संपादकीय : राज यांचा आश्वासक सूर!

संपादकीय : राज यांचा आश्वासक सूर!

संपादकीय

तो आला होता. त्याने लक्ष वेधले होते. त्याने खळबळ माजवली होती. तो नक्कीच काहीतरी उलथापालथ करणार असे वाटत होते… पण, निकाल अनपेक्षित लागले. तराजू पूर्णपणे एका बाजूने झुकला. त्यालाच नाही तर लोकशाहीवर विश्वास असलेल्या प्रत्येकाला धक्का बसला. त्यातून सावरायला बरेच दिवस त्यालाच नाही तर धक्का बसलेल्या प्रत्येकाला लागले. पण, आता तो परत आलाय… होय राज ठाकरे परत आलेत. नव्या जोमानिशी भाजपला टक्कर द्यायला. यावर आता, भक्तमंडळी हसतील. ते हसून हसून गडबडा जमिनीवर लोळतील. पण, लोकशाहीत कोणीतरी एक पणती घेऊन उभा रहावा लागतो, अंधार चिरण्यासाठी. हळुहळू त्या एका पणतीच्या हजारो पणत्या होतात आणि अंधार चिरत जातो… प्रकाशाची नवीन पहाट उगवण्यासाठी! राज यांनी लोकसभा निवडणुकीत मोदी आणि शहा यांच्याविरोधात रान पेटवले. पुराव्यानिशी त्यांनी भाजपचा पोलखोल केला. त्यांच्या सभेला लाखोंची गर्दी झाली. हा माणूस काहीतरी वेगळे सांगतोय, हे लक्षात येत होते. तो विरोधी पक्षांचा प्रमुख चेहरा होता. राज यांच्या लाखोंच्या सभेची देशाने दखल घेतली. देशभरात कुठल्याच नेत्याला लोकसभा रणधुमाळीत एवढा मोठा प्रतिसाद लाभला नव्हता. तो राज यांना मिळाला. आज या घटकेला राज यांच्याइतका प्रभावी वक्ता देशात दुसरा नाही. पण, तरीही महाराष्ट्रात विरोधी पक्षांना फक्त ७ जागा जिंकता आल्या. उत्तर प्रदेशनंतर देशातील दुसरे मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रात भाजपला रोखण्याचे राज यांनी जिवाच्या आकांताने प्रयत्न केले, पण ते सफल झाले नाहीत. लोकशाहीत अंतिम सत्य हे विजय नाही तर संघर्ष आहे. मेधा पाटकर यांनी नर्मदा आंदोलन पेटवले. जगाने त्याचा गौरव केला. आधी धरण की आधी माणूस यावर जगभर मंथन झाले. यातून पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आणि आदिवासींना न्याय मिळाला. विस्थापितांना जमिनीच्या बदल्यात जमीन मिळाल्याशिवाय धरण पुढे सरकता कामा नये, यावर शिक्कामोर्तब झाले. आंदोलनाला नाके मुरडणार्‍यांनी इतकी वर्षे आंदोलन करून काय मिळवले, असा हेटाळणीचा सूर लावला, पण जो मेधांच्या आंदोलनाआधी कोणी विचारात घेतला नव्हता तो पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे, हे टीका करणार्‍या, कधीही नर्मदेच्या परिसरात न फिरलेल्या आणि वस्तुस्थितीची जाणीव नसलेल्या सुखवस्तू लोकांना कसे कळणार? मेधा ही जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनातून पुढे आलेले शंभर नंबरी सोने आहे, त्याच्या खरेपणावर संशय घेतला म्हणून त्याची गुणवत्ता कमी होत नाही. इंदिरा गांधी यांना भारताच्या सत्तेवरून कोणी हलवू शकत नाही, असे म्हणणार्‍यांना जयप्रकाश यांनी मुळापासून हादरवले होते. अंधेरे मे एक प्रकाश घेऊन ते आले होते आणि मग देशभर त्यांच्या नावाचा जयजयकार होऊन इंदिरा गांधींची हुकूमशाही या देशाने मोडून काढली होती, हा इतिहास आहे. आताही काही जणांना वाटते की नरेंद्र मोदी हे या देशावर अनेक वर्षे आपण म्हणू तसे राज्य करतील. त्यांना आव्हान देणारे कोण आता शिल्लक उरलेले नाहीत. उरले असतील तर त्यांना संपवले जाईल. आणीबाणीतही अशाच सर्वांना संपवण्याच्या भाषा झाल्या होत्या. पण, लोक शेवटी रस्त्यावर उतरले. सत्तापालट झाले. त्यामुळे कोणी लोकशाहीत सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत. आज नाही तर उद्या आव्हान हे मिळणारच. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस गलितगात्र होऊन पडला आहे. राहुल गांधी यांनी मैदानावर उतरून नव्याने रणशिंग फुंकायची गरज असताना ते राजीनाम्याला कुरवाळत बसले आहेत आणि ते राजीनामा देतात म्हटल्यावर सर्व काँग्रेस नेत्यांमध्ये राजीनामे देण्याची जणू स्पर्धा लागली आहे. काँग्रेस स्वतःबरोबर देशालाही निराशेच्या खोल गर्तेत ढकलत आहे. अशावेळी राज यांनी दिल्लीत जाऊन ईव्हीएमवर आवाज उठवणे आश्वासक वाटते. त्याला आता यश मिळेल की नाही, हे सांगता येत नाही, पण या आवाजाने पुढे मोठ्या आंदोलनाचे रूप घेतले तर सत्ताधार्‍यांना त्याची दखल ही घ्यावी लागणार. ईव्हीएममध्ये जे चिप्स टाकले जातात, ते कुठून आयात केले जातात, एवढा साधा प्रश्न राज यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांना विचारला. त्यावर त्यांचे उत्तर होते अमेरिकेवरून. निवडणुका आपल्या, मशीन आपल्या मग चिप्स बाहेरच्या का? यावर आयोगाकडे उत्तर नव्हते. राज यांनी शेवटी निवडणूक आयोग अधिकार्‍यांना सनदशीर मार्गाने सांगून काही होणार नाही, ती फक्त डोकेफोडी होईल, असे सांगून आपला संताप व्यक्त केला. मशीनमुळे मतमोजणीला उशीर होत नाही, मतपत्रिका मोजायला उशीर होतो, असे आणखी एक कारण सांगितले गेले. निवडणुका महिने दोन महिने चालत असतील तर मतपत्रिकेच्या मतमोजणीला दोन एक दिवस लागले तर काय फरक पडतो, असे सांगूनही राज यांना त्याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. लोकशाहीने दिलेल्या एका हत्याराचा म्हणजे चर्चेच्या मार्गाचा उपयोग करून राज यांनी ईव्हीएमवर पहिले पाऊल टाकले आहे. आता त्यांचे दुसरे पाऊल काय असेल याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. ईव्हीएम विरोधी आंदोलनाचे ते नेतृत्व करतील, असे सांगितले जाते. तसे असेल तर कोणी तरी याविरोधात उभा राहत आहे, हे चित्र आश्वासक आहे. शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्याशी राज यांच्या झालेल्या भेटीतही या आंदोलनाची चर्चा झाल्याचे सांगितले जाते आणि आता दिल्लीतही सोनिया गांधी यांच्याशी राज यांचे याच मुद्द्यावर बोलणे झाल्याचे बोलले जाते. एकूणच ईव्हीएम हा संवेदनशील विषय असून त्यावर आवाज हा उठवला पाहिजे. भाजप आणि शिवसेना यांनीही तो उठवला होता, पण आता सत्ता त्यांच्या हातात असल्याने दोघेही मूग गिळून बसले आहेत. भाजपच्या मागे फरफटत चाललेल्या शिवसेनेचे हे मौन तर ढोंगीपणाचे लक्षण आहे. लोकसभा निवडणूक लागण्याच्या काही महिने अगोदर भाजप विरोधात रण फुंकणार्‍या शिवसेनेने ईव्हीएम फक्त फोडायच्या बाकी ठेवल्या होत्या. पण, अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन गाजराची माळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात घातल्यानंतर मोदी, शहा, ईव्हीएम सर्वच कसे छान छान झाले. एकमेकांचे दात मोजण्याऐवजी गळ्यात गळे घातले गेले. म्हणूनच कोणी तरी ईव्हीएमचा विषय पेटता ठेवला पाहिजे होता, तो राज यांनी पुढे नेण्याचे ठरवले असेल तर ही नक्कीच प्रशंसनीय बाब ठरेल. तीन महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी हे आंदोलन उभे राहत असेल तर ते दिशादर्शक असले पाहिजे, दिशाहीन नको आणि लोकांच्या मनात चुकीचे संदेशही जाता कामा नयेत. यानिमित्ताने राज्यात सर्व विरोधक एकत्र येत असतील तर सामना चुरशीचा होईल. मात्र, यासाठी आधी मनसेने दुसर्‍याच्या संघातून खेळू नये. त्यांनी आंदोलनानंतर स्वतःची टीम बनवून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरावे. लोक ठरवतील कोण चांगले आणि कोण वाईट ते, पण यासाठी आपले खेळाडू हवेत. दुसर्‍या संघाच्या विजयासाठी जीवाचे रान करून लोक टाळ्या वाजवणार नाहीत किंवा वाजवल्या तरी सर्कस बघायला आल्यानंतर वाजतात तसे रूप या टाळ्यांना असेल. बेगाना शादी मे अब्दुला दिवाना कशाला? रणधुमाळी जवळ येऊन ठेपली आहे. एकेकाळी लोकसभेत 2 जागा मिळवणार्‍या भाजपने दुसर्‍यांदा बहुमताने सत्ता मिळवली आहे. मुकाबला सोपा नाही. भाजपची विधानसभा निवडणुकीची कधीपासूनच तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजताना मी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार असे सांगत रणशिंग फुंकले आहे. आता विरोधकांनी वेळ न दवडता मैदानात उतरले पाहिजे. राज ठाकरे यांच्यासारखा आक्रमक चेहरा विरोधकांना नेता म्हणून मिळत असेल तर ही लढत नक्कीच चुरशीची होईल, यात संदेह नाही.

First Published on: July 10, 2019 5:42 AM
Exit mobile version