आपला झरा आपणच शोधावा!

आपला झरा आपणच शोधावा!

सुनील यावलीकर यांनी काढलेले चित्र

खरं म्हणजे चित्रांची आणि माझी भेट काही इतक्या उशिरा नव्हती झाली! बालवयातच चित्राचं बोट पकडलं होतं. कागद-पेन्सिल, पाटीवरचा-भिंतीवरचा नागोबा, बोटाने गिरवलेली धुळचित्रे ही चित्र-मैत्रीच होती. सुट्टीच्या दिवशी कामाला जाऊन मिळालेल्या पैशात आणलेला रंगाचा डब्बा, त्यातील रंग धाकट्या भावाने एकमेकांत मिसळल्यामुळे केलेला आकांड-तांडाव हे सर्व चित्रांची मैत्री वाढवणारे अनुभव होते. चंद्राचे. त्यातही उगवणार्‍या आणि मावळणार्‍या चंद्राचे आकर्षण भिजल्या रंगातून कागदावर उमटायचे. शाळेतल्या अंंबूताई गंधे मॅडमनी रंग कसे मारावे ते थोडंफार सांगितलेलं.

चित्र, कविता आणि लेखन या तिन्ही गोष्टी माझ्या अंतर्मनाचा अविभाज्य भाग बनल्यात. श्वासाइतक्याच देहाला जखडल्यात. मुळात हे विश्वच सुंदर आहे. पृथ्वीवरील सजीवांनी सुंदर जीवन जगावं, प्रत्येकातलं माणूसपण फुलारून यावं हे सौंदर्याची, आनंदाची आस असणार्‍या प्रत्येकाचं साहजिक स्वप्न असतं. त्याला इजा पोचताच स्वप्न पाहणारा अस्वस्थ होतो. या भावनिक संघर्षातून स्वतःला सावरत सौंदर्य टिकवण्याचा अटीतटीचा प्रयत्न करतो. या प्रयत्नांदरम्यान तो आपली माध्यमं शोधतो. मला ही साधनं लेखन आणि चित्र या दोन माध्यमात भेटली.

खरंतर चित्रकलेचं रीतसर शिक्षण घेऊन शिकायची होती. पण शेतीमातीची अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे पोटापाण्यासाठी गावदूर शाळा मास्तरकी आणि उर्वरित चळवळ असं करत एक दशक गेलं. यात अधूनमधून भेटणार्‍या मित्रासारखी चित्रं भेटीला यायची. कधी रात्री उशिरापर्यंत कोळसा, पेन्सिलने मातीत सारवलेल्या भिंतीवर उमटून संवाद करायची. कधी वर्गखोलीच्या भिंतीवर मुलांसोबत बोलताना पाठीवर हात ठेवायची. पण सलग उसासून मित्रासारखा संवाद मात्र झालाच नाही. बालपणीच्या मित्रांचे मोठेपणी मार्ग बदलल्यावर जसं होतं, तसं काहीसं झालं होतं ते!

अनेकदा विविध कारणांनी आलेल्या वैफल्यातून सावरायला चित्र धावून आलीत. उत्कट ओढीनं त्यांना बिलगलो. कलेचा विद्यार्थी नसल्यामुळे तंत्र वगैरे काही ठाऊक नव्हतं. तेव्हा कला शिकणार्‍या धाकट्या भावाने, अरूणने ‘नैसर्गिक व्यक्त होण्यासाठी तंत्र माहीत असण्याची गरज नाही’ हे सांगून आत्मविश्वास वाढविला. आताही तंत्र ठाऊक नाही, जशा प्रतिमांचे आकार अंतर्मनात उमटतात. त्याच चित्रात आल्यास तंत्र वगैरे दुय्यम गोष्टी आहेत असं मला वाटतं. उरला रंगसंगतीचा भाग. सुसंगती आपल्या जगण्याचीच लय आहे. त्यामुळे जास्त विचार करण्याची गरज नाही, असं स्वतःलाच सांगितलेलं. चळवळीतला मित्र लक्ष्मीकांत पंजाबी यानं वेळोवेळी पाठवलेली पत्रं म्हणजे सुसंवादाचा ठेवा होती. एकदा त्याची दोन पोस्टकार्ड आली. त्यावर त्याने रंगीत कागद चिकटवले होते. बघून वाटलं, माध्यम म्हणून आपण कागदांचा वापर केला तर… साध्या व्हाईट पेपरवर उपलब्ध रंगीत कागदांचा उपयोग करून कोलाजचा प्रयोग सुरू केला.

रंग माध्यमाची तेवढी ओळख नव्हती, ते कसं वापरावं याचं भानही नव्हतं तेव्हा रंगीत कागदांच्या तुकड्यांनी सोबत केली. कागदांच्या मांडणीतून चित्र आकाराला आली. निर्जिव कागदाच्या तुकड्यांतून निर्माण झालेली सजीव चित्रे प्रचंड आत्मविश्वास देऊन गेली. मग वेळ-काळाचे बंधन बाजूला पडून अंतर्मनात साचलेली खदखद मूर्त व्हायला लागली. हे माझ्यासाठी विस्मयकारक होतं. सोबत ‘अस्वस्थ वर्तमान’ कादंबरीचं लेखन सुरू होतं. यातील काही चित्रांच्या गुंडाळ्या आणि हस्तलिखित कादंबरीसह विनोद अढाऊ या मित्राने अकोल्यात कवी विठ्ठल वाघांची भेट घालून दिली. विठ्ठल वाघ हे कोलाज माध्यमातील मोठे चित्रकार. त्यांचे अकोल्याचे घर म्हणजे सांस्कृतिक ठेवाच. त्यांच्यासोबत रात्रभर संवाद एके संवाद.. त्यांनी चित्राला दिलेली दाद… ‘आपला झरा आपणच शोधला पाहिजे’ हे त्यांचं वाक्य चिनभीन झालेल्या मनात चांगलंच रुतलं. अरे, आता लेखन आणि चित्र हीच आपली चळवळ! अशा एका नव्या जाणिवेतून चित्रप्रवास सुरू झाला.

अंतर्मनातील घुसमटीचा, अस्वस्थतेचा निचरा चित्रातून व्हायला लागला. व्यवस्थेचं दृश्यरूप हे अत्यंत आकर्षक, कोणालाही लुभावणारं. पण खरंच ही व्यवस्था इतकी सुंदर आहे? मूळात या आकर्षकतेखाली व्यवस्थेचा एक मोठा वटवृक्ष उभा आहे. पोखरलेला, किडलेला! आपण तरी काय करतो? अशा या व्यवस्थेच्या पालखीचे मान खाली घालून भारवाही बनतो. प्रामाणिकपणे पालखी वाहून आपल्या वाट्याला काय येतं? तर व्यवस्थेच्या किडलेल्या फांदीला लटकण्याचा शोकांत..!

धार्मिक, जातीय दंगलीची दाहकता अस्वस्थ करते… सुंदर जगाचं सुंदर चित्र या डोळ्यांच्या बाहुलीत पाहिलं. तुकारामाचं हळवं हृदय घेऊन आपण माणसं सांधत जातो. माणसं माणसावर इतकी का उलटतात? कुठला धर्म नि कुठलं काय? सगळं काळीमा फासणारं.. त्यापेक्षा आपण ज्या सुंदर सृजनाच्या बिंदूतून आलो त्याच बिंदूत परत जाता आले तर.. धर्माच्या नावाखाली माणसाची हत्या होते.. मग धर्म काय कामाचा? हे आणि असे सलग चिंतन हे ‘सिस्टीम’, ‘तुका म्हणे’, ‘गर्भवासी’, ‘दंगल’ या चित्रांची प्रेरणा होऊन राहिलं आहे.

‘स्त्री’ हा सृजनशील विश्वाचा सर्वात महत्त्वाचा घटक विषम व्यवस्थेनं मात्र स्वतःच्या सोयीसाठी तिच्यावर दुय्यमत्व लादलेलं. निर्मितीचे सर्व श्रेय लाटण्याचा हा प्रकार. ती स्वतःची नाहीच. ती एक निर्मिक, मानवी जगण्याचा आरंभबिंदू. तिचं कष्टप्रद जगणं अजून संपलेलंच नाही. यातून निर्माण झालेले दुभंगलेपण, परंपरा, नीतीमत्ता या नावाखाली होणारं शोषण या ‘स्त्री’ विषयक चित्रांच्या माझ्या प्रेरणा आहेत. यातूनच ‘रिप्रेशन’ नावाची तैलरंग माध्यमातील माझी चित्रमालिका निर्माण झाली.

तैलरंग, कॅनव्हास हे माध्यम खूप उशिरा हाती आलं. हे महागडं माध्यम. त्यांच्या अनोळखीपणासह आर्थिक अडचणीमुळे हिंमत होत नव्हती. हे माध्यम वापरायला सुरुवात केली तेव्हा निर्मितीची एक वेगळीच अनुभूती यायला लागली. कलाक्षेत्रातील शैक्षणिक पार्श्वभूमी नाही, चांगली चित्र-प्रदर्शनं पाहायची सोय नाही. त्यामुळे कुतरओढ व्हायची. आताही होते. समाजमाध्यमांतून जुळलेले चित्रकार मित्र त्यामध्ये व्लादीमीर तिमुश, अ‍ॅमना रिटा बाबॅरी, अलेन मॅन्टरॉन, वोल्गा कोमोव्हा असे दोस्तलोक जगभरातल्या महत्त्वाच्या कलाकृती शेअर करतात. त्यातून तैलरंगातील समज विकसित होत गेली. कॅनव्हासची मैत्री गडद होत गेली. त्यातून स्वतःची शैली विकसित होत गेली. माझ्या ‘शेड्स ऑफ चाइल्डहूड’ या चित्रमालिकेने पुन्हा बालपणाचे नवीन कंगोरे अनुभवायला दिले. या चित्रमालिकेला ज्येष्ठ कवी-चित्रकार वसंत आबाजी डहाके यांच्यासारख्या मान्यवरांसह रसिकांनीही भरभरून दाद दिली. काळ्या शाईतली लयदार रेषांची रेखाटनं वर्तमानावरच्या प्रतिक्रिया नोंदवत जातात.. देहमनाची तगमग शांत करतात.

शेतीमातीच्या जंजाळात पाय रोवून बालपण गेलं. त्या शेतीची आजची अवस्था, शेतकर्‍यांनी स्वतःला संपवणे हे वास्तव मन कुरतडणारं आहे. मुद्दल विकून जगणारा आणि आता विकायला काहीच नाही त्यामुळे स्वतःला संपवायला लागलेल्या शेतकरी खरंतर कॅन्व्हासलाही पेलत नाही. ती अस्वस्थता चित्रांना प्रेरीत करते. आयुष्याच्या अनेक कंगोर्‍यापैकी स्वतःचाही एक सुप्त कंगोरा असतो. फक्त स्वतःपुरता. ते गाठोडे उलगडताना बालपणात अंतर्मनाच्या खोल कप्प्यात रूतून बसलेली निसर्गाची रूपं, तत्कालीन अनुभव हा चित्रांचा अविभाज्य भाग झाला. बालपणाचा वास असणार्‍या नेणिवेला पुन्हा चित्रांच्या माध्यमातून अनुभवता आले.

स्वतःच्या अस्तित्वाचा शोध ही निर्मितीची प्रेरणा राहिली आहे. चंद्रजाणीव ही अनेक चित्रांमध्ये आहे तसा चंद्रास्त रुततोच मनात. आभाळात रंग विस्कटलेले, भडक रंगाची झाक, मनातल्या आंदोलनांचे पार्श्वसंगीत.. असा चंद्रास्त डोळ्यात विरत विरत जातो. जागतिकीकरणाने जग जवळ आले आहे. त्यासोबत सामाजिक आणि व्यक्तिगत जगण्यात ग्राहकीकरण वाढत आहे. माणूसपणाला नख लावणारं भयप्रद वास्तव, निसर्गतत्व कायम ठेवणारा स्वाभाविक जीवन प्रवाह आणि स्वतःशी रातदिन संघर्ष…. अशा अवस्थेत पुढचा कॅनव्हास आहे.


– सुनील यावलीकर

(लेखक प्रयोगशील चित्रकार आहेत)

 

First Published on: July 15, 2018 8:15 AM
Exit mobile version