करून करून भागले…!

करून करून भागले…!

करून करून भागले...!

आपल्या मराठीत एक म्हण आहे ‘करून करून भागले आणि देव पूजेला लागले.’ ही म्हण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अचूक लागू पडते. सोमवारी त्यांनी सोशल मीडिया सोडणार असल्याचं ट्वीट केलं होतं. त्यावरून संपूर्ण देशासह जगभरात चर्चेला उधाण आलं. कायम प्रसिद्धीच्या झोतात असलेले मोदी सोशल मीडिया सोडणार म्हटल्याचे ऐकून भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना रात्रभर झोप लागली नाही. मोदी समर्थकांनी तर कालपासून अस्वस्थता मांडण्यात सुरुवात केली आहे. आपल्या नेत्याचे समर्थन आता कसे करायचे, या विवंचनेने त्यांनीही सोशल मीडियाला रामराम ठोकण्याची मनाची तयारी केली होती, पण धक्कातंत्रासाठी हातखंडा असलेल्या मोदींनी एका दिवसात हा सस्पेन्स संपवत आपल्या समर्थकांना मोठा दिलासा दिला. मोदी कोणतंही सोशल मीडिया अकाऊंट बंद करणार नाहीत. रविवारी ८ मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्ताने पीएम मोदी यांचे ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम महिला चालवणार आहेत. ‘मी अशा महिलांना सोशल मीडिया वापरायला देणार आहे, ज्यांच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते. अशा महिलांच्या कहाण्यांमुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळणार आहे. तुमची कहानी अशी आहे का? तुम्ही अशा महिलांना ओळखता का #SheInspiresUs हा हॅशटॅग वापरून अशा महिलांची कहाणी शेअर करा.’ मोदींच्या या धक्क्यामुळे समर्थकांबरोबर त्यांच्या विरोधकांचीही निराशा झाली आहे. ‘मोदीजी ट्वीटर नको, व्देष सोडा’ असा टोला मारणार्‍या काँग्रेस नेते राहुल गांधींना या ट्विस्टमुळे आता काय बोलावे हे अजून सुचलेले नाही. पंतप्रधान हे मोदी हे असेच चमत्कारीक व्यक्तिमत्व आहे, हे राहुल गांधी यांनी कायम लक्षात ठेवावे. संमोहनात त्यांचा हात जगात कोणी धरणार नाही. मिठी मारून जादूची झप्पी देण्यात ते मातब्बर आहेत, विचारा हवे तर अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांना. ट्रम्पच नाही तर जगातील सर्वच प्रमुख देशांच्या प्रमुखांना ते आपल्या डाव्या हाताने जवळ करत उजव्या बाजूला आणतात आणि भारत या देशात गुजरात हा एकच विकास झालेला भाग आहे आणि त्याचा विकास पुरुष मी आहे, हे ते जगाला सांगत असतात… अशा नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियाने जे पाठबळ देऊन त्यांना विकास पुरुष म्हणून प्रस्थापित केले, त्याच सोशल मीडियापासून मोदी अचानक फारकत घेणार, सोशल मीडियाच्या ऋणातून मुक्त होऊन निघून जाणार, हे म्हणजे मोहमायेचा त्याग करून संन्यास घेण्यासारखे होते. पण, कधी वेगवेगळ्या टोप्या घालायच्या, कधी वेगवेगळी जॅकेट परिधान करायची, कधी सूट बूट घालायचा आणि कधी संन्याशी होऊन केदारनाथला जाऊन गुहेत ध्यानधारणा करायची असा व्यक्ती सोशल मीडियाचा त्याग करणे शक्यच नव्हते. त्यातल्या त्यात एक गोष्ट वाटत होती की ट्विटर वैगरे परदेशी सोशल मीडियाऐवजी देशी अ‍ॅपचा मोदी वापर करू शकतात, अशी एक शक्यता वर्तवली जात होती. पण, महिला दिनासाठी एक दिवस सोशल मीडिया सोडून उदात्त कामासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे सांगत पुन्हा एकदा मोदींनी प्रकाश झोत आपल्यावरच राहील याची पुरेपूर काळजी घेतली. मोदींच्या सोशल मीडियावर एक नजर टाकली तरी या नव माध्यमाचा सर्वात ठरवून फायदा कुणी करून घेतला असेल तर ते नरेंद्र मोदी हेच आहेत. जानेवारी २००९ साली मोदींनी ट्विटरवर आपला प्रवास सुरू केला. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. या अकरा वर्षांमध्ये मोदींनी सोशल मीडियावर इतर नेत्यांपेक्षा जास्त वेळ घालवल्याचं दिसून आलं. ट्विटरवर आपलं अकाऊंट सुरू केल्यानंतर पुढच्या पाच वर्षांनंतर ते थेट देशाचे पंतप्रधान झाले, हे लक्षात घ्यायला हवे. ज्या गतीने मोदी देशात आणि जगाच्या पातळीवर प्रसिद्ध होत गेले, त्याच गतीने ते सोशल मीडियातही प्रसिद्ध होत गेले. सोशल मीडियात सगळ्यात जास्त फॉलोअर्स असणार्‍या जागतिक नेत्यांच्या यादीत मोदी दुसर्‍या क्रमांकावर आहेत. त्यांच्या पुढे त्यांचे मित्र आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नंबर लागतो. मोदींनी २०१४ च्या निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा आधार घेत मोदी लाटेचा चांगलाच वापर केला. सोशल मीडियाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. त्यामुळे सोशल मीडिया आणि मोदींचं कनेक्शन ‘अब की बार मोदी सरकार’पासूनच संपूर्ण देशाने पाहिलं आहे. २००९ साली गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचे ट्वीट तुलनेनं फार कमी असायचे आणि पहिल्या दोन वर्षात तर फक्त नावालाच ते ट्विटरवर होते असं चित्र होतं. मोदी २००९ साली दिवसाला ०.६२ आणि २०१० साली तर फक्त 0.२३ टक्के ट्वीट करायचे. मात्र २०११ नंतर त्यांच्या ट्वीट्सची संख्या वाढत गेली. २०११ साली दिवसाला १. १७, २०१२ साली ३.२८ टक्के आणि २०१३ मध्ये ४. १९ टक्के ट्वीट त्यांच्या अकाऊंटवरून केले गेले. २०१४ साली मोदी देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर मात्र त्यांच्या ट्वीट्सची संख्या चांगलीच वाढली. मोदींनी दिवसाला ७.७९ टक्के ट्वीट्स केले. गेल्या वर्षी मोदी पुन्हा सत्तेत आले. २०१९ साली म्हणजे गेल्या वर्षी मोदींनी दिवसाला ११.५५ टक्के म्हणजेच जवळपास १२ टक्के ट्वीट केले. पंतप्रधान व्हायच्या आधी त्यांच्या ट्वीटमध्ये गुजरात या शब्दाचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. मात्र, नंतर तो त्यांनी जाणीवपूर्वक बदलून भारत केला. गेल्या वर्षभरात मोदी तसे सोशल मीडियात तुलनेने फारसे कार्यरत दिसले नाहीत. दिल्ली हिंसाचारावरही त्यांनी दोन दिवासांनी ट्वीट केलं होतं. आता मात्र सोशल मीडिया सोडण्याचा विचार करतो आहे या आशयाचं ट्वीट करत पंतप्रधान मोदींनी सगळ्यांनाच चक्रावून टाकलं होतं. असे लोकांना चक्रावून टाकण्याची मोदींची ही काही पहिलीच वेळ नाही. मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे संपूर्ण देश हादरला होता. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता त्यांनी अचानक ५०० आणि १००० च्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली तेव्हा त्यांनी आपल्या या निर्णयामुळे लोकांना आश्चर्यचकित केले. त्याचा दूरगामी परिणाम देशाला सहन करावा लागला. तसेच मोदी यांनी अचानक पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेऊन धक्का दिला होता. वास्तविक पंतप्रधान मोदी अफगाणिस्तानातून भारतात परत येत होते. परंतु येत असताना ते थेट लाहोरमध्ये गेले आणि तेथे नवाज शरीफ यांची भेट घेतली. नवाज शरीफ यांच्यासोबत सुमारे एक तास त्यांनी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एक हुनर हाट येथील एक फोटो शेअर केला. जो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हुनर हाट मधील एका दुकानात त्यांनी लिट्टी चोखा खाल्ल्याचा हा फोटो होता. एकूणच आपण कधी प्रसिद्धीत यायचे आणि कधी अचानक मोहमायेचा त्याग करत आहोत याचा भास करायचा, यात मोदी चतुर आहेत.

First Published on: March 4, 2020 5:30 AM
Exit mobile version