अळवावरचं पाणी…

अळवावरचं पाणी…

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांचा बाईट घेण्यासाठी उडालेली माध्यमकर्मींची झुंबड

करोनाच्या बातम्या फिल्डवर जाऊन प्रत्यक्ष कव्हर करणार्‍या पत्रकारांना मोठ्या प्रमाणात करोनाची बाधा झाली आणि सगळेच हादरलेत. यानिमित्ताने टिव्ही पत्रकारितेतील भयावह स्थिती समोर आली आहे. राजकारणात मुख्यमंत्र्यांकडे बघून जसं अनेक राजकीय कार्यकर्ते आपल्या स्वप्नरंजनात असतात अगदी तसंच माध्यमात अर्नब गोस्वामी, राजदीप सरदेसाई, रविश कुमार, श्वेता सिंह, बरखा दत्त, निधी कुलपती यांना स्वत:त बघून अनेक तरुण- तरुणी माध्यमांत येतायत. दुसरा वर्ग युपीएससी, एमपीएससीत अपयशी ठरलेल्यांचा आणि तिसरा वर्ग ज्यांना काही वेगळं करायचंय त्यांचा. यात स्क्रीनवर दिसून ग्लॅमर आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी आलेल्यांना अल्पावधीतच कळंत आपली वाट चुकलीय. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो आणि एका वेगळ्या व्यवस्थेनं तुमचा ताबा घेतलेला असतो.

अगदी अंडरवर्ल्ड सारखा…जिथे परतीचे मार्ग नसतात. असलेच तर एखादी सिक्युरिटी एजन्सी किंवा दूर कुठेतरी जाऊन छ़ोटासा भूखंड विकसित करणं. इथेही तसंच. मागे फिरलात तर कुठे जाहिरात, पीआर एजन्सी सुरू करा किंवा नेत्यांचा पीआर बघा. नाहीतर लायझनिंग.. अर्थात याला वेगळं कसब लागतं ते नसेल तर मीडियात ‘पडून’ रहा. तुम्हाला सवय लागलेलं माध्यमांचं ग्लॅमर, राजकीय वट, कमी काळापुरतेच मिळणारे पैसे असूनही ( हिंदीच्या तुलनेत तुटपूंजेही) तुम्हाला शांत बसू देत नाहीत. मग इथल्या स्पर्धेत उतरून टिकण्यासाठी करावी लागते जीवघेणी स्पर्धा. त्यातून कराव्या लागतात तत्वांशी- विचारांशी तडजोडी, करून घ्यावा लागतो मानसिक, वैचारिक आणि शारीरिक अत्याचार.

हा अत्याचार अ‍ॅन्कर, रिपोर्टर आणि तांत्रिक कर्मचार्‍यांवरही होतोय. स्त्री आणि पुरुष या दोघांनाही तो सहन करावा लागतोय. तुलनेत पुरुषांना जास्त कारण घर त्यांना चालवायचे असते. स्त्रियांना कायद्याने दिलेलं अभय घेऊन काहींनी संपादकांना केसेस टाकून टरकून ठेवलंय. पण त्यामुळे अशांना फारशा संधीही नाहीत. कारण नकारात्मक दृष्टिकोन. टिव्ही माध्यमामध्ये काही कॅम्प्स आहेत. त्यात बाहेरच्यांना प्रवेश नाही. तेच आठ-दहा संपादक इथून तिथे राजकीय लॉबिंगमुळे किंवा हुजरेगिरीमुळे आणि इतर काही कारणांनी फिरत असतात. ते एकीकडून दुसरीकडे जाताना मदार्‍यांसारखे आपली माकडं घेऊन फिरत असतात. या माकडांचं काम आपला मदारी किती लालचुटुक आहे सांगता यायला हवं. मग तिथे जुन्या असणार्‍यांना, नव्या संपादकांना न आवडणार्‍यांना ज्यांच वागणं- बोलणं लाघवी नसणार्‍यांना दुर्लक्षाच्या तुरुंगात डांबले जाते. त्यात कधी ही शिक्षा सलग नाईट शिफ्टची असते तर कधी वर्षवर्षाच्या पहाटेच्या अ‍ॅन्करिंगच्या जबाबदारीची…तर कधी जीवघेण्या करोना सारख्या कस्तुरबाच्या ग्राऊंड रिपोर्टची. तर कधी लहान मुलं असताना अवेळीच्या ड्यूटीची! हे ठरवत कोण तर संपादक, संचालक आणि तत्सम वरिष्ठांचे मनमोहन करणारे, किंवा जिला येणारा कुठलाही संपादक मानतो अशी ‘मॅडम’… केंद्रीय परिक्षांमध्ये अपयशी ठरलेले किंवा उच्चशिक्षण घेऊन इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच्या दुनियेत नाकामयाब ठरलेले चॅनेल मधले मिस्टर निगेटिव्ह.

अशाच मंडळींनी बर्‍याच वाहिन्यांचे इनपुट डेस्क भरलेत आणि कोअर टीम फुलल्यात. यांचं काम एकच यांनी श्रमिक सहकार्‍यांनी अवाक्षर काढताच नकारघंटा वाजवायची. मराठी सहा वाहिन्यांपैकी चार वाहिन्यांचे संपादक हे काल परवापर्यंत फिल्डवर जाणारे पत्रकार आहेत. त्यातले काही अजून फिल्डवरच्या वेशभूषेतून आणि मानसिकतेतून बाहेरच आलेले नाहीत. गचाळ रहायचं अशुद्ध बोलायचं. त्यातून होणार्‍या टुकार शोचं रेटिंग पडलं की त्याचा सूड इतरांवर उगवायचा. अर्थात काहींनी ‘बार्क’ची सूत्रं आणि एफपीसीचा खेळ समजून घेतल्यानं ते या खेळात ‘खरे’ यशवंत ठरलेत. तर काही पानाच्या टपरीवाल्यांसारखे सिग्नेचर शो करतायत. तर काहींना आपले शो सावरायला मदतनीस घेऊन बाकड्यांवर बसावं लागतंय. पण तरीही यश सगळ्यांनाच हवं त्या यशाची स्पर्धा मात्र जीवघेणी आहे. त्यासाठी कॅमेरा समोरची आणि मालकांसमोरची कर्तीधर्ती मंडळी कुणाचाही बळी घ्यायला आणि द्यायलाही तयार आहेत. बरं हे बळी घेण्याचं कार्य सिध्दिस नेण्यास इनपूट आणि डेस्कवरची मंडळी पूर्ण सक्षम आहेत. त्यांना असं वाटतंय की आपण सदैव सुपातच राहणार आहोत जात्यात कधीच जाणार नाही.

ते हे विसरतात की हे ग्लॅमर अळवावरचं पाणी आहे. एका वाहिनीने आपल्या काही सपोर्टिंग स्टाफला करोना काळात ऑफिसमध्येच राहायची व्यवस्था केली. त्या वाहिनीच्या काही अ‍ॅन्कर्सने घरून काम करायला सुरुवात केलीय. अनेक दिवस एकत्र राहणार्‍यातील काहींना करोनाची बाधा झाली आहे. कारण ते रहात असलेली जागा केंद्रीय वातानुकुलीत आहे. या कार्यालयाची महापालिकेने सक्तीने तपासणी करायला हवी. कारण हा मानवी बॉम्बसारखाच आहे. दुसर्‍या एका वाहिनीत स्टुडिओतल्या कॅमेरामनमुळे इतर कर्मचार्‍यांना लागण झालीय. त्यामुळे आधीच मनुष्यबळाने आचके देणार्‍या या वाहिनीचा विषय अधिक बिकट झालाय. आता सरकारने मुंबई- पुण्यातील चॅनेल्सच्या सगळ्या स्टाफची चाचणी होत नाही तोपर्यंत प्रसारणाला मनाई असा निर्णय घ्यावा लागेल अशी स्थिती आहे. पण त्याहीपेक्षा बिकट स्थिती फिल्डवरच्या पत्रकारांची झालीय. कारण पॉझिटिव्ह ठरल्यावर या पत्रकारांचे अधिकच हाल झाले आहेत. मी दोष या पत्रकारांच्या वाहिन्यांना देईन. कारण आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे तरी ते पॉझिटिव्ह असल्याचं कळू शकलं. त्यानंतर कोट्यवधीचा व्यवसाय करणार्‍यांची आणि त्यांच्या मुखियांची काही जबाबदारी नाही का?

चॅनेलच्या दुनियेचं सध्या एकच तंत्र आहे ‘बीओटी’…म्हणजे बांधा- वापरा- हस्तांतरीत करा. हे पाहिलं की कोंबड्या आणि बैलांच्या झुंजीच आठवतात. या फिल्डवर जाणार्‍या मंडळींना करोना काळात ऑफिसमध्ये यायला परवानगी नाही. कंपाऊंड बाहेर थांबायचे, नाईट शिफ्टला डासांमध्ये गाडीतच झोपायचे. तेही एसी न सुरू करता.. हे पत्रकार, कॅमेरामन कल्याण, डोंबिवली, खारघर, पनवेलमधल्या आपापल्या घरी गेले की करोनाच्या भीतीमुळे कुटुंबियांकडूनही अंतर. ज्या मुलांच्या ओढीने घरी येऊन त्यांना बिलगावं तर त्यांना करोनाची बाधा होण्याची भीती. स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढण्यास सकस आहाराचा डबा आणावा तर तो खाण्यासाठी असलेल्या जागेवर कोण बसून गेलाय याची मनात धाकधूक. पत्रकार संघटनेचं टॉयलेट म्हणजे करोनाचा सापळाच जणू. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत काम करून इनपूट आणि डेस्कवाले ‘सरांचा निरोप आहे’ ‘मॅडमने सांगितलंय’ सांगून जनावरांसारखा छळ मांडणार. बरं हे ऑर्डर देणारे स्वत: काही कामं धड करू शकत नाहीत.

माध्यमांमध्ये काम करणार्‍या ज्यांना ज्यांना वाटतं मी सांगितलं आणि साहेबांनी केलं ते निव्वळ मूर्खपणा करतायत. अरे, बाबांनो तुमचा विचार जिथे थांबतो तिथे त्यांचा सुरू होतो. अशा कैफात वावरणार्‍या एका पत्रकाराची सत्तास्थापनेच्या काळात दोन महिन्यांत चार मोठ्या नेत्यांनी खोट्या बातम्यांसाठी पाच वेळा जाहीर लक्तरं काढली. बीट कव्हर करणारे अनेकजण असं समजतात की आम्ही पक्षाचं आणि प्रमुखांचं जणू पेटंटच घेतलंय. ही मंडळी पक्षाच्या नावांनी व्हॉटसअ‍ॅप ग्रुप चालवणारं बातम्या पेरणार, या सगळ्याचा विचार आता करायलाच हवा. याची गरज कुणाला आहे चॅनेलला, नेत्याला की पत्रकारांना? त्यामुळे आपण डोकं खांद्यावर ठेवून काम करायला हवं आणि विचारही…अ‍ॅन्करिंग करतानाचा मेकअप जेवढा वेळ राहतो तेवढाच वेळ हे अळवावरचं पाणी चकाकतं. कारण संघटनांमधून आणि कार्यालयातूनही गटांचं, जातीचं राजकारण करणार्‍यांनी आणि चॅनेलमध्ये संपादक-मालक यांच्या इशार्‍यावर नाचून आपल्या सारख्याच सहकार्‍यांचा छळ मांडणार्‍यांनी इतकंच लक्षात ठेवायला हवं आपल्या सगळ्यांचा खेळ ‘रेटिंग’वर आहे. इथे कुणाचाच भाव कायम नाहीय. तेव्हा थोडं संभालके!

First Published on: April 23, 2020 1:01 AM
Exit mobile version