विक्रमांचा जीवघेणा नाद

विक्रमांचा जीवघेणा नाद

नाशिकजवळ नुकतीच एक हदय हेलावणारी घटना घडली. इयत्ता दुसरीत शिकणार्‍या प्रेम निफाडे या चिमुरड्याचा सायकल वारीत जात असताना सिन्नरजवळ ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मुत्यू झाला. हे दुःख पेलण्याचे बळ निफाडे कुटुंबाला मिळो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना! मुळात वयाच्या सहाव्या वर्षी प्रेमला नाशिक – पंढरपूर असा प्रवास सायकलने करण्याची परवानगी देणार्‍या सायकलिस्ट असोसिएशनवर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. नाशिकहून पंढरपूरला सायकलने तेही सहाव्या वर्षी जाण्याचे वय आहे का? असोसिएशनच्या ‘इव्हेंट’पोटी लेकरांचा जीव जाऊ शकतो, याचा कुणीच कसा विचार केला नाही? रस्त्यावर अपघाती परिस्थितीत प्रसंगावधान राखून निर्णय घेण्याची क्षमता मुलांमध्ये उपजत असते का? नसेल तर मग या चिमुरड्यात ती कोठून येणार? शेकडो किलोमीटर प्रवास सायकलवर करण्याची ताकद या छोट्याशा जीवात कशी असेल? पालकही अशा जीवघेण्या उपक्रमांत लहान मुलांना कसे पाठवतात? पालकांच्या प्रोत्साहनाने त्यात जोश भरला जाईल, पण ताकद यायला त्याला पुरेसा अवधी तर द्यायला हवा ना.. अर्थात हे केवळ नाशिकमध्येच घडते असे नाही. मुंबई, पुणे, नागपूर आणि अन्य अनेक शहरांमध्ये तथाकथित सायकलिस्ट अशा वार्‍या वारंवार काढतात. प्रत्येक ठिकाणी ‘इव्हेंट’चे नाव मात्र वेगळे असते. कुणी वारी म्हणते, कुणी सफारी, कुणी मोहीम तर कुणी सहल, पण उद्देश मात्र एकच असतो शेकडो किलोमीटरपर्यंत सायकलने प्रवास करण्याचा. मुळात अशा वार्‍यांनी ही मंडळी नक्की काय संदेश देताहेत यावर संशोधन व्हायला हवे.

भारतासारख्या देशात निर्धोकपणे सायकल चालवण्यासारखे रस्ते तरी आहेत का? आणि त्याही उपर महामार्गावर सायकल चालवणे कितपत संयुक्तीक आहे, महामार्ग सायकल चालवण्यासाठी आहेत का? शारीरिक व्यायामासाठी सायकलचा पर्याय उत्तम आहे, हे कोणीही मान्य करेल, पण असा व्यायाम सायकल ट्रॅक किंवा मोकळ्या मैदानावर होऊ शकतो. जास्तीत जास्त जवळपासच्या एखाद्या स्थळापर्यंतचा प्रवास सायकल चालवून होऊ शकतो, पण त्यासाठी महामार्गाचा अवलंब करणे ही घोडचूकच म्हणावी. सायकलच्या ठेवणीचा विचार करता बर्‍याचदा ती चालवताना तोल जातो. सराईत चालकाकडूनही असे होते. महामार्गावर वाहने भरधाव वेगाने चालवली जातात. अशातच एका क्षणासाठीही सायकलस्वाराचा तोल गेला तर त्याचा परिणाम काय होईल हे नव्याने सांगायला नको. नाशिकमधील घटनेनंतर ट्रकचालकांना दोष देण्यात आला. दारू पिऊन ट्रक चालवले जात असल्याने असे अपघात होतात, असेही सांगितले गेले. अशा दारुड्या चालकांवर निश्चितच कारवाई व्हावी, परंतु त्याने सायकलस्वारांचा प्रश्न मिटेल याची शाश्वती काय? युरोपियन देशांमध्ये काही तासांत शेकडो किलोमीटरचा प्रवास विनाअपघात सुरळीतपणे होतो. कारण, त्या देशांमधील महामार्गावर कोणतीही सायकल वारी, साई पालखी, पळणारे मॅरेथॉनपटू वा मोर्चेकरी नसतात. कोणत्याही स्पर्धेसाठी ते वापरले जात नाहीत. जेथे वापरणे आवश्यक असते तेथे पूर्वतयारी लक्षणीय असते. सुरक्षिततेच्या सर्वच उपाययोजना केलेल्या असतात. काही कालावधीसाठी वाहतूकही वळवली जाते. या देशांमध्ये प्रत्येक जण महामार्गाचा आदर राखतो. ठरवून दिलेली शिस्त पाळतो, पण आपल्याकडे मात्र महामार्गालाही गल्लीबोळातील रस्त्याप्रमाणे वागणूक दिली जाते. दुतर्फा पायी चालणारी लोकं दिसतात. त्यात दुचाकीचालक, रिक्षाचालक वाट्टेल तिथे यू टर्न मारतात. रस्ते ओलांडतात. अशातून अपघात होतात.

आपल्याकडे सायकल वारीदेखील सर्रासपणे महामार्गावरून होत असते. कुठे झुंडीने तर कुठे एकटे-दुकटे सायकलपटू येणार्‍या परिस्थितीला चकवे देत आपापल्या परीने हेलकावे खात असतात. या वारीत कोणीही कुठेही थांबते. सायकल चालवत असतानाच एका हाताने मोबाईल कानावर लावून गप्पा सुरू असतात. वळणावर थांबले जाते. विशेष म्हणजे अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयोजकांपैकी कुणीही नसते ही अधिक संतापजनक बाब. गावांमधून निघणार्‍या दिंड्यांमध्ये जी काळजी घेतली जाते तेवढीही सायकल वारीत घेतली जात नाही. खरं तर, अशा वार्‍यांमध्ये प्रत्येक सायकलपटू प्रसंगावधान राखून आलेल्या परिस्थितीशी मुकाबला करण्याचा निर्णय घेत असतो. त्यात तो बहुतांशवेळा यशस्वीही होतो, पण लहान मुलांमध्ये असे प्रसंगावधान कोठून येणार? त्यांच्यात अशा परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता तरी विकसित झालेली असते का? अशी क्षमता विकसित झालेली नसते म्हणूनच ते अपघातांत बळी पडतात. या पार्श्वभूमीवर सायकल वारी असो वा अन्य कोणत्याही शारीरिक कष्टाच्या स्पर्धा, प्रत्येक ठिकाणी वयाची अट असावीच. साधारणत: अठराव्या वर्षांपर्यंत शरीर बर्‍यापैकी परिपक्व झालेले असते. त्यामुळे या वयानंतरच अशा स्पर्धा वा उपक्रमांत भाग घेण्यास परवानगी मिळावी. भलेही पालकांनी परवानगी दिलेली असेल, तरी आयोजकांनी सहभागी होणार्‍यांच्या वयोमर्यादेचे पालन करणे गरजेचेच आहे. तसे न केल्यास आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. अर्थात, असे अपघात केवळ सायकल चालवताना होतात असे नाही.

मुंबईत सागरी खाडी पोहण्याचे मोठे फॅड आहे. त्यासाठी राज्यभरातून जलतरणपटू येत असतात, पण काही स्पर्धांसाठी वयाची अट ठेवण्याचे भान आयोजकांना नसते. त्यामुळे अगदी आठ आणि दहा वर्षांच्या चिमुरड्यांना समुद्राच्या लाटांशी सामना करावा लागतो. प्रत्येक पाल्याच्या पालकांना विक्रम करण्याशी मतलब असतो. त्यामुळे लाटांशी प्रचंड ताकदीने मुकाबला करणार्‍या आणि पाण्याने गारठलेल्या बालकांच्या आरोग्यावर त्याक्षणी किती विपरित परिणाम होत असेल याचादेखील विचार होत नाही. केवळ सुरक्षिततेच्या उपाययोजना आहेत, म्हणून कोणत्याही वयात कुणालाही समुद्रात पोहायला पाठवणे कितपत संयुक्तिक आहे? सर्वच मोठ्या शहरांमध्ये आता मॅरेथॉनचेही फॅड आहे. या मॅरेथॉनमध्ये मोठ्यांबरोबर चिमुरड्यांचीही फरफट बघायला मिळते. काही मॅरेथॉन तर केवळ बालकांसाठी असतात. अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी बालकेही उत्सुक असतात, पण त्यांना तरी त्यांच्या शरीराची कल्पना असते का? बालवयात कुणाचेही स्नायू परिपक्व नसतात. सरावाअंतीही ते परिपक्व होतील याची शाश्वती नसते. असे असताना त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक काम त्यांच्याकडून करून घेतल्यास निश्चितच त्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. मुळात मुद्दा हा आहे की, अशा सायकल वार्‍या, स्पर्धा, मॅरेथॉन यांमधून संदेश काय दिला जातोय? अशा उपक्रमांतून चांगले दिवस कुणाला येणार? शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त काळ सायकल चालवणे, धावणे वा पोहणे यांसारख्या बाबींमुळे शरीर संवर्धन होईल की त्याची हानी होईल, याचा प्रत्येकानेच विचार करायला हवा. कदाचित अशा स्पर्धा वा उपक्रमांच्या संयोजनाबद्दल आयोजकांना पुरस्कार मिळतील. त्यांनंतर त्यांच्या उंची पार्ट्या रंगतील, पण त्या गर्दीत प्रेमसारखी लेकरं नसतील त्याचे काय? म्हणूनच वयोमर्यादेचे भान न बाळगणार्‍या ‘इव्हेंटबाजांवर’ गुन्हे दाखल व्हावेत!

First Published on: July 2, 2019 4:32 AM
Exit mobile version