शब्दांतून कविता झिरपते तेव्हा..

शब्दांतून कविता झिरपते तेव्हा..

Dil ka bhanvar

‘सफर’ सिनेमाचं काम सुरू होतं. संगीत देत होते कल्याणजी-आनंदजी. सिनेमातलं एक दृश्य गीतकार इंदिवरजींनी समजून घेतलं होतं. त्यानुसार त्यांच्या मनात शब्द घोळत होते, पण ते त्यांना हवे तसे सुचत नव्हते आणि जुळतही नव्हते. पण एके दिवशी मात्र त्यांना मनासारखे शब्द सुचले आणि ते त्यांनी लगोलग संगीतकार कल्याणजींना दाखवले. शब्द होते, ‘जीवन से भरी तेरी आँखे, मजबुर करे जीने के लिए, सागर भी तरसते रहते हैं, तेरे रूप का रस पिने के लिए.’ कल्याणजींकडे चाल लावण्यासाठी येणारे नेहमीसारखे ते शब्द नव्हते. एका प्रेमिकेच्या रंगरूपाचं वर्णन करताना तिचे जीवनाने काठोकाठ भरलेले डोळे जगण्याची सक्ती करतात, जगण्यासाठी असहाय करतात, जगायला लावतात ही कल्पना खूप वेगळीच होती. कल्याणजींना ती कल्पना खूप भावली. ते नेहमीसारखं गाणं नव्हतं तर ती एक छान कविता होती. गीतकविता होती.

सिनेमाच्या दिग्दर्शकाकडून इंदिवरच्या शब्दांसाठी ग्रीन सिग्नल आल्यानंतर कल्याणजी खूश झाले. त्यांनी त्या शब्दांना चाल लावायला घेतली. इंदिवरजींच्या त्या शब्दांना पुरेपूर न्याय मिळेल अशी चाल त्यांना लावायची होती. काही काळातच ती चाल लावून तयार झाली आणि खरोखरच एक नितांत सुंदर गाणं तयार झालं. यथावकाश ते गाणं किशोरकुमारकडून गाऊन घेण्यात आलं. खरंतर इंदिवरजींची ती शब्दकळा नाजूकसाजूक होती आणि किशोरदांच्या आवाजाची जातकुळी तशी पौरूषाने भारलेली, ओतप्रोत मर्दानगीने सामावलेली होती. त्यामुळे काही लोकांचा तशी खुसपटं काढण्याचा प्रयत्न झाला. पण कल्याणजी किशोरदांच्या नावापासून मागे हटले नाहीत…आणि किशोरदांनीही ते गाणं गाताना आपली निवड सार्थ ठरवली.

अशी गीतकविता खरंतर संगीतकारांच्या वाटेला अभावानेच येत असते असं तेव्हा कल्याणजींसह जवळ जवळ बहुतेक संगीतकारांचं म्हणणं असायचं. एरव्ही धंदेवाईक सिनेमातली गाणीही तद्दन धंदेवाईकच असायची. दिल, दिवाना, मोहब्बत, सनम, आशिक, बालम, साजन असे शब्द आलटून पालटून आले की हिंदी सिनेमाचं गाणं तयार होऊन जायचं. तुम को खूश देख कर मै बहुत खूश हुुवा, ये आँखे भर आयी तो फिर क्या हुवा, ह्यासारखे ठोकळेबाज शब्द कुणीतरी लिहून आणायचं आणि संगीतकारापुढे त्याला चाल लावण्यावाचून पर्याय नसायचा. अशा वेळी कुणी एखादा गीतकार काही काव्यात्म शब्द कागदावर लिहून घेऊन आला की संगीतकाराला आनंद व्हायचा. नेहमीचे घिसेपिटे शब्द न लिहिता वेगळ्या शब्दांना आणि मुळात एखाद्या कवितेला चाल लावण्याची संधी मिळते आहे ह्याचं संगीतकाराला अप्रुप वाटायचं किंवा आव्हानही वाटायचं.

कल्याणजी-आनंदजींना त्याआधी कवितेला संगीत द्यायची अशीच संधी मिळवून दिली होती ती गीतकार इंदिवरजींनीच. तो सिनेमा होता ‘सरस्वतीचंद्र’…आणि इंदिवरजींनी तेव्हा शब्द लिहिले होते ‘चंदन सा बदन, चंचल चितवन, धीरे से तेरा ये मुस्काना, मुझे दोष ना देना जगवालो, हो जाऊ अगर मै दिवाना.’ तेही स्त्रीच्याच रंगरूपाचं वर्णन होतं. इंदिवरजींनी ते वर्णन करताना एका अंतर्‍यात लिहिलं होतं, ‘तन भी सुंदर, मन भी सुंदर, तू सुंदरता की मुरत है, किसी और को शायद कम होगी, मुझे तेरी बहुत जरूरत है’…त्या अंतर्‍याचीही चाल कल्याणजी-आनंदजींनी त्या गाण्याच्या मुखड्याला इतकी साजेशी लावली होती की मुखडा आणि अंतर्‍यात कुठेही कृत्रिमता वाटत नव्हती.

कोणत्याही संगीतकाराचं गाण्याला संगीत देणं हे कामच असतं. नेहमीच्या सराईतपणे हे काम तो करतच असतो, पण नेहमीच्या सराईतपणे हे काम करत असताना त्याच्या हातात एखाद्या सुंदर सकाळी वेगळ्या वाटेची, वेगळ्या धाटणीची शब्दकळा चालून येते तेव्हा ते नेहमीचं काम तो केवळ नेहमीच्या सराईतपणे करत नाही तर जीव, प्रतिभा ओतून करतो. कल्याणजी-आनंदजींच्या ह्या दोन गाण्यांच्या बाबतीत असंच काहीसं घडून आलं होतं. कल्याणजी-आनंदजींनी संगीतकार म्हणून आपल्या कामाला निश्चितच पुरेपूर न्याय दिला. संगीतक्षेत्रात अजोड कामगिरी करून ठेवली. पण ‘जीवन से भरी तेरी आँखे’ किंवा ‘चंदन सा बदन’ ह्यासारख्या गाण्यांसाठी काम करताना त्यांनी आपल्या कामाचा खास आनंद घेतला हे ती गाणी ऐकताना नक्कीच जाणवतं.

संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलालजींबाबतही असंच एक निरीक्षण नोंदवता येईल ते ‘उत्सव’ ह्या सिनेमाच्या बाबतीत. ‘उत्सव’मधल्या ‘मन क्युं बहेका रे बहेका आधी रात को’ आणि ‘सांझ ढले, गगन तले, हम कितने एकाकी’ ह्या दोन्ही गाण्यांमधील संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलालजींची कलाकुसर ही त्यांच्या इतर गाण्यांपेक्षा कितीतरी वेगळी वाटत आली आहे! ‘मन क्युं बहेका रे बहेका’ हे कवी वसंत देवांनी लिहिलेले शब्द त्यांच्याकडे आले तेव्हाच ते नेहमीपेक्षा हटके शब्द असल्याचं त्यांना जाणवलं आणि त्या गाण्यावर काम सुरू केलं तेव्हा ते एक-दोन चाली लावून थांबले नाहीत तर त्यांनी त्यासाठी दहा-बारा चाली केल्या. अखेर जी चाल सरतेशेवटी निवडली त्यासाठी लता मंगेशकर आणि आशा भोसले ह्या दोन तुल्यबळ स्वरांची निवड केली. ह्या गाण्यासाठी दहा-बारा चाली करण्यात आल्या त्यातूनच लक्ष्मीकांत-प्यारेलालना वसंत देवांनी लिहिलेले ते शब्द किती आवडले होते ह्याची प्रचिती येते. वसंत देवांनी लिहिलेले ते केवळ कोरडेठाक शब्द नव्हते तर ती एक आरस्पानी कविता होती आणि तिचं सुरतालामधलं गाणं बनून लोकांसमोर जाण्याआधी ते खुद्द संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलालना आवडलं होतं.

त्याच सिनेमातल्या ‘सांझ ढले, गगन तले, हम कितने एकाकी’ ह्या गाण्यातल्या शब्दांतलीही कविता आधी संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलालना भावली होती. संध्याकाळ ही एक मन कातरून टाकणारी कातरवेळ…आणि अशा कातरवेळी मन विषण्ण होऊन एकाकी वाटू लागतं. तेच एकाकीपण, तीच विषण्णता लक्ष्मीकांत-प्यारेलालनी लावलेल्या चालीत इतकी हुबहू उतरली आणि सुरेश वाडकरांनीही ती आपल्या आवाजातून इतकी अप्रतिम पेश केली आहे की गाण्याच्या सुरूवातीपासून ह्या गाण्यातली ती विषण्ण करणारी कातरवेळ अंगावर आल्यावाचून रहात नाही. त्यातल्या दुसर्‍या अंतर्‍यातला ‘निशिगंधा’ हा शब्द सुरेश वाडकरांनी असा काही उच्चारला आहे की तो केवळ शब्द पुन्हा पुन्हा ऐकत राहावा! कवी वसंत देवांनी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा ते म्हणाले, ‘सांझ ढले, गगन तले, हम कितने एकाकी’ हे शब्द मी लिहून गेलो, पण तेव्हा मला त्या मीच लिहिलेल्या शब्दांचा अर्थ जेवढा उलगडला नाही तेवढा हे गाणं ऐकल्यानंतर उलगडला!’…
सांगायचा मुद्दा इतकाच की सिनेमातलं नेहमीच्या मळलेल्या वाटेवरचं गाणं वेगळं आणि कवितेच्या वाटेवर वेगळा अर्थ लेवून आलेलं गाणं वेगळं. तसं गाणं जेव्हा जेव्हा संगीतकाराच्या हातात सुपूर्द झालं आहे तेव्हा संगीतकारांनीही शब्दांमधली प्रतिभा ओळखून तिला आपल्या संगीतातून तशीच सजवली आहे. ती आपल्या आयुष्यातली मोलाची संधी, चालून आलेलं भाग्य किंवा आपल्या संगीतातल्या कौशल्याला आव्हान समजून त्यात मोलाची भरच घातली आहे!

First Published on: March 10, 2019 4:36 AM
Exit mobile version