दुभंगलेलं गाव – भाग २

दुभंगलेलं गाव – भाग २

प्रतिनिधिक फोटो

पातरपाराच्या त्या छोट्याशा सभेमागचा मोठा संदर्भ समजून घेणे गरजेचे आहे.सलवा जुडूमची सुरुवात साधारण २००४-५ साली बिजापूर जिल्ह्यात इथून काही मैल दूर असलेल्या एका अशाच आदिवासी-बहुल गावातून झाली. त्या गावाने नक्षलवाद्यांविरोधात उठाव केला.पाहता पाहता त्या ठिणगीने पेट घेतला.अवघ्या वर्षभरात दक्षिण बस्तर ढवळून निघाले.बिजापूर, दांतेवाडा, आत्ताचा सुक्मा जिल्हा आणि नारायणपूरचा काही भाग. या संपूर्ण परिसरात आदिवासींनी नक्षलवाद्यांना अनेक गावांत येण्यास मज्जाव केला.तुमच्या येण्याने आम्हाला त्रास होतो.पोलीस निरपराध लोकांना मारहाण करतात.हे थांबले पाहिजे याकरिता हा उठाव.

पण काँग्रेसचे एक दिग्गज नेते महेंद्र कर्मा – ज्यांची २५ मे २०१३ रोजी माओवाद्यांनी अनेक दिग्गजांसह निर्घृण हत्या केली. त्यांनी या आंदोलनाला एक राजकीय वळण दिले. त्यांनी जुडूमला आपल्या हातात घेतले.त्याला अवघ्या दक्षिण बस्तरभर पसरवले.रमण सिंह सरकारने त्यांना पाठिंबा दिला. त्यामागे दोन कारणं होती.रायपूरची सत्ता हातात ठेवायची तर बस्तर आपल्या जवळ पाहिजे.लोक सरकारच्या बाजूने होतील तर तेसुद्धा सरकारला हवेच होते.

हा प्रदेश पूर्वी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला होता आणि नव्वदीच्या काळात कॉँग्रेसचा. कर्मा नक्षलवाद्यांचे घोर विरोधक. छत्तीसगढ़ राज्य वेगळे झाले तेव्हा खरे आदिवासी नेते म्हणून त्यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे होते.तसे केले नाही म्हणून ते पक्षश्रेष्ठींशी नाराज होते. काँग्रेसच्या राज्याअंतर्गत राजकारणात त्यांचे अजित जोगींशी कधीही पटले नाही. बस्तरमध्ये महेंद्र कर्मांना आदिवासी-गैरआदिवासी आपला नेता मानत. रमण सिंह मातब्बर नेते.कर्मा जे त्यावेळी छत्तीसगढ विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.सलवा-जुडूम(गोंडी भाषेत त्याचा अर्थ:शांती मोहीम)चे प्रतिनिधित्व करतात हे पाहिल्यावर रमण सरकारने त्यांना पहिले छुपा आणि नंतर उघड पाठिंबा दिला.कर्मांनाही ते पाहिजे होते. जुडूमच्या माध्यमातून स्थानिक लोकांना हाताशी धरून नक्षल्यांचा संपूर्ण बिमोड करायचा,हे त्यांच्या मनात होते. ‘आमचे प्रतिनिधित्व करणारे तुम्ही कोण?’असा प्रश्न महेंद्र कर्मा नक्षलवाद्यांना नेहमी करत.

१९९१-९२ च्या काळात सुद्धा नक्षलवाद्यांच्या विरोधात असाच एक उठाव झाला होता. त्यावेळी सुद्धा कर्माच त्यामागे होते. त्याला ते ‘जन-जागरण मोहीम’ म्हणत.त्या मोहिमेला सरकारने पहिला पाठिंबा दिला आणि नंतर माघार घेतली.कर्मा तेव्हापासून नक्षल्यांच्या हिटलिस्टवर होते.त्यावेळी जे जे लोक नक्षल्यांच्या विरोधात गेले त्यांच्यापैकी अनेकांची हत्या झाल्याची कबुली कर्मांनी २०१० साली मला एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या फरसपाल गावी दिली होती. मृत्यूपूर्वी किमान चारदा ते बचावले होते. जुडूमची मोहीम यशस्वी झाली नाही याची खंत त्यांना होती. ती मला जन्मभर राहील, असे त्यांनी मला सांगितले. पण जुडूममुळे स्थानिक लोकांना जो भयावह त्रास भोगावा लागला आणि बस्तरच्या चिंध्या झाल्या त्याबद्दल त्यांना वाईट नव्हते वाटत.मोठ्या लढाईचा तो एक भाग आहे असे ते मानत.

जुडूम सुरु झाले आणि गावच्या गावं पिळून निघाली. जे आमच्यासोबत नाहीत ते नक्षली असा साधा सरळ हिशेब. त्यामुळे जी गावे जुडूममध्ये येण्यास तयार झाली नाही, अशा अनेक गावांना पेटवून दिले गेले. दुसरीकडे, जुडूम विरोधात, माओवाद्यांनी सुद्धा आपली पूर्ण ताकद पणाला लावली.किंबहुना त्यांच्या चळवळीला नवी ताकद मिळाली.अनेक आदिवासी तरुण-तरुणी त्यांच्यात सामील झाले.


-जयदीप हर्डीकर
(लेखक मुक्त पत्रकार आहेत)

 

First Published on: August 5, 2018 4:11 PM
Exit mobile version