दृष्टिहीनतेमुळे रखडली दादारावची पीएचडी

दृष्टिहीनतेमुळे रखडली दादारावची पीएचडी

अंध दादाराव मुरकुटे

एका गरीब शेतकरी कुटुंबातील १०० टक्के अंध असलेल्या दादाराव मुरकुटे याने थेट नेट-सेटची परीक्षा पास केली. त्यानंतर तो थेट मुंबई विद्यापीठातील इतिहास विषयाच्या पीएचडी मुलाखतीत उत्तीर्ण झाला आहे. अतिशय खडतर प्रवास करून त्याने इथपर्यंत मजल मारली आहे. एकीकडे समाजाचा अंधव्यक्तीकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टिकोन आणि सरकारची उदासीनता यामुळे दादाराव मुरकुटेच्या प्रवासातील अडथळे संपायचे नाव घेत नाहीत. मागील वर्षी तो मुंबई विद्यापीठात पीएचडीची मुलाखत उत्तीर्ण झाला होता. या गोष्टीला एक वर्ष होऊनसुद्धा त्याची पीएचडी रखडली आहे. कारण त्याने पीएचडी करता मार्गदर्शक प्राध्यापक मिळावे यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्याला विद्यापीठाकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तो हताश झाला आहे. मात्र हार न मानता या व्यवस्थेच्या आणि स्वतःच्या अंधपणाविरुद्ध तो संघर्ष करीत आहे.

१०० टक्के अंध असूनही स्वत:ला अपंग मानत नाही

दादाराव हा विदर्भातील एका दुष्काळग्रस्त छोट्याशा गावातील रहिवासी आहे. मात्र लहानपणापासून तो स्वावलंबीपणे जगत आला आहे. त्याने शालेय शिक्षणापासून महाविद्यालयीन शिक्षणाचा प्रवास सरकारी वसतिगृहातून पूर्ण केला आहे. त्याला इथपर्यंतच्या प्रवासात बर्‍याच समस्यांना समोरे जावे लागले; पण तो कधीही नाउमेद झाला नाही. तो मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी मुलाखतीत पास झाला आहे. त्याची इच्छा इतिहासातील प्राध्यापक बनून विदर्भातील जंगलातील आदिवासी मुलांना इतिहासाचे शिक्षण देण्याची आहे. दादाराव १०० टक्के अंध आहे. तरीही तो कधीही स्वत:ला अपंग मानत नाही. त्याची घरची परिस्थिती खूप हलाखीची आहे.

अभ्यासासाठी आधुनिक साधनांचा उपयोग

दादाराव मुरकुटे आपल्या अभ्यासात टॉकिंग बुक, टॉकिंग सॉफ्टवेअर आणि ई-लायब‘रीसारख्या आधुनिक साधनांचा उपयोग करतो. आज महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात दादारावसारखे अंध, अपंग विद्यार्थी मोठ्या जिद्दीने अभ्यास करत आहेत. मात्र पाहिजे तितक्या सोयीसुविधा सरकार आणि समाजाकडून मिळत नाहीत, अशी खंत त्याने ‘महानगर’शी बोलताना व्यक्त केली आहे. दादारावने एम.ए. इतिहास आणि एम.फिलमध्ये पदवी मिळवली आहे. पीएचडीची मुलाखत पास होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र आर्थिक अडचणींसोबतच इतर समस्यांमुळे त्याची पीएचडी रखडली आहे. आत्मविश्वास न हरवता तो पुढील वाटचाल करत आहे. अंधत्व आलेल्या विद्यार्थांना पीएचडी गाईड मिळत नाहीत. विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांची दखल घेतली जात नाही. सरकार अंध आणि अपंग नागरिकांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करते. पण त्या अनेक योजना फक्त कागदावरच राहतात.

विद्यापीठात विकलांगांची गैरसोय

मुंबई विद्यापीठात अपंगांसाठी शैक्षणिक सुविधा नाहीत. त्यांच्या अभ्यासासाठी अत्याधुनिक यंत्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे अंध विद्यार्थांना अभ्यासात खूप अडचणी निर्माण होतात. आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. विद्यापीठ कायदानुसार कॉलेज आणि कॅम्पसमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प असणे आवश्यक आहे. मात्र मुंबई विद्यापीठाच्या कित्येक विभागात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेला रॅम्प उपलब्ध नाही.

First Published on: July 6, 2018 9:53 AM
Exit mobile version