चिलखत नसलेला कोरोना योद्धा

चिलखत नसलेला कोरोना योद्धा

राज्यातील कोरोना नियंत्रणात यावा, यासाठी सरकारी स्तरावर तसेच प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. त्यानंतरही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे केलेल्या उपाययोजना अपुर्‍या असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू ही आता नवी बाब राहिलेली नाही. तसेच कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबतही एक प्रकारची उदासीनता दिसत आहे. कोरोनाचे कमी होत असलेले गांभीर्य धोक्याचे आहे. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही ही स्थिती निर्माण होणार होतीच. मात्र, याचा फटका सुरक्षा यंत्रणांमधील कर्मचार्‍यांना बसत आहे. ठाणे परिसरात कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र निर्माण होत असतानाच अचानक रुग्णसंख्या वाढत असल्याचेही दिसत आहे. याच कोरोना योद्ध्यांचाही समावेश असल्याचे चिंताजनक आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ३११ पोलीस कोरोनाबाधित आढळले आहेत. तसेच याच काळात पाच पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. कोरोना काळात शेकडो पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील काही पोलिसांचा बळीही गेला होता.

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यावर मार्च ते मे या सुरुवातीच्या काळात कोरोनाशी रस्त्यावर दोन हात करणारे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेतील कर्मचारीच होते. सप्टेंबरपर्यंत कोरोना अंगवळणी पडला पण नियंत्रणात आला नाही. जोपर्यंत यावरील लस सामान्यांना उपलब्ध होत नाही, तोपर्यंत कोरोना नियंत्रणात येणे अशक्य आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईतील जोर कमी होता कामा नये. आजही कोरोना नियंत्रणात आलेला नाही. परंतु, लोकांनी कोरोनासोबत जगणे स्वीकारल्याचे चित्र आहे. मुंबई ठाण्यात काही अति संवेदनशील ठिकाणे वगळता बाजारपेठा, दुकाने सुरू झाली आहेत. बसेस, एसटी, रिक्षा, सलून सुरू आहेत. केवळ लोकल ट्रेन्स बंद असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. नोकर्‍या गेल्या. नोकर, पगारकपात सुरू झाली. अशा परिस्थितीत नागरिकांनी स्वतःचे छोटेमोठे व्यवसाय सुरू केले आहेत. आहे त्या परिस्थितीत जगण्याची तडजोड आता लोकांच्या अंगवळणी पडली आहे. कोरोना लक्षणे आणि तपासणीबाबतही धोकादायक उदासीनता दिसत आहे. एक प्रकारची हतबलता कोरोनाने जगण्याचा भाग बनवली आहे. कोरोना योद्ध्यांचे मृत्यू धोक्याची घंटा आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या हजारांच्या पटीत केव्हाच गेली आहे. आतापर्यंत १९ हजार ३८५ वर ही संख्या पोहचली आहे. या आकडेवारीत सध्या उपचार सुरू असलेले ३ हजार ६७० पोलीस, कोरोनामुक्त झालेले आहेत. तसेच १५ हजार ५२१ जण कोरोनामुक्त तसेच आतापर्यंत मृत्यू झालेल्या १९४ जणांचा समावेश आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार पुढे पोलिसांचे झालेले मृत्यू ही चिंतेची बाब आहे. राज्यातील १९ हजार ३८५ कोरोनाबाधित पोलिसांमध्ये २ हजार १३१ अधिकारी व १७ हजार २५४ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या ३ हजार ६७० पोलिसांमध्ये ४७८ अधिकारी व ३ हजार १९२ कर्मचारी आहेत.

कोरोनावर विजय मिळवलेल्या १५ हजार ५२१ पोलिसांमध्ये अधिकारी यांची संख्या १ हजार ६३५ आणि १३ हजार ८८६ कर्मचार्‍यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १९४ पोलिसांमध्ये १८ अधिकारी आणि १७६ कर्मचारी आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे असे आवाहन पुन्हा गांभीर्याने समजून घेण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांना देखील दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

कोरोनाच्या विळख्यात पोलीस सापडले असतानाच पत्रकारांची स्थितीही वाईट झाली आहे. पत्रकारांना कुठलेही घटनात्मक संरक्षण नसल्याने कोरोना काळात पत्रकारांना कुणीही वाली नसल्याची स्थिती आहे. लॉकडाऊन काळात अनेक पत्रकारांच्या नोकर्‍या गेलेल्या आहेत. वर्तमानपत्रांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. त्यामुळे अनेक वर्तमानपत्रांच्या जिल्हा आवृत्या बंद झालेल्या आहेत. तर अनेक ठिकाणी नोकरकपात केली आहे. अशा परिस्थितीत जीव धोक्यात घालून वर्तमानपत्राचे कर्मचारी काम करत आहेत. बिटवर काम करणार्‍या किंवा वृत्तवाहिनीसाठी काम करणार्‍या पत्रकारांना मोठा धोका निर्माण झाला आहे. पत्रकारांना कोविड योद्धा जरी म्हटले जात असले तरी सरकारी नोंदीनुसार तसा उल्लेख नाही. पत्रकारांसाठी सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे रेल्वे प्रवासाची सुविधाही देण्यात आलेली नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनात्मक पदाचा भार घेण्याआधीही ते त्यांच्या पक्षाच्या वर्तमानपत्राचे संपादक होते. अशा परिस्थितीत पत्रकारांची स्थिती त्यातही विशेष करून वर्तमानपत्रातील पत्रकारांची स्थितीविषयी त्यांना वेगळी माहिती देण्याची गरज नसावी.

पत्रकारांना कोरोना योद्धा म्हटले जात असले तरी सरकारी दरबारी तशी नोंद नसल्यामुळे कोरोना काळात वैद्यकीय संरक्षण मिळत नाही. इतर कोरोना योद्ध्यांप्रमाणे पत्रकारांना ५० लाख विमा संरक्षण नाही. कोविड किंवा इतर गंभीर आजाराचा संसर्ग झाल्यास वैद्यकीय सेवा मिळवण्यात पत्रकारांना आलेल्या अडचणी माध्यमातील अनेक कर्मचार्‍यांनी समाज माध्यमांवरून समोर आणल्या आहेत. इतरांची वेदना आणि दुःख समाज आणि व्यवस्थेसमोर मांडणार्‍या पत्रकारांना कोविड संसर्ग झाल्यावर वेळेवर अत्यावश्यक सेवा न मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, नवी मुंबईत अनेक पत्रकारांची कोविड चाचणी करण्यासाठी आवश्यक मदत केली. यात पॉझिटिव्ह आढळलेल्या पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पुढील उपचारासाठीही ठोस प्रयत्न केले. अशाच प्रकारे राज्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सरकारनेही पत्रकारांच्या वेदनेकडे लक्ष देण्याची गरज आहे. औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयात राहुल डोलारे या वार्ताहर, पत्रकाराचे निधन झाल्याचे वृत्त आहे. तसेच कोरोना काळात आतापर्यंत जवळपास २२ पत्रकारांचे निधन झाल्याचे वृत्त समाज माध्यमांवरून व्हायरल झाले आहे. यात तथ्य असल्यास पत्रकार आणि एकूणच राज्यातील पत्रकारितेसमोर मोठे गंभीर संकट उभे राहिल्याचे चित्र आहे.

कोविड साथ सुरू झाल्यावर नवी मुंबई शहरातील काही पत्रकारांची समूह चाचणी दोन वेळेस करण्यात आली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामी पुढाकार घेतला होता. यातील सुरुवातीच्या काळात काही पत्रकारांना लक्षणे नव्हती. मात्र, १० सप्टेंबर रोजी केलेल्या चाचणीत यातील जवळपास ७ जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यातील काही पत्रकारांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर काही पत्रकारांच्या घरातील सदस्यांचीही चाचणी करण्यात आली आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊन काळात या स्तंभाचा भार ज्याच्या खांद्यावर आहे तो सामान्य पत्रकार आणि त्याचे कुटंबच धोक्यात सापडले आहे. कुठल्याही आपत्काळात जीवाची पर्वा न करता बातमी देण्याचे आपले कर्तव्य इमाने इतबारे बजावणारी पत्रकारिता धोक्यात आली आहे.

पोलीस, डॉक्टर, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, आपत्कालीन तसेच सुरक्षा यंत्रणेतील कर्मचारी यांना सरकारी सेवा आणि घटनेचे संरक्षण मिळते. ते लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला मिळत नाही. लोकशाहीच्या इतर तीन स्तंभाच्या घटनात्मक आरोग्यासाठी पत्रकारिता या तीन स्तंभापेक्षा विलग ठेवण्याची गरज असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला होता. सद्याच्या काळातील एकूणच वृत्तमाध्यमांवरील उथळ बातम्यांमुळे पत्रकारिता टिकेची धनी ठरली आहे. मात्र, अशाही परिस्थितीत सजग आणि लोकाभिमुख पत्रकारिता जिवंत ठेवण्याची गरज आहे. ज्या देशातील पत्रकारिता संपते त्या देशातील लोकशाहीही संपुष्टात यायला वेळ लागत नाही. पत्रकारितेकडून कायदे किंवा नियमांपेक्षा कर्तव्यावर भर देण्याची अपेक्षा केली जाते. ती मुळातच लोकशाहीची घटनाबाह्य गरज म्हणून. अलीकडच्या काळात कोरोना आजारामुळे लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाचा मुळाशी असलेला पत्रकार राजकीय आणि सामाजिक पटलावरून दिसेनासा होत आहे. देश वाचवण्यासाठी या पत्रकारालाही वाचवण्याची गरज आहे. तुमच्या आमच्यापर्यंत भवतालचा आवाज पोहचवण्यासाठी लेखणी, माईक आणि कॅमेरा घेऊन कोरोनाच्या रणांगणात उतरलेल्या या कोरोना योद्ध्याच्या अंगावर वैद्यकीय सवलत सुविधा, विम्याचे साधे चिलखतही नाही, अशा परिस्थितीतही कोरोनाचे वार झेलणार्‍या पत्रकारांचे होणारे मृत्यू लोकशाहीसाठीही मारक आहेत.

First Published on: September 14, 2020 8:35 PM
Exit mobile version