सावधान, अण्णा जागे झालेत..!

सावधान, अण्णा जागे झालेत..!

देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची निरंकुश सत्ता असताना राळेगणमध्ये असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची अवस्था त्या सरकारने काय केली होती, याची जाणीव सार्‍या देशाला आहे. काँग्रेसवाले बरे, असं सांगण्याची वेळ दस्तरखुद्द अण्णांवर त्या सरकारने आणून ठेवली होती. ज्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करून घेतला त्या अण्णांची हे सरकार अशी अवहेलना करेल, असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्या सरकारच्या काळात अण्णा जणू नो व्हेअर झाले होते. निमित्त मात्र रामलीला मैदानावर आंदोलन बोलवून अण्णांनी स्वत:चं हसं करून घेतल्याचं देशाने पाहिलं. मनमोहन सरकार विरोधात आरोपांची आणि मागण्यांची राळ उठवणार्‍या अण्णांनी त्या सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं. देशात लोकपाल लागू करण्याच्या मागणीसाठी सारा देश अण्णांच्या मागे एकवटला. अखेरच्या क्षणाला सरकारने शब्द दिला आणि अण्णांचं आंदोलन संपलं. निवडणूक तोंडावर आली असताना अण्णांनी उभं केलेलं आंदोलन भाजपच्या पथ्यावर पडलं आणि त्या पक्षाच्या नेत्यांनीही अण्णांना सरकार आल्यास लोकपाल आणण्याचा शब्द दिला. भाजपचा हा शब्द उचलून धरण्यासाठी अण्णांकडे पुरेशी फौज होतीच. आर.के. सिंग, किरण बेदी, बाबा रामदेव, श्री श्रींसारख्यांचं अण्णांच्या भोवती कोंडाळं होतंच. या सर्वांना अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांची
फौज दिली आणि आंदोलन यशस्वी झालं. पण आंदोलनातून काय हाती आलं तर भोपळा. देशात भाजपचं सरकार प्रचंड बहुमतात निवडून आलं आणि अण्णांसह सगळ्यांनाच आता लोकपाल लागू झालंच असं झालं होतं. सरकारने आपल्या कारभाराची पाच वर्षे पूर्ण केली पण लोकपालाचं नाव काही काढलं नाही. ज्यासाठी अण्णांनी हा आटापिटा केला त्यातून काहीच बाहेर येत नाही असं पाहून अण्णांना जाग यायला हवी होती. पण अण्णांची मानसिकताच भाजपधार्जीणी असल्याने त्यांनी केवळ निद्रा काढली. निद्रा हा शब्द जरा कठोर वाटेल. कोणी तरी सांगेल अण्णांनी राज्य आणि केंद्रांना शेकडो पत्रं सरकारला पाठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अडीचशे पत्र धाडली असला युक्तीवाद अण्णांच्या भलेपणासाठी करेल. पण हे आता सांगण्याची सोय राहिली नाही. काँग्रेसच्या काळात एका पत्राला उत्तर दिलं नाही की अण्णा सारा राग सत्तेवर काढायचे. आज अण्णांच्या शेकडो पत्रांना मोदी साकरकडून कचर्‍याची टोपली दाखवली जात असताना त्यांना याचं काहीच वाटत नसेल, तर अण्णा सत्य होते, असं कोण म्हणेल? ज्यांना सोबत घेऊन अण्णांनी आंदोलनाचा गाडा रचला ते सगळे भाजपचे पाठिराखे होते, जेव्हा स्पष्ट झालं तेव्हाच खरं तर अण्णांनी त्यांची निर्भत्सना कारायला हवी होती. अण्णांनी ते केलं नाहीच. नाममात्र नव्या कोअर कमिटीची स्थापना केली. पण ती कमिटी म्हणजे लोकांना दाखवाची एक चाल होती हे उघड व्हायला वेळ लागला नाही. या कोअर कमिटीची एकही बैठक त्यानंतर झाली नाही. याचंही अण्णांनाही काही वाटलं नाही. स्वत:ची हळवा म्हणून ओळख देणार्‍या अण्णांना आपण लोकांच्या विश्वासाचं दायित्व हरवून बसतो आहोत याचंही काही वाटलं नाही. तसं असतं तर देशात घडणार्‍या असंख्य अप्रिय घटनांच्या निषेधार्थ त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला असता. देशाला एक दिशेला आणलं असतं. त्यांनी यातली एकही गोष्ट केली नाही. निमित्तमात्र आंदोलन करायचं आणि गिरीश महाजन यांच्यासारख्या स्वैर मंत्र्याकडून तडजोड घडवून आणण्याचा खेळ त्यांनी केला. आपल्या मागणीचं नंतर काय झालं याचा जाब कधी सरकारला विचारला नाही. ज्यांनी आपल्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केलं त्या नरेंद्र मोदी यांना अण्णा किती पोकळ आहेत, याचा अंदाज आला आणि तोच अंदाज घेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना वाटेला लावलं. तरी अण्णा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरच कौतुकाचा मारा करत असतील तर अण्णांवर विश्वास ठेवायचा कसा? विश्वासार्हता का जाते हे अण्णांना कोणी सांगायचं कारण नाही. अण्णांच्या आंदेलनातल्या म्होरक्यांना भाजपच्या सत्तेत स्थान मिळालं तेव्हाच खरं तर अण्णांवरचा सामान्यांचा विश्वास उडाला होता. ज्यांनी भाजपच्या सत्तेचा वाटा घेतला त्यातल्या एकालाही दोष न देणार्‍या अण्णांनी भाजपला विरोध करणार्‍या अरविंद केजरीवाल यांना मात्र अनेकदा खडेबोल ऐकवले आणि कित्येकदा शापही दिले. ताकदीची सत्ता असूनही ज्यांनी अण्णांकडे दुर्लक्ष केलं त्यांच्याविरोधात एक शब्द न काढणारे अण्णा तेव्हा झोपले होते, असं लोकं का विचारतात ते अण्णांना कळणार नाही, असं नाही. दूध पिणार्‍या मांजराचं रूप अण्णांनी घेतलं आहे. मांजराला आपल्याला कोणी पाहत नाही, असं वाटत असतं. अण्णांचं तसंच झालंय. यामुळेच राज्यात शिवसेनाप्रणित सरकार आल्यापासून अण्णा बेचैन झाले आहेत. हे सरकार आल्यानंतर अण्णा पुन्हा ताजेतवाणे झाले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस युती ही अपघाताने निर्माण झालेली आघाडी आहे. ती टिकेल की नाही, ही पुढची गोष्ट पण आतापासूनच त्यात खोडा घालता कसा येईल, असा प्रयत्न चोहोबाजूंनी सुरू झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत घटक पक्षांमध्ये वाद निर्माण होऊन सत्ता कोसळेल अशा प्रयत्नाला अनेकजण लागले आहेत. त्यांना भाजपची फूस असणं स्वाभाविक आहे. हे सरकार ही अण्णांच्या कल्पनेपुढची गोष्ट होती. यामुळेच अशी युती अण्णांच्या पचनी पडणं अवघड आहे. 2014मध्ये भाजपचं सरकार सत्तेवर येताना सेनेबरोबर त्या पक्षाचं जमलं नव्हतं. विरोधात निवडणुका लढलेल्या राष्ट्रवादीने राज्यातल्या अस्थिरतेचं निमित्त करत भाजपला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. सुमारे दीड महिना या वादात गेला आणि सेनेने विरोधात बसण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा सारा इतिहास अण्णांना ठावूक नव्हता असं नाही. पण तेव्हाही भाजपने केलेल्या युतीवर अण्णा बोलले नाहीत. आता भाजपपासून दूर राहण्याचा सेनेने निर्णय घेतल्यावर अण्णा बोलू लागले. सरकार स्थापून 15 दिवसांचा अवधी पार पडत नाही तोच अण्णांनी खाते वाटपावर बोट ठेवलं. मलिद्यासाठी हे सारं सुरू असल्याचा आरोप त्यांनी करायला घेतले. तीन पक्षांचं सरकार चालवायचं आणि ते ही तीन विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन ही गोष्ट सहज शक्यतेतील नाही, हे अण्णा जाणतात. तरी ही सत्ता लागलीच निरंकूष असली पाहिजे, हा अण्णांचा हट्ट कमालीचा बोलका आहे. भाजपशिवाय सेनेने बनवलेलं सरकार अण्णांच्या किती पचनी पडेल, हा प्रश्न होताच. त्यांच्या लागलीच व्यक्त झालेल्या वक्तव्यातून हे अधिक स्पष्ट झालं. यातूनच सरकारला त्रास देण्याचा पद्धतशीर प्रयोग अण्णांकडून सुरू होणं स्वाभाविक आहे. अण्णांचं हे रूप म्हणजे भाजपसाठी नवं हत्यार आहे. सरकार स्थापून पंधरा दिवसांचा अवधी जात नाही तोच संघाची वकिली करणारे एकूण एक टीका करायला पुढे सरसावले आहेत. अण्णा त्यातीलच एक आहेत. तेव्हा सरकार सावधान अण्णा जागे झालेत…

First Published on: December 16, 2019 5:29 AM
Exit mobile version