महासंगणकाचे जनक डॉ. भटकर!

महासंगणकाचे जनक डॉ. भटकर!

परम सुपरकॉम्पुटर आणि सी.डॅकचे निर्माते आणि संस्थापक विजय भटकर यांचा आज जन्मदिवस. अमेरिकेने संगणकविक्रीसाठी घातलेल्या अटी नाकारत भारताने डॉ. भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला स्वतःचा महासंगणक बनवण्याचे ठरवले. हवामानाच्या अंदाजातील अचूकता वाढवण्यासाठी महासंगणक ही भारताची मोठी गरज होती. २ जून १९८८ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सी-डॅक या संस्थेची स्थापना पुणे विद्याठात स्थापना केली. भटकर हे तेव्हा ‘इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर’चे संचालक म्हणून त्रिवेंद्रमला काम करीत होते. महासंगणक बनवण्यासाठी विजय भटकर पुण्यातील एनआयसीत आले. तोपर्यंत त्यांना महासंगणकाचा कोणताही अनुभव नव्हता. अमेरिकेने देऊ केलेल्या किमतीच्या निम्म्या किमतीत तसेच निम्म्या वेळेत डॉ. भटकर यांनी परम-८०० हा महासंगणक तयार केला होता.
११ ऑक्टोबर १९४६ रोजी त्यांचा जन्म झाला. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा हे त्यांचे मूळ गाव. मुरंबा, करजागाव, मूर्तिजापूर, अमरावती, नागपूर, वडोदरा आणि दिल्ली अशा अनेक ठिकाणी त्यांचे इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगचे आणि पीएचडीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान त्यांनी विपुल वाचन केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परदेशी नोकर्‍यांच्या अनेक संधी चालून आल्या असताना त्यांनी भारतात राहणेच पसंत केले. १९६८ साली विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना झाली. तब्बल १० वर्ष त्यांनी त्या कमिशनवर काम केले. इंदिरा गांधी यांनी १९७२ साली ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार’ साठी नेमलेल्या महत्त्वाच्या समितीचे ते सदस्य होते. भटकरांच्या मार्गदर्शनाखाली केरळमध्ये १८ कारखाने उभारण्यात आले. १९८२ च्या एशियाडच्या वेळी भारतात पहिल्यांदाच दूरदर्शनचे रंगीत प्रसारण झाले. दूरदर्शनच्या रंगीत प्रसारणात डॉ. भटकर यांचा मोलाचा वाटा होता. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दूरदर्शनच्या रंगीत प्रसारणाची कामगिरी भटकरांवर सोपवली. केल्ट्रॉन आणि तिरुअनंतपूरमच्या इलेक्ट्रॉनिक्स संशोधन संस्थेने भटकरांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्टा करून हे उद्दिष्ट पूर्ण केले. भटकरांनी इलेक्ट्रॉनिक्सची अनेक उपकरणे व प्रणाल्या विकसित केल्या. सुरक्षिततेच्या आणि उत्पादन क्षमतेच्या बाबतीत त्यांनी भिलाई प्लान्टमध्ये सुधारणा करून दिल्या. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण प्रणाली, उद्योगातील स्वयंचलित यंत्रणा, कलकत्ता भुयारी रेल्वेची संगणकीय प्रणाली त्यांनी विकसित केल्या. भटकर टाटा कन्सल्टन्सीत १९८७ मध्ये उपाध्यक्ष झाले. १९९३ मध्ये डॉ. भटकर यांनी परम-८०० तर १९९८मध्ये परम-१००० हे संगणक बनवले. प्रति सेकंद एक अब्ज गणिते करण्याची क्षमता हे परम संगणकाचे वैशिष्ठ्य. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो. विकसनशील देशातील असा हा एकमेव संगणक आहे. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपान सोडता फक्त भारतात आहे.
भारतात बोलल्या जाणार्‍या सर्व भाषा संगणकावर आणण्यासाठी भटकर यांनी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी पुण्यातील सी-डॅकमध्ये (Centre for Development of Advanced Computing) प्रगत संगणकीय शिक्षण केंद्र सुरू करून हजारो मुलांना संगणकाचे शिक्षण दिले. डॉ. भटकर यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदव्युत्तर शिक्षणाची संस्था त्यांनी स्थापन केली. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला संगणकीय प्रणाली बनवून दिली. त्यांनी एसएमएससाठी भारतीय भाषांची प्रणाली विकसित केली. शाळेपर्यंत न पोहचणार्‍या मुलांसाठी ‘एज्युकेशन टू होम’ (ईटीएच) ही संकल्पना मांडून त्यासाठी १९९८-९९ मध्ये ईटीए संशोधन शाळा सुरू केली. त्यामुळे कदाचित भारत हा जगातील सर्वात मोठा संगणक साक्षर देश बनेल. ग्रामीण भागात संगणक शिक्षणाचा प्रसार अधिक होण्यासाठी डिजिटल स्कूल काढून त्याद्वारे वीस लाख लोकांना शिक्षण दिले. त्यांनी घरात येणार्‍या एकाच वायरमधून आपल्याला फोन-टीव्ही आणि संगणक चालवता येतील अशी ब्रॉडबँड प्रणाली विकसित केली. भटकरांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, डीव्हीनेट, मल्टिया, डिशनेट या संस्थाही स्थापन केल्या.

First Published on: October 11, 2019 6:35 AM
Exit mobile version