काँग्रेस नेत्यांची शेपूट वाकडी!

काँग्रेस नेत्यांची शेपूट वाकडी!

वाईटातही काँग्रेस पक्षाला चांगले दिवस पाहायचे आहेत. देशात त्या पक्षाची अवस्था बिकट असली तरी अशी बिकट अवस्था असलेले पक्ष देशाच्या सत्तेवरही येत असतात, हे भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलं आहे. तेव्हा सातत्याने हार मानण्याचं कारण नाही, हे काँग्रेसवाल्यांना पटलं असेल. पण म्हणून सत्ता घरात बसून मिळत नसते, हे त्यांना आता तरी कोणी सांगायची आवश्यकता आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वबळाचा नारा ज्या तोर्‍यात दिला जातो ते पाहिलं की मी एकटाच बुडणार नाही, तुम्हालाही घेऊन बुडू, अशी धाटणी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशने घेतली होती. आपल्या ताकदीचा अंदाज न घेता अशा अपेक्षा केल्या की माणसं त्यांना वेड्यात काढत असतात. काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांची अशीच काहीशी अवस्था झाल्याचं दिसतं. सातत्याने त्याच घोषणा देत काँग्रेस पक्ष राज्यात कलुषितपणा करत होता. राज्यात आणि देशात सध्या काँग्रेस पक्षाला चांगले दिवस नाहीत, हे तो पक्ष मान्य करेल. साम, दाम, दंड, भेद या नीतीचा बेमालूम वापर करत भारतीय जनता पक्षाने सत्तेचा वारू उधळला. देशात गेल्या सात वर्षात भाजपने ज्या प्रकारे सत्ता राबवली ते पाहता आणखी काही वर्षं त्या पक्षाला सत्तेपासून दूर करणं एकाकी कोणालाच शक्य नाही. स्वत:च्या ताकदीवर जो कोणी तसा प्रयत्न करेल त्यांच्या वाट्याला, सीबीआय, ईडी, आयकर या सारख्या संस्थांचा ससेमिरा लागणं हे ठरलेलं गणित आहे. या गणितात जे उतरतील तेच सत्तेपुढे आवाज करतील हे स्पष्ट आहे. ती ताकद आजतरी काँग्रेस पक्षाकडे नाही. पी. चिदंबरम यांना ज्या प्रकारे बदनाम केलं ते पाहाता काँग्रेसचे राज्यातील नेते नसलेल्या ताकदीचा बाऊ करत आहेत, हे दिसून येत होतं. अशावेळी पक्षाकडून सुरू असलेला स्वबळाचा नारा निश्चितच कहर निर्माण करणारा होता. पक्ष प्रभारी एच.के.पाटील यांनाच यासाठी पुढाकार घेऊन सर्वांचेच कान उपटावे लागले आहेत.

राज्यात पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची झालेली अवस्था कमालीची बिकट होती. लोकसभेतील घसरलेल्या ताकदीने पक्षाला नामोहरम केल्यावर विधानसभेत काय होणार हे स्पष्ट दिसत होतं. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केल्याने पक्षाला काहीशी उभारी आली. निवडणुकीच्या ऐनवेळी शरद पवार यांना इडीने पाठवलेल्या नोटीस भाजपवर बुम्बरँग झाली आणि त्याच दरम्यान झालेल्या भर पावसाने त्यांना मतांची साथ मिळाली. याचा परिणाम निवडणुकीच्या निकालांवर झाला. याच दरम्यान काँग्रेस पक्षाचे सगळेच नेते मौनीबाबा बनले होते. जो तो केंद्रातल्या सत्तेतून होणार्‍या कारवाईला घाबरत होता. आघाडीच्या प्रचाराची जबाबदारी पवारांनी घेतली नसती तर काँग्रेस पक्षाची काय अवस्था झाली असती, हे कोणीही सांगू शकला नसता. शरद पवार यांच्यावर ईडीने बजावलेल्या नोटीसने काँग्रेस पक्षालाही हायसं होऊन विधानसभेत ४३ चा पल्ला गाठणं त्या पक्षाला शक्य झालं. पुढे सत्तेच्या राजकारणात शिवसेनेसारख्या पक्षाबरोबर युती करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात काँग्रेस पक्षाला यश आलं. राजकारणात कोणीही कोणाचा दुष्मन आणि मित्रही नसतो, हे शिवसेनेबरोबरील सत्तेने देशाला दाखवून दिलं. सत्तेच्या वाट्यात प्रत्येकाला महत्वाकांक्षेची आस असणं स्वाभाविक आहे. पण यासाठी आपल्या ताकदीचाही अंदाज प्रत्येकाने घेतला पाहिजे. हा अंदाज न घेताच काँग्रेस अपेक्षा व्यक्त करू लागल्याने हे चाळे चाललेत तरी कशासाठी, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडणं स्वाभाविकच होतं. सत्तेची गणितं आणि त्याचे फायदे काय असतात हे काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या नेत्या कार्यकर्त्यांना चांगलं ठावूक आहे. सत्तेविना तो पक्ष दिवस काढू शकत नाही, असं त्या पक्षाबाबत कायम बोललं जातं. राजकारणात कायम शत्रुत्व जपणार्‍या शिवसेनेबरोबर सत्तेत बसल्यानंतर तर हे अधिक स्पष्ट झालं.

सत्तेत अधिकाधिक कामं करत मतदारसंघात आपली छाप पाडण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो. तो कमी अधिक प्रमाणात काँग्रेस पक्षाने करून पाहिला. त्यात पूर्णत: यश मिळालं नसलं तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं ही उपलब्धी अगदीच थोडकी नव्हती. जे मिळतं त्यात राजकीय फायदा मिळणं ओघानेच आलं. असा फायदा घेताना कोणी स्वबळाचा नारा लावत असेल तर इतर सहकारी तो खपवून घेतीलच असंही नाही. यामुळेच अतिरेक होऊ लागल्यावर आघाडीतल्या ज्येष्ठ नेत्यांना सबुरीचा सल्ला द्यावा लागला होता. स्वबळाच्या घोषणेचे चांगल्याऐवजी नकारात्मक परिणाम अधिक होत असतात. विरोधकाला फायदा घेणं यामुळे अधिक शक्य असतं. याचे परिणाम स्वत:ला बुडण्यात होतोच पण इतरांनाही बुडवण्याची कृती त्यात दडलेली असते. सरकार जाण्यावर त्याचे परिणाम होतात हे आजवर देशातल्या राजकारणाने दाखवून दिलं आहे. अशावेळी आपण कसं वागलं पाहिजे याची जाणीव काँग्रेस नेत्यांना राहिलेली दिसत नव्हती. सेनेला बरोबर घेऊन सत्ता मिळाल्याचे फायदे घ्यायचे आणि स्वबळाचा नारा लावायचा हा दुटप्पी उद्योग झाला. असे उद्योग कायम फायदेशीर ठरताच असं नाही. ते जेव्हा बुमरँग होतात तेव्हा हाती असलेलं सारं जातं. आठ वर्षं सत्तेबाहेर राहिलेल्या पक्षाच्या नेत्यांना हे कळू नये? विशेषत: नाना पटोले हे काँग्रेस पक्षाला मिळालेले उमदे अध्यक्ष आहेत. त्यांनी विद्यमान केंद्र सरकारचा कारभार जवळून पाहिलेला आहे. देशात निर्माण झालेल्या अराजकतेची त्यांना चांगली जाणीव आहे. ज्यांच्यासाठी आजवर काँग्रेस पक्ष लढला त्या सामान्यांच्या गरजांबाबत मोदी आणि त्यांचं सरकार काहीच करत नाही, हे पटोले यांच्या चांगलं लक्षात आहे. असं असताना असल्या पक्षाला आणि त्या पक्षाच्या सरकारला चित करण्याऐवजी एकाकी लढत देण्याच्या हाका देत काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भाजपला संधी देण्याची तयारी तर करत नाही ना? अशी शंका घेतली जात होती. देशात भाजपच्या वाढत्या ताकदीला एकाकी लढत देण्याची ताकद एकट्या काँग्रेस पक्षाकडे नाही, हे स्पष्ट असताना काँग्रेस तोच मार्ग अवलंबत असेल तर पक्षाची भूमिका ही हातची सत्ता घालवण्याची आणि भाजपला मार्ग मोकळा करून देण्याची आहे, हे लक्षात यायला वेळ लागत नाही. विभागलेल्या मतांचा फायदा आजवर भाजपने घेतला, हे उघड सत्य काँग्रेस विसरणार असेल तर तुम्हालाही घेऊन बुडण्याची तयारी काँग्रेस पक्ष करतो, असं म्हणण्यावाचून पर्याय नाही. प्रदेश पदाधिकार्‍यांच्या या कृतीची महाराष्ट्राचे पक्ष प्रभारी एच.के.पाटील यांना दखल घ्यावी लागली. स्वतंत्र लढण्याचा काँग्रेसचा निर्णय नाही, असं सांगत त्यांनी पक्षनीतीची जाणीव प्रदेश पातळीवरील नेत्यांना करून दिली. खरे तर केंद्रीय पातळीवरील नेत्याने समजावल्यावरही महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आपला हेका सोडलेला नाही. त्यांची स्वबळाची खुमखुमी अनावर होताना दिसत आहे. त्यांना कसे आवरावे, हे आता केंद्रीय नेत्यांपुढे मोठे आव्हान आहे. केंद्रीय पातळीवरून सांगूनही हे नेते ऐकायला तयार नाहीत. त्याची शेपूट वाकडी ती वाकडीच राहिलेली आहे. त्यामुळे ते विरोधकांना टीकेची संधी देऊन महाविकास आघाडीच्या सरकारला पेचात टाकत आहेत, पण त्यांना समजावणार कोण हा प्रश्न आहे.

First Published on: June 20, 2021 11:55 PM
Exit mobile version