‘शिकारा’तून खरे दु:ख विरले!

‘शिकारा’तून खरे दु:ख विरले!

संपादकीय

काश्मिरी पंडितांनी भोगलेल्या अत्याचारांना वाचा फोडणारा ‘शिकारा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो पाहिल्यावर देशभरात त्याविरोधात नाराजीचा सूर उमटला आहे. मुळात एखाद्या चित्रपटाचा विषय जर इतिहासावर आधारित असेल, तर त्यातून इतिहासाची मोडतोड होणार नाही, त्यातून कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची खबरदारी घेणे आवश्यक ठरते. कारण इतिहासात घडलेल्या प्रत्येक घटनेशी देशातील नागरिकांच्या भावना, श्रद्धा जोडलेल्या असतात. त्यांच्या भावनांचा विचार करण्याची नितांत गरज असते.‘शिकारा’ चित्रपटाचे निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी तर अलीकडच्या १९९० साली घडलेल्या घटनेवर आधारित चित्रपट बनवला आहे. ही घटना अनुभवलेले हजारो काश्मिरी पंडित आजही जिवंत आहेत. त्या घटनेची प्रत्यक्ष साक्ष देणारे जिवंत आहेत. असे असूनही त्या घटनेसंबंधी अत्यंत विपरित चित्र चित्रपटामधून दाखवणे हे म्हणजे त्या घटनेचा अवमान आहे. शिकारा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काश्मिरी पंडितांनी त्यांच्या चित्रपटाविषयीच्या भावना सामाजिक प्रसार माध्यमांद्वारे अथवा चित्रपटाचे निर्माते विधु विनोद चोप्रा यांना प्रत्यक्ष भेटून व्यक्त केल्या आहेत. १९९० च्या दशकात धर्मांधांनी काश्मिरी पंडितांचा केलेल्या वंशविच्छेदामुळे लाखो काश्मिरी पंडितांना त्यांचे घरदार सोडून आपल्याच देशात विस्थापित व्हावे लागले. ही घटना स्वातंत्र्यपूर्व काळातील किंवा स्वातंत्र्याच्या तोंडावरीलही नाही. स्वातंत्र्यानंतर ५० वर्षांनंतरची घडलेली ही भयावह घटना होती. त्या वेळी काश्मिरी पंडितांनी जे अत्याचार भोगले, ते ऐकले, तरी अंगावर काटा येतो. इतक्या वर्षांत त्यांनी जे काही भोगले, ते सत्य दडपण्याचाच प्रयत्न या चित्रपटात झाल्याचा आरोप खुद्द या घटनेचे पीडित काश्मिरी पंडितांनी केला आहे. त्यामुळे याचे गांभीर्य अधिक आहे. हा विषय राजकीय पातळीवर तसेच सामाजिक पातळीवर अधिक गांभीर्याने घेतला गेला नाही, हे वास्तव आहे, अन्यथा २५ वर्षांनंतरही काश्मिरी पंडितांना निर्वासितांच्या छावणीत रहावे लागले नसते. तेथील मरणयातना त्यांना भोगाव्या लागल्या नसत्या. आजही त्या छावणीत राहणार्‍या काश्मिरी मुलींच्या मासिक पाळी वयाच्या ३५ नंतर बंद होऊ लागल्या आहेत. राजकीय आणि सामाजिक पातळीवर जर हा विषय गांभीर्याने घेतला असता तर काश्मिरी पंडितांचे वास्तव आज निराळे असते. म्हणूनच निदान चित्रपटातून कुणी तरी संवेदनशील विषय हाताळत आहे; त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सूकता निर्माण झाली होती, परंतु चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काश्मिरी पंडितांनी त्यांच्यावर झालेल्या अन्याय, अत्याचाराचे एकप्रकारे विडंबन केल्याचे दु:ख त्यांना झाले. या चित्रपटात धर्मांधांनी जे काश्मिरी पंडितांवर अत्याचार केले आहेत, त्यावर वस्तूनिष्ठ चित्रांकन केलेले नाही, तसेच चित्रपटाच्या शेवटी मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला या विघटनवादी नेत्यांचे आभार मानण्यात आले आहेत, असे सांगण्यात येत आहे. हे काश्मिरी पंडितांना सहन झालेले नाही, याला कारणही तसेच आहे. ज्या वेळी काश्मीर खोर्‍यात काश्मिरी पंडितांच्या स्त्रियांची अब्रू लुटण्यात येत होती, काश्मिरी पंडितांच्या पुरुषांचा शिरच्छेद केला जात होता. अशा प्रकारे नरसंहार सुरू असताना या दोन्ही नेत्यांचे वडील आणि ते कार्यरत असणारे पक्ष याला जबाबदार होते. त्यामुळे या चित्रपटाच्या शेवटी केलेले आभारप्रदर्शन काश्मिरी पंडितांना पटलेले नाही. या चित्रपटाचे निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी चित्रपटाविषयी स्पष्टीकरण देताना ‘हा चित्रपट माहितीपट नसून प्रेमकथा आहे’, असे वक्तव्य केले आहे. व्यावसायिक हेतूसाठी चित्रपट करताना ‘मसाला’ घालावा लागतो, हे समजून घेण्यासारखे आहे; मात्र त्या चौकटीत राहूनही वस्तूनिष्ठ चित्रीकरण करणे दिग्दर्शक किंवा निर्माते यांना का जमत नाही? धर्मांधांची धर्मांधता लोकांच्या समोर आणली, तर समाजातील एक समुदाय दु:खी होईल, म्हणून ज्यांनी घोर अन्याय अत्याचार सहन केला त्यांच्या भावना पायदळी तुडवणे हे अन्यायकारक आहे. त्यापेक्षा अशा चित्रपटांची निर्मितीच केली जाऊ नये, हाच यावरील उपाय असू शकतो. खरे तर विधु विनोद चोप्रा यांना हे ठाऊक नाही, असे म्हणता येणार नाही, पण त्यांच्यातील सद्गुण विकृतीमुळे त्यांच्याकडून काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्याय अत्याचाराचे सुस्पष्टपणे मांडणी झाली नाही आणि याउपरही स्वतः घेतलेल्या चुकीच्या भूमिकेविषयी त्यांना शल्यही वाटत नाही, हे दुर्दैवी म्हणावे लागले. त्याही पुढे जाऊन बॉलीवूडध्ये एकाही चित्रपट दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला यावर भाष्य करावेसे वाटलेले नाही. गंभीर विषयावर केवळ मनोरंजनासाठी चित्रपट बनवून स्वतःची तुंबडी भरणार्‍यांची यानिमित्ताने किव करावीशी वाटते. या चित्रपटात काश्मीरमधून पळून आलेले कुटुंब जेव्हा जम्मू येथे विस्थापित म्हणून नोंदणी करण्यासाठी येतात, तेव्हा तेथे अधिकारी त्या काश्मिरी पंडिताच्या स्त्रीशी अर्वाच्च भाषेत बोलत असल्याचे दाखवण्यात आले. खरे तर काश्मिरी पंडित जेव्हा विस्थापित झाले आणि ते पुनर्वसनासाठी ज्या ज्या राज्यात गेले तेथे त्यांचा मानसन्मान करण्यात आला, जे निर्वासित छावणीतून बाहेर पडले ते त्या त्या राज्यांत स्वत:च्या हिमतीवर उद्योगधंदे करून शून्यातून उभे राहिले आणि काही घराणे आहे, जे उच्च मध्यमवर्गीय म्हणून जीवन जगत आहेत. त्या सर्वांना या उर्वरित भारताने आत्मसात केले. असे असताना मात्र चित्रपटात त्यांची अहवेलना केली जात असतानाचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत, हे अत्यंत खेदजनक आहेच, त्याचबरोेबर त्यावेळी दाखवण्यात आलेली राष्ट्रनिष्ठा, बंधुभाव यांचा अवमान आहे. काश्मिरी पंडितांच्या आपल्याच देशात निर्वासित होण्याची वेळ आणणार्‍या शोकांतिकेला ३० वर्षे पूर्ण होत असताना त्यांचे दुःख मांडणार्‍या चित्रपटाची निर्मिती या शोकांतिकेचा भाग असलेल्या विधु विनोद चोप्रा यांनी केली आहे. तथापि, रूपेरी पडद्यावरची गणिते, त्याचे कलात्मक नियम न पाळल्याने या शोकांतिकेची महागाथा होण्याऐवजी त्यावर वरवर समजुतीच्या फुंकरीने गाभ्यातील दुःख लपवणारा साधारण चित्रपट बनला आहे. या समस्येच्या कोणत्याही ठोस कारणाकडे तो जात नाही आणि त्यातील गुंतागुंतीच्या राजकारणाचाही वेध घेऊ पाहात नाही. काश्मिरी पंडितांवरील अन्याय, अत्याचाराचा विषय हाताळताना निर्मात्याने या विषयाचे गांभीर्य जाणून घेणे गरजेचे होते. त्याऐवजी एक प्रेमकथा रंगवण्याचा निर्मात्याने केलेला प्रयत्न प्रेक्षकांना रुचला नाही, त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारले. निदान यापुढे चित्रपट निर्मिती करणार्‍या निर्माता, दिग्दर्शकांनी यातून बोध घेऊन इतिहास किंवा इतिहासातील विशिष्ट घटनांवर आधारित जर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न कराल तर त्यातून इतिहासाचा अवमान होणार नाही, याची खरबदारी घ्यावी.

First Published on: February 18, 2020 5:30 AM
Exit mobile version