जिच्या हाती स्टेअरिंग व्हिल……

जिच्या हाती स्टेअरिंग व्हिल……

सौदितील महिला गाडी चालवताना

‘पिकू’ सिनेमात दीपिका पदुकोण आणि इरफान खान यांचे एक संभाषण खूप बोलके आहे. इरफान दीपिकाला म्हणतो, ‘तुम गाडी चलाना जानती हो के नही? ड्रायव्हिंग लिबरेट्स अ वूमन!’ त्यावर दीपिका मिश्किल हसत उत्तरते, ‘तुमको सचमें ऐसा लगता है के बस मुझे इम्प्रेस करनेके लिये बोल रहे हो?’ सौदी अरेबियामध्ये कायद्याने महिलांना गाडी चालवण्याचा हक्क नव्हता. तो मिळवण्यासाठी त्यांनी मोठ्ठा लढा दिला. अनेक याचिका, अर्ज, अटक आणि जामीन सत्रांनंतर २६ सप्टेंबर २०१७  रोजी सौदी अरेबियाचे राजा सलमान ह्यांनी महिलांना पुरुषांप्रमाणेच देशात वाहन चालवण्याचा अधिकार देण्यास मान्यता दर्शविली. २४  जून २०१८ ला जेव्हा महिलांच्या वाहन परवान्यांवरील बंदी उठवण्यात आली तेव्हा एका दिवसात तब्बल १,२०,००० महिलांनी नवीन वाहन परवान्यांसाठी अर्ज केले. पण सौदी अरेबियातल्या महिलांचीदेखील ही लढाई अजून संपलेली नाही. समाजाने महिलेला चूल आणि मूल ह्या पलीकडे जाऊन एक स्वतंत्र वाहनचालक म्हणून स्वीकारण्याचा लढा हा आत्ता कुठे सुरु झाला आहे.

जेव्हा एखादा चालक गाडी नीट चालवत नाही, हळू चालवतो, विचित्र पद्धतीने गाडी उभी करतो किंवा त्या चालकामुळे अपघात होण्याची शक्यता वाटते तेव्हा अगदी सहजपणे त्या चालकास ‘काय बाईसारखी गाडी चालवतो रे?’ असा टोमणा मारला जातो. आज जेव्हा बायका जगातील सर्व प्रकारची वाहने चालवू शकतात, मोठे उद्योग-धंदे आणि देशाचा कारभार देखील सांभाळू शकतात तेव्हा अशा प्रकारचे उद्गार निश्चितच अपमानजनक वाटतात. भारतातील महिला देखील हा सामाजिक लढा गेली कित्येक वर्षे लढत आहेत. स्त्रियांनी सायकल किंवा दुचाकी वाहनांच्या पुढे जाऊन कार, विमान, ट्रेन, मेट्रो, ट्रक, टॅक्सी चालवणे हे अजूनही अप्रूप मानले जाते. पण तरी महिला न डगमगता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, प्रसंगी त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने सर्व प्रकारची वाहने आज चालवत आहेत. ह्याचे श्रेय त्या महिलांना द्यावे लागेल ज्यांनी विविध विरोध आणि कुरघोड्यांचा सामना करत वेगवेगळी वाहने चालवण्यास पहिले पाऊल उचलले. सरला ठकराल ह्या विमान चालवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या, सुरेखा यादव ह्या पहिल्या रेल्वे चालक तर बंगळूरूच्या प्रियांका एन. ह्या पहिल्या मेट्रो चालक ठरल्या. ह्या सर्व स्त्रियांनी वेळोवेळी त्यांचे वाहन चालवताना लिंगभेदी टोमणे ऐकले नसतील तर नवलच! पण त्यांच्या ह्या एका साहसी कृत्याने कित्येक महिलांना प्रेरणा मिळाली आणि मिळत राहील.

मुक्ता परब गृहिणी आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासातही अतिशय सफाईदारपणे चारचाकी चालवतात. त्यांच्या मते, ‘मला ड्रायव्हिंग आत्मविश्वास देते. स्वावलंबी असल्याची भावना देते. अनेकदा गृहिणींना कमी लेखलं जातं. त्या ‘ही काय, घरीच तर असते!’ अशा प्रकारच्या स्टिरिओटिपिकल धारणाचा सामना करावा लागतो. मात्र ती जर कुशल ड्रायव्हर बनली तर लोकांच्या नजरेत तिच्याबद्दलचा आदर लगेचच वाढतो! हे अर्थात फार काही आदर्श नाही. महाराष्ट्रात ‘गाडी चालवणारी बाई’ या वास्तवाकडे बघण्याचा दृष्टिकोन मला प्रदेशानुसारही बदलताना दिसला. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात बाईला रस्त्यावर ड्राइव्ह करताना सहकार्य केले जाते. तिला विचित्र नजरा आणि शेऱ्यांचा सामना सहसा करावा लागत नाही. इतर भागांत मात्र जरा अवघडून टाकणारं, अडथळे आणणारं चित्र मी अनुभवलं. मला वाटतं, ज्या-ज्या भागात बाईला आदराची, समानतेची वागणूक मिळते तिकडे तिला गाडी चालवणेही सोपे आहे!’

माझी एक पुणेकर मैत्रिण तन्वी शेख ही पुण्याच्या पेठांमधील गल्लीबोळातून नियम न मोडता सहज आपली दुचाकी चालवण्यात माहीर आहे. तिच्या गाडी चालवण्याच्या अनुभवाबद्दल ती सांगते, अनेक पुरुष रस्त्यावरून जाताना मुद्दाम बाजूने नागमोडी वळणे घेत ‘ओव्हर टेक’ करतात; ‘किती हळू गाडी चालवते’ असे ऐकवून आपली गाडी जोरात पुढे रेटत निघून जातात, लाल सिग्नलला थांबले असताना मुद्दाम मागे हॉर्न वाजवत उभे राहतात आणि सिग्नल हिरवा झाला की लगेच एका सेकंदात ‘गाडी पुढे का नेली नाही’ म्हणून आरडाओरड करतात. एकदा मी एफ.सी. रोडला काही कामानिमित्त गेले होते आणि माझी गाडी पार्क करण्यासाठी जागा शोधत होते. एका ठिकाणी थोडी जागा दिसली; पण तिथे दोन बाईक खूप विचित्र पद्धतीने वाकड्या लावल्या होत्या. त्यामुळे एका गाडीची जागा अडली होती. मी माझी गाडी तिथे रस्त्याच्या बाजूला लावून त्या बाईक्स सरकवून जागा करू लागले. तितक्यात त्या बाईक्सचे मालक ‘तुम्हाला नाही जमणार आम्ही करतो’ असे म्हणत आले. मी शांतपणे दोन्ही बाईक्स मेन स्टँडवर लावून माझी गाडी लावली. ते दोघं काहीतरी अद्भूत जादू बघितल्यासारखे माझ्याकडे बघत होते. मी काही न बोलता शांतपणे तिथून निघून गेले. अनेकदा आपल्या शांत कृतीच बरंच काही बोलून जातात. तन्वीच्या ह्या अनुभवावरून लक्षात येते की समाजाचे महिला चालकांबद्दलचे मत बदलण्यासाठी महिला अधिकाधिक बहुसंख्येने रस्त्यावर गाडी चालवत्या झाल्या पाहिजेत. ‘जेंडर’पलीकडे जात बाईच्या ड्रायव्हर असण्याला पहिले-जोखले गेले पाहिजे.


– दिशा महाजन

(लेखिका युवा ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत)

First Published on: July 1, 2018 5:08 PM
Exit mobile version