श्रमिकांचा हुंकार नारायण सुर्वे

श्रमिकांचा हुंकार नारायण सुर्वे

कवी नारायण सुर्वे यांचा आज स्मृतिदिन. नारायण सुर्वे हे श्रेष्ठ मराठी कवी. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२६ रोजी झाला. गिरणी कामगार गंगाराम सुर्वे ह्यांनी त्यांच्या जन्मापासून त्यांचा सांभाळ केला म्हणून नारायण गंगाराम सुर्वे असे नाव त्यांनी लावले. सुर्वे ह्यांचे बालपण अत्यंत प्रतिकूल अवस्थेत गेले. हॉटेलमध्ये पोर्‍या, कापड गिरणीत बिगारी, अक्षरओळख झाल्यानंतर प्राथमिक शाळेत शिपाई अशा नोकर्‍या त्यांनी केल्या. इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण ते घेऊ शकले. पुढे प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून त्यांना नोकरी मिळाली.

विपन्नावस्था आणि दारिद्य्राचे चटके ह्यांमुळे सखोल अनुभवसंपन्न असे लेखन त्यांच्याकडून सहजस्फूर्तीने घडले. ऐसा गा मी ब्रह्म (१९६२) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर माझे विद्यापीठ (१९६६), जाहीरनामा (१९७५) आणि नव्या माणसाचे आगमन (१९९५) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. सनद (१९८२) आणि निवडक नारायण सुर्वे (१९९४) ह्या त्यांच्या निवडक कवितांचे संपादित संग्रह. उर्दू साहित्यिक कृष्ण चंदर ह्यांच्या उर्दू कथांचा सुर्वे ह्यांनी केलेला अनुवाद तीन गुंड आणि सात कथा (१९६६) ह्या नावाने प्रसिद्घ झाला. दादर पुलाकडील मुले (१९७५) ही त्यांची अनुवादित कादंबरी. त्यांच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद ऑन द पेव्ह्मेंट्स ऑफ लाइफ (१९७३) ह्या शीर्षकाने प्रसिद्घ झाला आहे.

श्रमिकांच्या दैनंदिन आयुष्याची व श्रमशक्तीच्या चढउतारांची स्पंदने सुर्वे ह्यांच्या कवितेत अनोख्या ढंगाने प्रकट होतात. माणूस आणि मेहनत ह्यांचे अतुट नाते, हा त्यांच्या कवितेचा कणा आहे. रोजच्या भाकरीसाठी तसेच आपले हक्क आणि अस्तित्व ह्यांसाठी झगडणारा माणूस सुर्वे ह्यांच्या कवितेतील अनुभवसृष्टीच्या केंद्रस्थानी आहे. विचारांची वीज मनात वागवीत तो वावरतो आहे. लॉस अँजेल्सचा निग्रो, आफ्रिकन चाचा, टांगेवाला, शीग कबाबवाला, याकूब नालबंदवाला, संपकरी, जथ्यात वावरणारा, पोस्टर्स चिकटवणारा हमाल, शरीरविक्रय करणार्‍या स्त्रिया ह्यांच्यासंबंधीचे तपशील त्यांच्या कवितेत विलक्षण चैतन्यमयतेने येतात.

ज्ञान, मान आणि सुख ह्यांना दुरावलेल्या असंख्य सामान्यांचे प्रतिनिधित्व त्यांची कविता करते. पोलिसांच्या दंडुक्यांनी उठवेपर्यंत फूटपाथ-खाचरांत संसार चालवणारे व कारखान्याची आणि स्मशानाची ह्या दोन वाटांच्याच कात्रीत जगणारे श्रमिक रंगवीत असताना सुर्व्यांच्या कवितेची भाषा अभिव्यक्तीची स्वतंत्र पद्घती निर्मिण्यात यशस्वी झाली. परिचयाचे शब्द त्यांच्या कवितेत नवतेच्या रंगाने उजळून निघतात. ‘कढ आलेल्या भातासारख्या व्यथा’, ‘चुलाण्यात फटफटावे लाकूड तसा आत्मा’ ही ह्याचीच उदाहरणे होत. महाराष्ट्र शासनाचे दोन प्रथम पुरस्कार त्यांच्या कवितेला मिळाले. (ऐसा गा मी ब्रह्म, माझे विद्यापीठ ). अमेरिकेतील ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ चा पुरस्कारही त्यांना देण्यात आलेला आहे. सनदसाठी भारत सरकारचा साहित्य पुरस्कार ‘पद्श्री पुरस्कार’ (१९९८) मध्य प्रदेश सरकारचा ‘कबीर पुरस्कार’ (१९९९) कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान पुरस्कार’ हे महत्त्वपूर्ण पुरस्कार त्यांना मिळाले. अशा या महान कवीचे 16 ऑगस्ट 2010 रोजी निधन झाले.

First Published on: August 16, 2021 6:10 AM
Exit mobile version