संपादकीय : गणित बिघडवलं!

संपादकीय : गणित बिघडवलं!

संपादकीय

एकवीस कुळें जेणें उद्धरिलीं । हे तों न कळे खोली भाग्यमंदा ॥                                                            तुका म्हणे त्याची पायधुळी मळि । भवभय पळे वंदितां चि ॥

संत तुकोबांचा हा अभंग.. तुकोबांनी एकवीस कुळांचा उध्दार करणार्‍याच्या श्रेष्ठत्वाचे गोडवे गायले आहेत. ज्याला असा उध्दारकर्ता कळत नाही तो मुर्ख माणूस असं तुकोबा म्हणतात.. या अभंगाचा येथे उल्लेख करण्याचे कारणही तसेच आहे. उद्या हा अभंग शिकवायचा झाल्यास वीस एक कुळे जेणे उध्दिरिली.. असे म्हणावे लागेल. बालभारतीने दुसरीच्या बदललेल्या अभ्यासक्रमात अंकमोजणीची नवी पध्दत अवलंबल्याने आता अभंगांपासून सांप्रतकालीन गणिती सत्संगापर्यंत सर्वच काही बदलावे लागणार आहे. यापुढे एकवीस, बावीस, तेवीस असे म्हटले तर मुले तुमच्या तोंडाकडे शून्य नजरेने पाहत राहतील. कारण त्यांना या शब्दांचे अर्थच कळणार नाहीत. १ ते १०० या ठिकाणी जिथे जोडाक्षर येते तिथे ती संख्या नव्या पद्धतीने वाचण्याची सूचना अभ्यास मंडळाने दिली आहे. मराठी जोडाक्षरे कठीण आहेत, त्यामुळे त्यांचा उच्चार करणे विद्यार्थ्यांना कठीण जाते. ही पद्धत रुळल्यास अंक लक्षात ठेवण्यास विद्यार्थ्यांना सोपे जाईल असे कारण देत हा बदल करण्यात आला आहे. दुसरीच्या अभ्यासक्रमातले हे अजब बदल पाहून शिक्षकही चकीत झाले आहेत. हे बदल करताना गणितीय पध्दतीचा विचार केला की भाषिक, नव्या बदलामुळे गणितातील संख्या वाचन सोपे झाले की कठीण असे प्रश्नही शिक्षकांना पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर हा सर्व प्रकार बघून म्हणता येईल की ज्याला भाषा आणि गणिताचे श्रेष्ठत्व कळले नाही अशा भाग्यमंदा अर्थात मुर्ख माणसांनीच अंकमोजणीचा खेळखंडोबा करायचे ठरवले आहे. राज्य शासनाने गेल्या काही वर्षांपासून केलेल्या ‘विनोदां’पैकी हा महाविनोद म्हणावा लागेल. बालभारतीच्या गणित विषयतज्ज्ञांच्या युक्तीवादानुसार इंग्रजी व तामिळ, कानडी, तेलगू आणि मल्याळी या चार दाक्षिणात्य भाषेत संख्यावाचन असेच केले जाते. पण या पाचही भाषा मराठी पेक्षा अध्ययनास अवघड समजल्या जाणार्‍या भाषा आहेत. इंग्रजीच्या बाबतीत विचार करता तिच्यात मराठीसारखी संख्यानामे नाहीत. त्यामुळे २१ चा उच्चार इंग्रजीत व्टेंटीवन केला जातो. मात्र, मराठीत त्यासाठी शब्द उपलब्ध आहेत. शब्दांचे सौष्ठव असलेल्या मराठीची म्हणूनच इंग्रजीसारख्या सपक भाषेशी तुलना होऊ शकत नाही. शिवाय दाक्षिणात्य भाषा आणि मराठी यांचीही तुलना होऊ शकत नाही. तुलना करायची असेल तर राष्ट्रभाषा हिंदीशी का केली जात नाही? कारण लिपीच्या दृष्टीकोनातून ती आपल्या जवळची भाषा आहे. हिंदीमध्ये एकवीसला इक्कीस म्हणतात. इक्कीस, बाईस, तेईस, चौबीस इत्यादी. तिथे अजून बीस एक, बीस दो असे झालेले नाही. तिथेही जोडाक्षरे आहेत. त्यामुळे मराठीतच हा प्रयोग कशासाठी? अर्थात अभ्यास मंडळाने कोणताही सारासार विचार न करता बदलाचा निर्णय घेतला असेही म्हणता येणार नाही. ग्रामीण भागात जिथे पालक अशिक्षित आहेत, अशा घरातील मुलांना 52 ही संख्या बावन्न अशी कळत नाही. ती मुले 25 लिहितात. त्याचबरोबर एकतीस म्हटले तर 31 असे लिहिण्याऐवजी 13 लिहिले जाते. म्हणजेच लिखाणाप्रमाणे वाचन होत नाही. हेच बाल मानसशास्त्र अभ्यासून पध्दतीत बदल करण्यात आला आहे. लहान मूल आधी संख्येकडे पाहते, आकलन करते आणि मगच संख्या म्हणते किंवा लिहिते. मात्र, जर लिहिणे आणि वाचने यात फरक असेल तर मुले गोंधळतात. त्यामुळे 21 ही संख्या वीस आणि एक अशी लिहिणे त्यांच्यासाठी सोपे आहे. मात्र, ही मुलें जेव्हा व्यवहार करतील तेव्हा त्यांचा गोंधळ उडेल. त्यावेळेस हा बदल त्रासदायकच ठरेल. शिवाय जे बदल केले आहेत ते शिकवताना आणि मुलांना उच्चारतानाही कठीण जाणार आहेत. जोडाक्षरे उच्चारता येत नाहीत, म्हणून अंक मोजण्याच्या पध्दतीत बदल केला जात असला तरीही प्रत्यक्षात त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जोडाक्षरांची भीती अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात भाषेत जोडाक्षरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जोडाक्षरे, स्पष्ट उच्चारण, शब्दांचे चढ – उतार ही भाषेची मूलभूत अंगे शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर शिकवली जातात. किंबहुना जोडाक्षरे हा मराठी भाषेचा दागिना आहे. तोच काढून टाकण्याचा प्रयत्न केल्यास भाषेचा मूळ बाजच बिघडेल. शिवाय विद्यार्थी भाषिक अंगाच्या विकासापासून दूर राहतील. भाषेचा गणिती अंगानेही विचार होणे इथे क्रमप्राप्त ठरते. मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल या संकल्पनांवर आधारित असलेली आणि त्यांचा अभ्यास करणारी गणित ही ज्ञानाची एक शाखा आहे. या शाखेत भाषेचा उल्लेख नाही. मात्र भाषेच्या समृध्दीवर या विषयाचे सुलभीकरण अवलंबून आहे, हे मान्यच करावे लागेल. मराठी भाषेची समृध्दी बघता ती विद्यार्थ्यांना लळा लावणारीही आहे. किंबहुना या भाषेतील सोपेपणामुळेच गणितासारखा किचकट विषय अनेकांच्या आवडीचा झालेला आहे. अर्थात गणिताचीही समृध्दी अवर्णनीय अशीच आहे.
यथा शिखा मयूराणां, नागानां मणयो यथा |
तथा वेदांगशास्त्राणां गणितं मूर्धनि स्थितम् ||
म्हणजेच ज्याप्रमाणे मोराचा तुरा त्याच्या शरीराच्या सर्वात वर असतो त्याप्रमाणेच वेदांच्या सर्व अंगांपेक्षा गणित हे सर्वात वर(उच्च) आहे. थोडक्या शब्दांचा मोठा आशय सांगणे गणितामुळे सहज जमते. म्हणूनच एकीकडे मराठीसारखी समृध्द भाषा आणि दुसरीकडे गणितासारखे परिपक्व शास्त्र यांचा पूर्वापार चालत आलेला मेळ बिघडवण्याचा आता प्रयत्न झाला तर संपूर्ण मनुष्य व्यवहारांवरच परिणाम होऊ शकतो. अभ्यास असे दाखवतात की, भाषा आणि गणिताचा संबंध अगदी आरंभापासून घनिष्ट राहिलेला आहे. भाषेचे व्याकरण बर्‍याच प्रमाणात गणिती पद्धती व शिस्तीप्रमाणे असते. एका वस्तूसाठी एकवचन आणि त्या अधिक असल्यास बहुवचन व त्यानुसार क्रियापदातील फरक अशा सारख्या बाबी एक, दोन व त्याहून मोठ्या संख्येतील वस्तू दाखवण्यासाठी वापरणे हे त्याचे प्राथमिक उदाहरण आहे. नव्या बदलामुळे पाढे मोजण्याची पारंपरिक पध्दतीला छेद बसण्याची शक्यता आहे. परिणामी दैनंदिन व्यवहारातील अडचणी वाढतील. आज केवळ पाढ्यांमुळे कॅलक्युलेटरच्या गतीने आकडेमोड करुन व्यवहार करता येतात. परंतु नवीन पध्दतीमुळे व्यवहारांची गतीही मंदावण्याची शक्यता आहे. शिवाय मोठे आकडे उच्चारताना अडचणी येतील. भाषा आणि गणित यांच्या नात्याबद्दल जगभरात अनेक संशोधने उपलब्ध आहेत. आपल्या मुलांच्या निव्वळ प्रयोगशाळा करण्याआधी त्यातल्या कोणत्या संशोधनाच्या आधारे हे निर्णय लादले जात आहेत, ते प्रथमत: स्पष्ट व्हावे. हा विषय गणिताचा कमी आणि संख्यावाचन कौशल्याचा अधिक आहे. ती कौशल्ये गणितीय नंतर व भाषिक अगोदर आहेत. कारण विषय कोणताही असो विचार स्वभाषेतच चालतो. उगाच शिक्षणाला सोपे करण्याच्या नादात नसता सावळागोंधळ घातला जातोय. खरे तर, विद्यार्थ्यांना सोपेच नव्हे तर सकस शिक्षण कसे मिळेल हे पाहायला हवे. नेमके तिकडेच दुर्लक्ष होत आहे. तुकोबा एका अभंगात म्हणतात, अवगुणांचा सांटा करी । ते चि धरी जीवासी ॥ तुका म्हणे जडबुद्धि । कर्मशुद्धी सांडवीं॥ म्हणजेच अवगुणांचा समुच्चय असलेल्या जडबुध्दीच्या व्यक्तीकडून चांगल्या कर्माची अपेक्षा करू नये. असे कर्म वारंवार करणारा ‘विनोद’ सरला. आता दुसर्‍याने तरी शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी ‘आशिष’ योगदान द्यावे. इतकेच!

First Published on: June 21, 2019 5:08 AM
Exit mobile version