरते हतबल झाले आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्र्रात आणि विशेषतः मुंबईमध्ये करोना रुग्णांची वाढणारी आकडेवारी आणि मृतांची आकडेवारी यामुळे राज्य सरकार पुरते हवालदिल झाले आहे. आधीच राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असताना राज्यात महाविकास आघाडीचे म्हणजेच शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कसेबसे सरकार राज्यात स्थापन झाले. सरकार स्थापन होऊन काही महिने उलटत नाहीत तोच या महाविकास आघाडी सरकारपुढे करोनाच्या रूपाने नवे संकट उभे राहिले.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना असलेला प्रशासकीय कामांचा अनुभव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सगळ्यांना समजून घेण्याची वृत्ती यामुळे सुरुवातीला वाटले की, महाविकास आघाडी सरकार निश्चित करोनाच्या संकटात मार्ग काढेल, पण तसे होताना काही दिसले नाही. त्याचमुळे आज खेदाने म्हणावे लागत आहे जनता करोनात आणि राज्य सरकार कोमात…होय कोमात..हा शब्द जाणीवपूर्वक इथे वापरावा लागत आहे त्याचे कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या सुरू असलेली धुसफूस आणि हात झटकण्याची वृत्ती. खरंतर ठाकरे सरकारमध्ये अनुभवी असे नेते आहेत, पण त्या नेत्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेण्यास मुख्यमंत्री अयशस्वी ठरलेत का? तर याचे उत्तर कदाचित हो असेच असेल. हीच नाराजी खुद्द माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील बोलून दाखवली असेल बहुदा. खरंतर राज्याचे नेतृत्व केलेल्या आणि केंद्रातील कामाचा अनुभव असलेल्या ‘बाबां’चा उपयोग ठाकरे सरकारला या संकटाच्या काळात नक्कीच करता आला असता, पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. यामुळेच की काय ‘बाबां’नी एका कार्यकर्त्याशी फोनवर बोलताना मी मंत्रिमंडळात नाही, पण शिफारस करेन. आमचे सरकार नाही, हे शिवसेनेचे सरकार आहे, पण आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे उपयोग होईल असे वाटत नाही असे सांगितल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला तितके महत्त्व नाही का? असा या निमित्ताने प्रश्न उपस्थित झाला. इतकेच नाही तर राज्यातील नेतृत्वाकडे प्रशासकीय कौशल्याचा अभाव असल्याचे दिसते, असेदेखील पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आणि त्यानंतर आपल्या बोलण्यातून चुकीचा अर्थ काढला गेल्याचा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता.

जर पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दोन्ही वक्तव्यांकडे पाहिले तर ‘बाबां’ची ही वक्तव्ये नेमकी आली कोणत्या भावनेतून आणि तीही या संकटाच्या काळात. एखादं विधान करण्यापूर्वी ‘बाबां’कडून दहा वेळा विचार केला जातो. पृथ्वीराज चव्हाण जे बोलतात ते नेहमी अभ्यासपूर्वक बोलतात हा त्यांचा इतिहास आहे, पण अचानक ‘बाबां’नी हे आमचे सरकार नाही शिवसेनेचे सरकार आहे असे वक्तव्य केले आणि राजकीय वर्तुळात एकच कुजबुज सुरू झाली. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दोन्ही वक्तव्यांचा सारासार विचार केला तर एकच गोष्ट लक्षात येते की, संकटाच्या काळात ठाकरे सरकारने आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हवर भर न देता तसेच मुख्य सचिव आणि अधिकार्‍यांवर विसंबून न राहता पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या अभ्यासू आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या नेत्यांच्या मदतीने राज्याला संकट काळातून बाहेर काढण्याची आवश्यकता होती. मात्र, दुर्दैवाने तसे घडले नाही आणि हे सरकार शिवसेनेचे सरकार असल्याची भावना पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या मनात आली असावी.

एकीकडे पृथ्वीराज चव्हाण यांची अशी अवस्था असताना ठाकरे सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसच्या इतर मंत्र्यांचीदेखील काही वेगळी परिस्थिती नाही. मंत्री असूनही या मंत्र्यांना करोनाच्या संकटात आपल्या कामाची छाप पाडता आलेली नाही. ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण सध्या करोना पॉझिटिव्ह असल्याने रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. मात्र, त्यांनादेखील सुरुवातीच्या काळात नांदेड वगळता कुठेच वाव मिळाला नसल्याचे जाणवत आहे. अशोक चव्हाण हेदेखील राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले असून, त्यांच्या अनुभवाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निश्चितच उपयोग करून घेता आला असता, पण तसे झाले नाही. तर दुसरीकडे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे फक्त पत्रकार परिषदा आणि कॅबिनेटच्या बैठका या पलीकडे दिसले नाहीत. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री असूनदेखील अमित देशमुख यांनाही या काळात काहीच करता आले नाही. विशेषतः ते या परिस्थितीत कुठेच दिसले नाही. तर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल देखील हेच जाणवले.

एखाद दुसरा निर्णय सोडला तर त्यांनादेखील कोणतीच छाप पाडता आलेली नाही. यावरून एकच जाणवते की काँग्रेसचे मंत्री हे फक्त नावापुरतेच मंत्री आहेत की त्यांना या सरकारमध्ये काही करण्याची संधी नाही. एकीकडे राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांचे अस्तित्व दिसत नसतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील महाराष्ट्र सरकारला काँग्रेस सहकार्य करत आहे, पण राज्यात काँग्रेसला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य केले आणि राज्यात करोनाच्या संकटात हे सरकार अस्थिर झाले की, काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या मनात सध्या काय सुरू आहे देवच जाणो…पण एकंदरीत चित्र पाहता जनता करोना संकटात असताना महाविकास आघाडी मात्र कोमात आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

First Published on: May 31, 2020 5:29 AM
Exit mobile version