एका युगाचा अस्त !

एका युगाचा अस्त !

आपल्या कामाशी निष्ठा असणं, ही बाब आजकाल दुर्मिळ होत चालली आहे. केवळ राजकारणातच नाही, तर सामान्य, अगदी रोजच्या जीवनातही. सार्‍याच गोष्टी पैशाच्या मोबदल्यात मोजण्याच्या या काळात निष्ठा वगैरे शब्द कालबाह्य झाल्यासारखेच आहेत. तरीदेखील कधी कधी कोणत्यातरी प्रसंगी वा घटनेनं ते शब्द आठवतात.
दिनू रणदिवे गेले.

पत्रकारितेशी निष्ठा असणारा एक वार्ताहर गेला. खरं तर त्यांच्या बाबतीत सांगायचं तर ती अव्यभिचारी निष्ठा होती. त्याबाबत त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही. स्वतःच्या आणि आपल्या वर्तमानपत्राच्या लौकिकाला बाधा येईल असं काही त्यांनी कधी केलं नाही, कुणाला करूही दिलं नाही. (काही काळापासून प्रचलित झालेल्या पेड न्यूज वगैरेबाबत त्यांना किती वेदना झाल्या असतील, ते त्यांचं त्यांनाच ठाऊक!) म्हणूनच त्यांचं नाव जेव्हा केव्हा घेतलं जात होतं तेव्हा ते अत्यंत आदरभावानंच आणि यापुढेही कुणी घेईल तेव्हा मनात आदरच असेल. पत्रकारिता हा धर्म (व्यवसाय नाही, आणि व्यापार बाजार तर अजिबात नाही असं) मानणार्‍या पिढीतला हा बहुधा अखेरचाच पत्रकार होता. थोड्या जड शब्दांत सांगायचं तर त्यांच्या निधनानं पत्रकारितेतील एका युगाचा अस्त झाला असंच म्हणावं लागेल.

रणदिव्यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि काही काळ सुन्न झाल्यासारखं झालं आणि काही मग काही प्रसंग चित्रफितीप्रमाणं डोळ्यापुढून सरकू लागले.
‘महाराष्ट्र टाइम्स’चं ऑफिस. वेळ रात्रीची. अर्थातच ऑफिसमध्ये माणसे खूप कमी.
एअर एडिशन तयार होत आलेली.
एकदा ती तयार झाली की, थोडा आराम आणि नंतर पुन्हा सिटी एडिशनचं काम सुरू. हे रोजचंच.
त्यामुळं त्या रात्रीही तसा कोणताच तणाव नव्हता.
एकदम कोणाचा तरी फोन रणदिव्यांना आला. त्यांनी तो घेतला आणि हातात पेन घेऊन, एकीकडे ऐकत, बोलत असतानाच लिहायला लागले. म्हणजे बातमी खूपच महत्त्वाचीच असणार, म्हणजे लगेच घ्यायला हवी अशी, असा अंदाज आला. पण कोणती ते काही कळेना. कारण फोनवर ते काय बोलतात ते कधीच कळायचं नाही, इतक्या हळू आवाजात बोलत. तसं एरवीही ते हळू आवाजातच बोलत. आपल्यामुळं इतरांना त्रास नको म्हणून!

त्यांचं काम एरवी तसं संथ असायचं. मात्र त्यांनी साधी म्हणून दिलेली बातमीही तशी महत्त्वाचीच असायची, त्यामुळं ती मागं ठेवणं शक्यच नसायचं. असं असलं तरी, कोणताही मुख्य उपसंपादक त्यांना कॉपी लवकर द्या, असं म्हणून घाई करत नसे. कारण त्यांची कॉपी अशी असे की, तिच्यावर कोणत्याही प्रकारचे संस्कार करण्याची आवश्यकता नसे, फक्त मथळा आणि मध्ये काही पोट मथळे. त्यातही मथळा लगेच दिला नाही तरी चालायचं. कारण जागेनुसार तो लहान मोठा करायला लागायचा.

ते डावखुरे होते आणि नेहमी शाईच्या पेननंच लिहीत. बॉलपेन त्यांनी कधीच वापरलं नाही. त्यांचं अक्षर जरासं तिरपं, पण अगदी स्वच्छ आणि स्पष्ट असायचं, त्यामुळं वाचायला अजिबात अडचण येत नसे. खाडाखोडही क्वचितच. यामुळं कंपोझिटर्स कितीही उशीर झाला, तरी अजिबात कुरकुर न करता, त्यांची कॉपी वेळेवर कंपोझ करून देत.
पण त्या दिवशीची बातमी फारच महत्त्वाची असावी. कारण ते कधी नाही, ते घाईघाईनं लिहीत होते. अचानक सारे गप्प झाले होते.

कॉपी झाली. तिच्यावर एक नजर टाकून त्यांनी स्वतःच उठून ती मुख्य उपसंपादकाकडे दिली. होती लहानशीच, पण देताना ते म्हणालेः पण या एडिशनला एवढी जायलाच हवी. पुढच्या एडिशनला सविस्तर देतो.
वर्तमानपत्रात रात्रपाळीचा मुख्यउपसंपादक म्हणजे (त्यावेळचा औट घटकेचा) संपादकच असतो. कारण त्यावेळी त्याच्याकडेच सर्वाधिकार असतो, आणि त्या अधिकाराचा वापर करण्याकडे बहुतेकांचा कल असायचा. अपवाद अर्थातच न्यूज एडिटर वा संपादकांच्या फोनचा! त्यांनी दिलेल्या सूचनांचा!
तर त्या मुख्य उपसंपादकानं सांगितलंः एअर एडिशन तयार झालीय, आता ही बातमी सिटीला घेऊ. तरीही रणदिव्यांनी आग्रह सुरू ठेवला, पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. तेही आपला हेका सोडायला तयार नव्हता. कधी नाही ते रणदिवे रागावलेले वाटले. कारण आवाज जरा वरच्या पट्टीत गेला होता. मी तेव्हा क्रीडा विभागात होतो आणि बहुतेकदा रात्रपाळीलाच. त्यामुळं मी हे सारं बघत ऐकत होतो.
न राहवून तिथे गेलो आणि म्हटलंः रणदिवे, काय झालं तरी काय? त्यावर ते म्हणालेः ही महत्त्वाची बातमी आहे, एअर एडिशनपासून जायलाच हवी. आणि हे आत्ता जाऊ शकत नाही, असं म्हणतायत.
ती बातमी खरोखरच अतिशय महत्त्वाची होती आणि आठ कॉलम हेडिंग नक्की झालं असतं. एअर इंडियाचे ‘एंपरर अशोक’ हे विमान मुंबई विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच समुद्रात कोसळलं होतं. मी त्या मुख्य उपसंपादकांना म्हटलंः अहो, ही बातमी खूपच महत्त्वाची आहे. ती एअर एडिशनपासून जायला हवी. तर ते म्हणालेः पण पान तर लागलं आहे. आता काही जमणार नाही. पण सिटीला तर तीच बॅनर होणार!
खरंच होतं ते! भारतातल्या सर्वच वर्तमानपत्रात ती मुख्य बातमी म्हणूनच छापली जाणार होती.

मग मी म्हणालोः की तुम्ही पान पाठवू नका. थोडा वेळ थांबायला सांगा. ही बातमी एअरला जायलाच हवी आहे, असे सांगा. कारण ती इतरत्र गेली नाही, तर त्या वाचकांना ती न मिळाल्यानं पेपरची बदनामी होईल. (कारण तेव्हा एअर एडिशन ही पुणे, कोल्हापूर, नासिक वगैरे ठिकाणी जायची). लहान का होईना, पण ती जायलाच हवी. थोडा उशीर झाला तरी चालेल. असं म्हणायचं कारण म्हणजे एखाद्या सामन्याच्या निकालाची महत्त्वाची बातमी ऐनवेळी आली, तरी आम्ही पानाला थोडा उशीर करत असू. तसं मी त्यांना बोलूनही दाखवलं आणि या बातमीसाठी उशीर झाला, तर कोणीही तक्रार करणार नाही, असं सांगून पुढं, प्लीऽज तेवढं कराच, असंही म्हटलं.

एव्हाना बहुधा त्यांनाही परिस्थितीचं गांभीर्य ध्यानात आलं असावं, बातमीचं महत्त्व तर त्यांनी जाणलंच होतं. आता आमच्या बोलण्यानं त्यांनाही धीर आल्यासारखं वाटलं असेल, किंवा, ही मोठी बातमी एअर एडिशनला गेली नाही, तर कदाचित उद्या आपल्यालाच त्याबाबत विचारलं जाईल, असंही त्यांना वाटलं असेल, कदाचित .. ते काहीही असेल, पण अखेर त्यांनी ती पहिल्या कॉलमात घेण्याचं मान्य केलं. पुढच्या हालचाली वेगानं सुरू झाल्या. अंकात ती बातमी घेतली गेली.

एवढा वेळ रणदिवे शांतपणं आमचा संवाद ऐकत होते. आता या एडिशनला बातमी नक्की घेतली आहे, हे ऐकताच त्यांचा चेहरा नेहमीसारखा झाला. लगेच ते सविस्तर बातमी लिहिण्याची तयारी करू लागले. आता मध्ये तासभर त्यांना मिळणार होता. मला म्हणालेः बरं केलंत. त्यांच्या बोलण्यातून त्यांचं समाधान जाणवत होतं आणि त्यामुळं मलाही खूप बरं वाटलं. त्यांचं वय, अनुभव पाहता ही दाद बहुमोलच होती.

त्या रात्री परतताना आम्ही बरोबरच होतो. आणि एकदम ते पुन्हा म्हणालेः बरं केलंत. मी म्हटलंः असं नका म्हणू. ती बातमीच तेवढी महत्त्वाची होती. ज्युनियर असलो, तरी मला राहवलं नाही, म्हणून मी तिथं आलो होतो. सॉरी.
ते फक्त हसले.

चीफ रिपोर्टर होईपर्यंत ते एकदम रात्री आठ साडेआठनंतरच संथपणं ऑफिसला येत.

लहानखुरी म्हणता येईल अशी देहयष्टी, वाढलेले केस आणि मिशांमुळे जरासा उग्र वाटणारा चेहरा. पँट आणि बुशशर्ट, अर्ध्या बाह्यांचा. नेहमीच. त्यांना फुलस्लीव्हजमध्ये पाहिल्याचं आठवतच नाही. आपल्या जागेवर जाऊन ड्रॉवर उघडत, आणि लगेच काम सुरू करत. मग डेस्कवाले त्यांना म्हणतः किती जागा ठेवायची? त्यावर ते म्हणायचेः ते तुमचं तुम्ही बघा. ते काम माझं नाही मी फक्त बातमी लिहून देणार. त्यांच्या या बोलण्यावर सर्वच हसत. कारण ते असं म्हणत, तेव्हा ती बातमी खूपच महत्त्वाची असायची. अर्थात बातमीच्या महत्त्वाप्रमाणं त्यांची कॉपी लहान वा मोठी असायची. मग ते लिहिताना क्वचित सिगरेटही पेटवीत. एकदा लिहू लागले की, बातमी पुरती लिहून झाल्याखेरीज जागेवरून उठतही नसत.

त्यांच्या इतर पैलूंबद्दल बरंच काही लिहिलं गेलं आहे, त्यामुळं पुनरावृत्ती नको. एक गोष्ट मात्र सांगायलाच हवी. नवीन आलेल्या वार्ताहरांना ते महत्त्वाच्या गोष्टी सांगत. ज्यांनी त्या ऐकल्या त्यांचं भलं झालं. वार्ताहरानं आणलेल्या बातमीचं महत्त्व त्यांच्या लगेच ध्यानात येई आणि मग ते त्या वार्ताहराला काही सूचनाही करत. अनेकदा बातमीचा फॉलोअप हवा असाही त्यांचा आग्रह असे.

कित्येकदा बातमी त्यांच्याकडे चालत येत असे. अर्थात ते त्यांच्या कॉन्टॅक्ट्समुळं होई. पण या बातमी पुरवणार्‍यांचा त्यांच्यावर पुरेपूर विश्वास असे आणि त्यांनीही कधी त्याला तडा सोडाच, पण साधा ओरखडाही येऊ दिला नाही. असंच एकदा त्यांना एका सरकारमधील एका मोठ्या अधिकार्‍याकडून काही कागदपत्रं मिळाली होती. त्यात वर्तमानपत्राच्या भाषेत चिक्कार मसाला होता. रणदिवे काम संपल्यानंतर ती कागदपत्रं वाचत बसले होते. एका केबिनमध्ये. काही टिपणं काढत होते. त्यांनी ती बातमी दुसर्‍या दिवशी द्यायची असं ठरलं होतं. त्यामुळं, तसं पाहिलं तर त्यांना ती कागदपत्रं घरी घेऊन जाता आली असती, तरी त्यांनी तसं केलं नव्हतं. कारण विचारलं तेव्हा, त्यांनी आमच्या जयप्रकाश प्रधान या सहकार्‍याला सहज सांगितलंः अरे एवढ्या विश्वासानं त्यांनी ती माझ्याकडं सोपवली आहेत, ती सुरक्षितच राहायला हवीत. म्हणून मी ती ऑफिसमध्येच माझ्या ड्रॉवरमध्ये कुलूप लावून ठेवणार आहे. त्याचा प्रश्नार्थक चेहरा पाहून ते म्हणालेः असं बघ, जाताना काही झालं, अपघात झाला, तर मग त्या कागदपत्रांचं काय.. आणि ती कागदपत्रं गहाळ झाली, तर मग ती देणार्‍याचा विश्वासघातच नाही का होणार? एवढा सारा विचार करून त्यांनी तो निर्णय घेतला होता.

जयप्रकाश म्हणतोः हा महत्त्वाचा धडा त्यांनी मला दिला आणि त्यामुळंच अनेकजण माझ्याकडे पूर्ण विश्वासाने महत्त्वाच्या बातम्या देत अगदी कागदपत्रं देखील. अशीच एकदा त्याला एका अधिकार्‍यानं काही चांगली बातमी होईल, अशी कागदपत्रं दिली. घेऊन जा, काम झालं की परत आणून दे; असं सांगितलं. पण तसं न करता, तेव्हा त्यानं रात्री उशिरापर्यंत, ती तिथं, त्या अधिकार्‍याच्या घरातच बसून वाचली. तो आजही सांगतोः विश्वासाचं महत्त्व मला रणदिव्यांनी शिकवलं!

दुसर्‍या दिवशी रात्रपाळीला येताना त्यानं बातमी लिहून आणली होती. आल्यावर ती रणदिव्यांकडं दिली. त्यांनी ती पाहिली आणि ड्रॉवरमध्ये ठेवून दिली. काही बोललेही नाहीत. नेहमीप्रमाणंच कामाला लागले होते. तिकडे प्रधान अस्वस्थ होत होता. शेवटी बाकी वार्ताहर घरी गेल्यानंतर ते प्रधानकडे गेले आणि त्याला म्हणालेः हे बघ, अलिकडे आपल्या काही महत्त्वाच्या बातम्या दुसरीकडे पोहोचवल्या जातात, असं माझ्या ध्यानात आलंय. कोण तेही मला माहीत आहे. त्यामुळंच मी या बातमीविषयी काहीच बोललो नाही. ती तुझी एक्सक्लूझिव्ह बातमी आहे, ती तशीच राहायला हवी. असं म्हणून त्यांनी ती मुख्य उपसंपादकाकडं दिली आणि त्यांना सांगितलं, प्रधानांचं नाव येऊ दे.

त्या काळात अशी बायलाइन मिळणं म्हणजे मोठाच मान असे, एवढी ती दुर्मिळ गोष्ट होती. त्यामुळं ती मिळणार्‍याकडून चहाही वसूल केला जाई. (आता काळ बदलला आहे, कित्येक वार्ताहर सध्या बहुधा आधी स्वतःचं नाव देऊन नंतर डेटलाइन देतात असं ऐकतो.)

अनेकदा ते एखादा क्लू एखाद्या सहकार्‍याला देत आणि बातमी त्यानं तयार केली की, त्यालाच त्याचं श्रेयही देत. हे त्यांचं मोठेपण. अंतुले प्रकरणाच्या बातमीच्या वेळीदेखील त्यांनी त्यांच्याबरोबर काम करणार्‍यांना-प्रकाश बाळ, प्रधान, अशांना त्यांनी श्रेय दिलं होतं.

तशी त्यांनी बाहेर काढलेली अनेक प्रकरणं गाजली, कित्येकांना अद्दलही घडली, काहींना पदत्याग करावा लागला. पण त्याबाबत बरंच छापून आलंय. तेव्हा पुनरुक्ती नको.

अनेकदा रात्री परत जाताना ते आम्हा दोघातिघांबरोबरच निघत. लोकलमध्ये आमच्याबरोबरच बसत. खरं तर त्यांच्याकडं फर्स्ट क्लासचा पास असे. मग कधी आम्ही गमतीत त्यांना म्हणायचोः तुम्ही इथं येऊन गर्दी करून एकाची जागा अडवता. त्यावर ते रागावल्यासारखं करून हसत. तेव्हा खरं तर डब्यात गर्दी नसे. पण ते सारं मजेत घेत त्यामुळं आमच्यावर कधीच रागावत नसत. आम्हाला वाटे हे कधी त्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करत असतील का, कारण नेहमी कोणाबरोबर तरी ते असत आणि अर्थातच त्या सर्वांकडं काही फर्स्ट क्लासचा पास नसे.

कोणत्याही वृत्तपत्रात, बातमीदारावर संपादकाचा विश्वास असणं महत्त्वाचं असतं. आमच्या संपादकांचा, तळवलकरांचा, रणदिव्यांवर पूर्ण विश्वास होता. ते जवळपास एकाच वयाचे. फक्त दोन महिन्यांचं अंतर त्यांच्यात होतं. ते मोठे आणि रणदिवे लहान. कधी कधी त्या दोघांमध्ये जोरदार वादंगही होत असे. पण असं असलं तरी त्यांनी रणदिव्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. कारण वादाचा मुद्दा वेगळा आणि काम वेगळं. मुख्य म्हणजे, रणदिव्यांच्या बातम्यांमुळे तळवलकरांनाही अनेकदा अग्रलेखासाठी चांगले विषय मिळत असत. आधी रणदिव्यांची बातमी आणि नंतर तळवलकरांचा अग्रलेख. वाचक खूश होत. पण ज्यांच्यावर ते अग्रलेख असत ते मात्र कसनुसे होत. निमूटपणं गप्प बसत. त्यांना प्रतिवाद करण्याजोगं काहीच नसे. मग कसलं उत्तर अन कसलं काय! कारण सारं काही पुराव्यांसकट असंच, रणदिव्यांचं असायचं.

त्यामुळंच ‘महाराष्ट्र टाइम्स’चा त्या काळात मोठा दरारा होता. एवढा की, दिल्लीतही ‘महाराष्ट्र टाइम्स’ची एअर एडिशन पोहोचण्याआधी त्यांचा म.टा.चा अग्रलेख आणि महत्त्वाच्या बातम्या फॅक्सनं पाठवण्याची तेथील उच्चपदस्थ आणि मराठी मंत्र्यांचीही त्यांच्या कार्यालयात सूचना असे. काही परभाषिक मंत्री तर त्यांचा अनुवाद करून घेत म्हणे. मुख्यमंत्री दिल्लीत असतानाही आधी ते फॅक्स पाहूनच बाहेर पडत असं सांगतात.

एखादे वेळी असं व्हायचं की, रणदिवे दुपारीच येऊन, थेट तळवलकरांच्या केबिनमध्ये जात. अशा वेळी बाहेरच्या सहकार्‍यांच्यात चर्चा सुरू होई, आता कुणावर संक्रांत येणार .. एक मात्र होतं. अशा बातम्यांमध्ये वैयक्तिक हेव्यादाव्याचा संबंध नसे. बातमीला योग्य न्याय मिळाला पाहिजे, हे कटाक्षानं पाळलं जात असे. त्यांना कुणी वैरी मानलं असेल असं वाटत नाही. ते तर जगन्मित्रच होते. सामान्य माणसे आणि कामगार कष्टकर्‍यांना त्यांचा आधार वाटे. ऑफिसमधील कोणीही बातमी दिली की ते तिच्या योग्यतेप्रमाणे ती वापरत. बातमी फक्त वार्ताहरांनीच आणायला हवी, वगैरे प्रकार त्यांना मानवत नसे. कारण महत्त्व बातमीचं, माणसाचं वा तो कोणतं काम करतोय याचं नाही. ते सर्वांना बातम्या आणण्यासाठी उत्तेजनच देत कारण त्यामुळे खूपच वेगळ्या बातम्या मिळत.

आणीबाणीच्या काळातली गोष्ट आहे.

जयप्रकाश नारायण यांना मुंबईत आणले जाणार आहे, ही बातमी कुठून कोण जाणे, रणदिव्यांना मिळाली होती. त्यावेळी सेन्सॉरची तपासणी असायची. आता ही बातमी तर अतिशय महत्त्वाची. ती सेन्सॉरच्या कचाट्यातून कशी सोडवायची असा प्रश्न. मग एक युक्ती केली गेली. मोठ्या अक्षरात वा मोठा मथळा न देता ती छापायचं ठरलं आणि तशी ती सिंगल कॉलममध्येच लहानशी दिली गेली. अपेक्षेप्रमाणं तिच्याकडं सेन्सॉरचं लक्ष गेलं नाही म्हणा किंवा कदाचित त्यांनाही ती काही फारशी महत्त्वाची नाही, ती आल्यानं काही होणार नाही, असं वाटलं असेल म्हणून म्हणा. (कदाचित त्या अधिकार्‍यालाही ती यावी असं वाटलं असेल, काही का असेना,) पण ती दुसर्‍या दिवशी छापून आली. अपेक्षेनुसार सर्वांनी ती बातमी वाचली, तेव्हाच ती रणदिव्यांची बातमी, हे ओळखलं आणि सकाळपासून घरी आणि नंतर ऑफिसमध्ये आल्यावर फोन घेता घेता ते हैराण झाले. जनता पक्षाच्या राज्यात जयप्रकाश जसलोकमध्ये असताना, नेमाने ते जसलोकमध्ये जयप्रकाश नारायणांकडे जात असत. लोहियांएवढाच त्यांना जयप्रकाश नारायण यांच्याबद्दलही आदर होता.

ते निवृत्त झाले, तेव्हा त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा वेगळ्याच प्रकारचा धक्का दिला होता. त्यावेळी असलेल्या ऑफिसच्या प्रथेप्रमाणे निरोप समारंभ आयोजित केला जात असे. तेव्हा छोटी भेटवस्तू, नाष्टा, भाषणं इ. असे. पण त्यांनी आधीच सांगून टाकलं की, मला निरोप समारंभ वगैरे काहीही नको. एवढ्या वर्षांच्या सहकार्याबद्दल मीच तुम्हा सर्वांना पार्टी देणार असं त्यांनी जाहीर केलं होतं. तशी ती झाली. अर्थातच त्यांची आज्ञा सर्वांनी प्रमाण मानली होती.

नंतर काही काळ फोनवरून संपर्क होत असे. मुंबई सोडल्यावरही अधून मधून त्यांना फोन होत असे. दोन फोनमधलं अंतर वाढत गेलं. अलीकडे त्यांच्या आवाजात कष्ट जाणवत होते आणि बोलणंही नीट लक्षपूर्वक ऐकावं लागायचं.
आता ते सारंच बंद झालं.

कुणालाच काही खबर लागू न देता ते गेले!

First Published on: June 21, 2020 5:48 AM
Exit mobile version