मर्ढेकरोत्तर काव्यपर्वाचा ऐवज

मर्ढेकरोत्तर काव्यपर्वाचा ऐवज

नवी आविष्कारशैली प्रस्थापित करत साठोत्तरी कवितेला वळण देणारे आधुनिकतावादी जाणिवेचे कवी म्हणून दिलीप पुरूषोत्तम चित्रे यांचे नाव मराठी कवितेच्या इतिहासात नोंदवले गेले आहे. मर्ढेकरोत्तर काळातील महत्त्वाचा टप्पा म्हणून त्यांच्या कवितेकडे पाहिले जाते.त्यांनी जवळपास हजाराहून अधिक कविता लिहिलेल्या आहेत.त्यांच्या कवितांचे हिंदी-इंग्रजी भाषेत अनुवाद झालेले आहे.त्यांचे इंग्रजीतही सहा कवितासंग्रह प्रसिध्द आहेत. परंपरा आणि नवतेच्या संगमातून आकारलेली त्यांची अस्तित्त्ववादी कविता वैशिष्ठ्यपूर्ण ठरलेली आहे.भावना आणि विचाराच्या एकजीवी संरचनेतून त्यांनी घडवलेल्या नव्या भावोत्कट काव्यभाषेचे सर्जन मोलाचे आहे.जगण्याची नितळ थेट अभिव्यक्ती, नव्या शब्दकळेचा वापर आणि संवेदनांच्या सरळ भाषांकनातून घडलेला रूपबंध यामुळे त्यांची कविता वेगळी ठरते. ‘स्व’जाणिवेचे सार्वत्रिकीकरण करत वैश्विक अनुभूतीचे प्रकटीकरण ही कविता करते. मानवी प्रकृतीचा नैसर्गिक आविष्कार करत साकारलेली त्यांची कविता मानवी अस्तित्वाचा शोध घेणारी आहे. चित्रे यांचे जगणे आणि कविता यात अंतराय नाही. त्यांची कविता हेच त्यांचे आत्मचरित्र आहे. त्यामुळेच ही कविता श्रेष्ठ ठरलेली आहे. म्हणूनच ही कविता मराठी कवितेतील महत्त्वाची उपलब्धी आहे. नवी काव्यपिढी घडवणार्‍या या कवीच्या समग्र कवितेचे चिकित्सक संपादन रणधीर शिंदे यांनी केले आहे.

रणधीर शिंदे हे मराठीतील आजचे अघाडीचे संशोधक-समीक्षक आहेत. प्रामुख्याने कवितेचे अभ्यासक म्हणून त्यांचा लौकिक आहे. असे असले तरी कथा-कादंबरीची आकलने आणि अन्य साहित्य संज्ञांच्या अनुषंगाने त्यांनी विविध नियतकालिकांतून लिहिलेले लेख लक्षणीय ठरलेले आहेत. समाजशास्रीय-संस्कृतीशास्रीय समीक्षादृष्टीचे परिप्रेक्ष्य स्वीकारून त्यांनी केलेली समीक्षा साहित्यकृती,साहित्यिक आणि साहित्य संकल्पनेकडे पाहण्याची नवी नजर देणारी आहे. एका लेखकाचा अभ्यास कशारीतीने करावा याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्या ‘शरच्चंद्र मुक्तिबोध : व्यक्ती आणि वाड्मय’, ‘दिलीप पुरूषोत्तम चित्रे यांची कविता’ व ‘दि.के.बेडेकर’ या समीक्षाग्रंथाचा निर्देश करता येईल. याशिवाय ‘युगांतर मधील अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य’, ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाड्मय’, ‘गदिमा:मंतरलेले चैत्रबन’यासह इतर महत्त्वाची संपादने त्यांनी केलेली आहेत. ही संपादने त्यांच्या संशोधनपूर्ण संपादनदृष्टीमुळे वैशिष्ठ्यपूर्ण ठरलेली आहेत. हिच दृष्टी त्यांच्या प्रस्तुतच्या‘ एकूण कविता: दिलीप पुरूषोत्तम चित्रे यांची समग्र कविता या संपादन ग्रंथातही दिसते. हा ९८७ पृष्ठांचा ग्रंथ पॉप्युलर प्रकाशनाने उत्तम बांधणी व सुरेख निर्मितीसह साकारलेला आहे.

दिलीप चित्रे यांच्या कवितेचे मर्म उलगडून सांगणारी आणि या कवितेच्या आविष्कार विशेषांचे नेमके विश्लेषण करणारी रणधीर शिंदे यांची एकोणसाठ पानांची प्रस्तावना हा या संपादनाचा महत्त्वाचा विशेष आहे. चित्रे यांचे ‘एकूण कविता’या शीर्षकाचे चार खंड यापूर्वी पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहेत. तिसर्‍या खंडात ‘कविता’, ‘कवितेनंतरच्या कविता’ आणि ‘दहा बाय दहा’ या तीन काव्यसंग्रहाचा समावेश केलेला आहे. तर शेवटच्या चौथ्या खंडात त्यांच्या असंग्रहित कविता आहेत. या सर्व कविता एकत्रितपणे प्रस्तुतच्या संपादनात समाविष्ट केलेल्या असल्याने चित्रे यांचे एकूण काव्यभान समजून घेण्याच्यादृष्टीने हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. परिशिष्टात चित्रे यांच्या काव्यसंग्रहाच्या दिलेल्या प्रस्तावना आणि संदर्भग्रंथसूचित दिलीप पुरूषोत्तम चित्रे यांचे प्रकाशित साहित्य व त्यांच्या साहित्यावर प्रकाशित लेखन यांची लेखनसूची दिल्याने या ग्रंथाला परिपूर्णता लाभलेली आहे. चित्रे यांची एकूण कविता समजून घेण्यासंबंधीचा सर्व ऐवज या ग्रंथातून ग्रथीत झाल्याने या ग्रंथाला संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे.

या ग्रंथाला लिहिलेल्या अभ्यासपूर्ण दीर्घ प्रस्तावनेतून रणधीर शिंदे यांनी चित्रे यांच्या कवितेचे अर्करूपी स्वरूप विश्लेषित केले आहे. चित्रे यांची कविता समजून घेताना ही प्रस्तावना मार्गदर्शक ठरते. त्यांचे जीवन,व्यक्तिमत्त्व, लेखनपरिचय, लेखनावरील प्रभाव यांचे काव्य अनुबंधात्मक विश्लेषण शिंदे यांनी केलेले आहे. स्वातंत्र्योत्तर काळ आणि चित्रे यांची कविता, त्यांच्या कवितेतील अस्तित्त्वभान, आत्मपरता, स्री-पुरूष संवेदन, महानगरीय जाणिवा यासह विविध जाणीवसूत्रांचा मूलगामी अन्वयार्थ प्रस्तावनाकाराने लावलेला आहे. दिलीप चित्रे यांच्या कवितेची भाषाशैली आणि रूपदृष्ठ्या असणारे वेगळेपण नि सामर्थ्यही नेमकेपणाने विवेचित केलेले आहे. काव्य परंपरेचे मूल्यमापन करत मराठी आणि भारतीय कवितेतील त्यांचे स्थान रणधीर शिंदे यांनी यथोचितपणे निश्चित केलेले आहे. मराठी कवितेतील त्यांचे योगदान आणि वेगळेपणाची मूलगामी चर्चा प्रस्तावनेतून झालेली आहे. चित्रे यांच्या काव्यप्रकृतीचा नेमका काव्यपट यातून उलगडलेला आहे. त्यांच्या संवेदनस्वभावाचे आणि वैविध्यपूर्ण काव्यजाणिवेचे अचूक आकलन शिंदे यांनी मांडल्याने या समग्र कवितेचा अर्थगाभा विशद होतो. त्यांच्या कवितेची मर्मस्थळे ठळक होत या कवितेची सामर्थ्यस्थळे अधोरेखित होतात.

कोणत्याही साहित्याचे मूल्यमापन-अर्थनिर्णयन करताना अभ्यासकाजवळ वाङ्मयीन व्यवहार नि परंपरेची सखोल जाण आणि तटस्थवृत्ती असणे आवश्यक असते. कोणतेही पूर्वग्रह न ठेवता लेखक-कवींच्या मर्यादा-सामर्थ्याची नोंद करणारी स्वच्छ दृष्टी असणे गरजेचे असते. तरच समीक्षकाने लावलेला साहित्याचा अन्वयार्थ हा सत्यार्थ प्रकट करणारा आणि साहित्याचे नवे आकलन मांडणारा असतो. या प्रकारचे आकलन लेखक-कवींच्या लेखनातील श्रेष्ठतेच्या दिशा ध्वनित करत त्याचे साहित्यातील वाङ्मयीन स्थान निश्चित करत असते. तसेच त्या साहित्यातील सकस-निकसाचे सूचन करत साहित्यव्यवहाराला विस्तारित-विकसित करत असते. याप्रकारची वाड्मयीन दृष्टी नि समीक्षकीय क्षमता रणधीर शिंदे यांच्याकडे असल्यानेच सदरच्या प्रस्तावनेतील विवेचन बिनतोड आणि दिलीप चित्रे यांच्या कवितेचे संतुलीत व समर्पक मूल्यमापन करणारे आहे. रणधीर शिंदे प्रस्तावनेत लिहितात, चित्रे यांची कविता भारतीय कवितेचा मानबिंदू आहे. काव्यसंकल्पनेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणण्यात चित्रे यांच्या कवितेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात बीजकवी म्हणून चित्रे यांच्या वाङ्मयीन कामगिरीला असाधारण असे महत्त्व आहे. चित्रे यांच्या कवितेची सूक्ष्म चिकित्सा करत शिंदे यांनी नोंदवलेली उपरोक्तप्रमाणे निरीक्षणे या प्रस्तावनेची सघनता विशद करणारी आहे. त्यामुळेच ही प्रस्तावना महत्त्वाची ठरणारी वाटते. मराठीत अशा प्रकारच्या ग्रंथांना लिहिलेल्या आणि उत्तम ठरलेल्या प्रस्तावनांनमध्ये याही प्रस्तावनेचा समावेश अटळ आहे.

मराठीत आणि एकूणच साहित्य व्यवहारात संपादनाची परंपरा अजोड आहे.संपादने ही वाङ्मयीन निकडीपोटी निर्माण होत असतात. तशा निकडीतून निर्माण झालेली संपादनेच मूल्ययुक्त ठरतात. वाङ्मयीन आवश्यकतेतून निर्माण झालेली संपादने दस्तऐवज म्हणून अभ्यासकांना साह्यभूत ठरत असतात. अशा अनेक महत्वाच्या संकल्पना-लेखक आणि कवींच्यावरील संपादनांना संदर्भग्रंथांचा दर्जा प्राप्त झालेला आहे. या संपादनांना हा दर्जा प्राप्त करून देण्यात संपादकांची चिकित्सक दृष्टी आणि संशोधक वृत्ती कारणीभूत ठरलेली आहे. ग्रंथ संपादनाची एक शिस्त असते. ती पाळून ग्रंथाची अचूक उपयोगिता ससंदर्भ संपादकाने प्रेक्षपित करत त्याचे मूलगामीत्त्व अधोरेखित करावयाचे असते. अलिकडच्या काळात संपादने संख्यादृष्ठ्या उदंड झालेली आहेत. कदाचित आपल्या नावावर एखादेतरी पुस्तक असावे या मनिषेतूनही ही संपादनसंख्या वाढलेली असावी. परंतु वाङ्मयबाह्य कारणांनी निर्माण झालेली ही संपादने संपादनशिस्तीच्या अभावामुळे संदर्भमूल्य प्राप्त करताना दिसत नाही. अर्थात आजही काही अपवादात्मक असे संपादन ग्रंथ गांभीर्यपूर्वक निर्माण केले जातात. ते संख्यादृष्ठ्या अल्प असले तरी महत्त्वाचे ठरलेले आहे. अशाच महत्त्वाच्या ठरणार्‍या मालेत प्रस्तुत ग्रंथाचाही समावेश करता येईल. मर्ढेकरोत्तर काव्यपर्वाचा ऐवज म्हणून या ग्रंथाचे मोल लक्षात घेणे गरजेचे आहे.

-केदार काळवणे -सहायक प्राध्यापक, मराठी विभाग, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब, जि.उस्मानाबाद.पिन:४१३५०७, ईमेल:Kedar.kalwane.28@gmail.com मो:७०२०६३४५०२

First Published on: January 26, 2020 5:59 AM
Exit mobile version