‘हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे’

‘हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे’

कवी ग्रेस

आज कवी ग्रेस यांचा स्मृतीदिवस आहे. कवी ग्रेस यांच्या कवितेतील प्रत्येक शब्दामध्ये खोलवर अर्थ दडलेला आहे. त्यांच्या कविता दाहक वास्तव्याची जाणीव करुन देतात. ग्रेसांच्या कविता पुन्हा पुन्हा वाचायला भाग पाडतात. ‘हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे’ हे बोल त्यांच्याच कवितेच्या बाबतीत खरे ठरले आहे. ग्रेसांची कविता वाचली की, पुन्हा पुन्हा ती गुणगुणत राहावी असे वाटते. त्यांची स्मरणात राहीलेली एक कविता….

भय इथले संपत नाही…मज तुझी आठवण येते…
मी संध्याकाळी गातो…तू मला शिकविली गीते…
हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

कवी ग्रेस यांचा जन्म १० मे १९३७ रोजी झाला होता. माणिक सीताराम गोडघाटे असे त्यांचे मुळ नाव. ग्रेस हे फार प्रभावशाली होते. आईचे निधन झाल्यावर त्यांच्या विषण्ण मनाने ‘ती गेली तेव्हा’ ही कविता लिहिली होती. ही कविता वाचल्यावर डोळ्यांमधून अश्रू आल्याशिवाय राहत नाही. या कविताच्या काही ओव्या…

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता
तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता
हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता

२०१२ साली ‘वाऱ्याने हलते रान’ या त्यांच्या ललित लेखसंग्रहासासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचे आईचे अकाली निधन झाले होते. त्यांना आपल्या आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे वडीले लष्करात होते. नागपूर विद्यापीठात त्यांनी एम. ए. चे शिक्षण पुर्ण केले होते. त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि सात ललितलेख संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी १९६६ ते १९६८ या काळात नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून काम केले. १९६८ पासून त्यांनी नागपूरच्या वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत मराठीचे अध्यापन सुरु केले. १९९७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर २००४ पर्यंत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात मराठी विभागात व ललित कला विभागात संशोधन म्हणून कार्यरत होते.

First Published on: March 26, 2019 2:49 PM
Exit mobile version