आता तरी प्रतिष्ठेचा विषय बनवू नका!

आता तरी प्रतिष्ठेचा विषय बनवू नका!

संपादकीय

सुशांत सिंह राजपूत एक उमदा अभिनेता, ज्याने स्वतःच्या हिमतीवर आणि कष्टाने बॉलिवूडच्या जगात स्वतःचे स्थान निर्माण केले, स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला. अस्खलित अभिनयाच्या जोरावर तो या चंदेरी दुनियेत अनेकांना वरचढ ठरला. गॉडफादरशिवाय ज्या ठिकाणी टिकाव लागत नाही त्या ठिकाणी सुशांत एकट्याच्या जीवावर पाय रोवून उभा राहिला, अशा यशस्वी अभिनेत्याने 14 जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केल्याचे सकृत दर्शनी समोर आले. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी सार्‍यांनी हळहळ व्यक्त केली. सुशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि सुशांतला पुढील प्रवासासाठी देवाकडे प्रार्थना करून सुशांत नावाचे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे सर्वांनी मान्य केले. असे असताना हे प्रकरण अचानक ज्या प्रकारे पुन्हा चर्चेत आले आहे आणि ते इतक्या टोकाला पोहचले आहे की, यातून महाराष्ट्रातील सरकार पडेल की काय, इतके ते गंभीर बनले आहे याचे आश्चर्य वाटते. म्हणूनच आज सुशांतच्या मृत्यूला 2 महिने उलटल्यानंतर त्याच्या मृत्यूचा उल्लेख नाइलाजाने संशयित आत्महत्या म्हणून करावा लागत आहे. सुशांतवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याची बहीण श्वेता सिंह किर्ती हिने ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा पहिला संशय व्यक्त केला.

नुसता संशय नाही तर सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून तिने आपल्या भावावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा जणू चंग बांधला. त्यानंतर ज्या वेगाने यावर तर्कवितर्क लढवणे सुरु झाले, बॉलिवूडमधील अनेकांची नावे यात संशयित म्हणून घेण्यात येऊ लागली, त्याला बॉलिवूडमधीलच अनेक दिग्गज कलाकारांनी दुजोरा दिल्यावर, हे प्रकरण साधे नाही असे वाटू लागले. तेव्हापासून दररोज नवनवीन नावे समोर येऊ लागली. महेश भट, करण जोहर, सलमान खान, संजय लीला भन्साळी, एकता कपूर यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला. या मंडळींच्या छळवणुकीमुळे सुशांतने आत्महत्या केली असा आरोप झाला. मात्र, कोर्टाने हा आरोप फेटाळला. त्यानंतर सुशांतची प्रियेसी रिया चक्रवर्ती हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या रियाच्या भोवती तपासाची चक्रे फिरत आहेत. रिया चक्रवर्ती ही सुशांतच्या आयुष्यात आली आणि सुशांत-अंकिता लोखंडे यांच्यातील 6 वर्षांपासूनच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण झाला. सुशांत-अंकिता यांच्या ब्रेकअपनंतर रिया आणि सुशांत सोबत फिरताना दिसायला लागले. त्यांचे फोटोही एकमेकांच्या सोशल मीडियातून दिसायला लागले होते. रिया सुशांतच्या आयुष्यात आल्यापासून त्याचे घराच्यांशी बोलणे कमी झाले होते, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी आणि जवळच्या लोकांनी केला होता. सुशांत कुटुंबियांशी व मित्रांशी कमी बोलायचा. तसेच तो वारंवार फोन नंबरही बदलायचा, असेही त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. सध्या सीबीआय सुशांत आणि रिया यांच्यातील आर्थिक संबंधही तपासत आहे.

या प्रकरणात जसे रिया चक्रवर्तीचे नाव समोर आले तसे राज्यात खळबळ माजवणारा आणखी एक आरोप झाला. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र, युवा सेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा संबंध जोडण्यात आला. आदित्य ठाकरे आणि रिया हे दोघे मित्र असल्याचे बोलले जाऊ लागले. तेव्हापासून या प्रकरणाला राजकीय वळण आले आहे. मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या म्हणून नोंदवली होती. मात्र, सुशांतचे वडील ही आत्महत्या नसून हत्या आहे, याची चौकशी करा, अशी मागणी करत होते. परंतु मुंबई पोलिसांनी त्याला नकार दिला. त्यानंतर सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांत सुशांतच्या मृत्यूची चौकशी होण्यासाठी तक्रार दाखल केली. ती दाखल करून घेत बिहार पोलिसांचे पथक थेट मुंबईला रवाना झाले. त्यांनाही मुंबई पोलिसांनी असहकार्य केले, त्यामुळे उत्तर भारत याचे तीव्र पडसाद उमटले. यातून सरकारच्या दबावाखाली पोलीस काम करत आहे, असे आरोप महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांवर होऊ लागले. विशेष म्हणजे याचे ना महाराष्ट्र पोलीस महासंचालक, ना मुंबई पोलीस आयुक्त यांनी खंडण केले. दोघेही गप्प राहिल्याने मुंबई पोलीस पर्यायाने सरकारभोवती संशयाचे ढग जमा झाले. त्यातच बिहार पोलिसांनी केंद्र सरकारला या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. ती मागणी मान्य करत केंद्राने या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करण्याचे आदेश दिले, त्यालाही महाराष्ट्र, मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारने विरोध केला. तरीही सीबीआयचे अधिकारी हे मुंबईत येऊन रियाची चौकशी करू लागले. त्यालाही सरकारकडून विरोध होऊ लागला. महाआघाडी सरकारच्या या विरोधाच्या मालिकेमुळे सरकारवर होत असलेले आरोप अधिक गडद होऊ लागले. सरकारने सीबीआय चौकशीला सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यावर मात्र, सुशांत सिंह राजपूत संशयित आत्महत्या प्रकरण महाआघाडी सरकारच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारे आहे का, असे सर्वसामान्य जनतेला वाटू लागले.

या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच, ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे, मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही, अशा शब्दात खुलासा केला. तसेच रिया चक्रवर्ती हिनेही मी आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही. तसेच त्यांच्याशी कधी बोलले नाही, असे सीबीआयला सांगितले आहे. असे असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर अजून एका शब्दाने बोलले नाहीत, त्यांच्या या मौनामुळे अजून गुंता वाढत आहे.
सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी आज निर्णय देताना या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआय करेल, त्यासाठी यापुढे महाराष्ट्र सरकारची परवानगी घेण्याची गरज भासणार नाही, मुंबईसह महाराष्ट्र पोलिसांनी यासाठी सीबीआयला सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आदेश दिले. त्यामुळे आता या प्रकरणाचा न्याय निवडा सीबीआय करणार आहे. असे असतानाही शिवसेनेचे नेते संजय राऊत मात्र, सुप्रीम कोर्टाच्याही निर्यणावर टीकाटिप्पणी करू लागले आहेत, या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नका, असे सांगत आहेत. त्यामुळे संजय राऊत जी भूमिका मांडत आहेत, ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे का, याबाबत शिवसैनिक, नेते. पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनता संभ्रमात आहेत. कारण इतके सर्व घडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर बोलायला तयार नाहीत आणि आदित्य ठाकरेही अचानक अज्ञातवासात गेल्याप्रमाणे सार्वजनिक जीवनातून गायब झाले आहेत, त्यामुळे भाजपवाले हे प्रकरण सरकारला पडण्यास कारणीभूत ठरेल, असे जे ‘56 इंच छाती’ फुगवून ‘रोखठोक’पणे सांगत आहेत, त्यात तथ्य आहे का, असे वाटू लागले आहे. जर खरंच यात सरकारला धोका नसेल तर मग सरकारने पर्यायाने शिवसेनेने हा विषय प्रतिष्ठेचा न बनवता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करून सीबीआयला तपासात पूर्ण सहकार्य द्यावे.

First Published on: August 19, 2020 8:25 PM
Exit mobile version