राजकीय निकोपतेची गरज

राजकीय निकोपतेची गरज

संपादकीय

कुटुंबात सख्खे भाऊ पक्के वैरी झाल्याची अनेक उदाहरणं आपल्या अवतीभवती पाहायला मिळतात. असेच हिंदुत्वाच्या मुद्यावर सख्खे भाऊ असलेले शिवसेना आणि भाजप राजकीय वाद विकोपाला गेल्यानंतर पक्क्या वैर्‍यांसारखे रोज सकाळ संध्याकाळ एकमेकांच्या उरावर बसताना आपण बघत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासह सत्तेत सहभागी झालेली शिवसेना आणि 105 आमदार असूनही विरोधात बसावी लागणारी भाजपा यांचे संबंध हे साप आणि मुंगूस यांच्यापेक्षाही भयंकर झालेले आहेत. त्यातून पक्षीय हाणामार्‍या, आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पण्याही बाजूला पडल्यानंतर मुलाबाळांचाही द्वेष करण्यापर्यंत या उभय पक्षांमधील वाद पोचलेले आहेत. राज्यात आणि देशातही राजकारणाने आपली निकोपता गमावलेली आहे, अशा दिवसांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही आपल्यात राजकीय सभ्यता, स्त्रीदाक्षिण्य आणि माणुसकी हे गुण कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. सध्या गोव्यात विधानसभा निवडणुकीचा माहौल तापलेला आहे. भाजपने आपली महाराष्ट्रातील सगळी ताकद गोव्याच्या निवडणुकीत ओतली आहे.

प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केलेली निवडणूक शिवसेनेने तितकीच गांभीर्याने लढवायचं ठरवलंय. गोव्यातली शिवसेनेची ताकद ही यथातथाच आहे. मागच्या वेळेस शिवसेनेनं या ठिकाणी तीन जागा लढवल्या होत्या आणि तिन्ही जागांवर सेना उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या होत्या. यावेळी शिवसेना मागच्या वेळेपेक्षा पाचपट जास्त जागा लढवत आहे. सहाजिकच मुंबईसह महाराष्ट्रातील सेनेची अनेक नेते मंडळी गोव्यात प्रचारासाठी पोहोचत आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यादेखील शनिवारी गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पोहोचल्या होत्या. रविवारी सकाळी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर महापौर पेडणेकर यांना लगबगीने मुंबईला यायचं होतं. मात्र त्यांना सकाळच्या विमानाचं तिकीट मिळालं नाही. दुसर्‍या बाजूला गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विशेष विमानाची व्यवस्था आपल्या नेत्यांसाठी केली होती. कारण देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन असे नेते गोव्याच्या प्रचारात गुंतले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंत्यसंस्कारासाठी येण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्ष शिष्टाचार आणि राजशिष्टाचार यानुसार देवेंद्र फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे विशेष विमानाने मुंबईच्या दिशेने निघाले होते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना विमानाचे तिकीट मिळालं नाही ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना समजताच त्यांनी किशोरी पेडणेकर यांना आपल्या विमानातून मुंबईला प्रवास करण्याची परवानगी दिली. फडणवीसांच्या या सहकार्यामुळेच मुंबईच्या प्रथम नागरिक स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी वेळेवर पोहोचू शकल्या. फडणवीस यांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा हा शिवसेनेतल्या अनेकांना रुचलेला नाही. गेल्या काही वर्षांत सगळ्याच राजकीय पक्षात जे सुडाचे राजकारण सुरू आहे त्यातून शिवसेनाप्रमुखांच्या आदेशावर वाटचाल करणारा आणि आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात दिशा पकडणारा शिवसेना पक्षही सुटलेला नाही. सहाजिकच पक्षातीलच नेत्यांबाबतच्या कुरापती, तक्रारी, विरोधी बातम्या पेरणी या काँग्रेससारख्या गोष्टी शिवसेनेतही मोठ्या प्रमाणात शिरल्या आहेत.

फडणवीसांचं सहकार्य हा किशोरी पेडणेकर यांच्यासाठी अंत्यसंस्काराला योग्य वेळेवर पोचवणारा भाग ठरला असला, तरी त्यांची राजकीय डोकेदुखी वाढवण्यासाठीही तितकाच कारणीभूत ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी हिरीरीने पुढे असणार्‍या किंवा आशिष शेलार यांच्या राजकीय आरोपांना उत्तर देणार्‍या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुंबई उड्डाणाकडे देवेंद्र फडणवीस दुर्लक्ष करू शकले असते. पण त्यांनी तसं न करता आपल्या अंगी असलेली राजकीय निकोपता दाखवून दिली. जी मंडळी फडणवीसांच्या विमानातून प्रवास करणार्‍या किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य किंवा रश्मी ठाकरे यांची कानभरणी करणार असतील त्यांनी थोडं दमानं घ्यायला हवं. कारण ज्या राजकीय निकोपतेचे आणि संस्कारांचे दर्शन फडणवीसांनी दाखवलं तीच गोष्ट त्यांनी अंत्यसंस्काराच्या वेळी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या भेटीच्या वेळीही दाखवून दिली.

पंतप्रधान मोदी अंत्यसंस्काराच्यावेळी शिवाजी पार्कवर पोहोचल्यानंतर ज्या सोफ्यावर काही मिनिटांसाठी स्थानापन्न झाले होते त्या सोफ्यावर बसण्यासाठी तिथे उपस्थित असलेला कोणताही नेता बसण्याचे धाडस तर सोडाच, पण आजूबाजूलाही जाण्यापासून कचरत होता, त्यावेळी स्वतः पंतप्रधान मोदी यांनी देवेंद्र यांना आपल्या शेजारच्या सोफ्यावर बसण्यास सांगितले. त्यांच्या मागच्या बाजूला उद्धव ठाकरे स्थानापन्न झाले होते. पंतप्रधान मोदी यांनी आपल्याला दिलेली बसण्याची संधी अवघ्या काही क्षणात फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपलब्ध करून दिली. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या शेजारून उठताना मुख्यमंत्री ठाकरे हे मोदींच्या शेजारी बसतील याची काळजी घेतली. खरं तर भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्काराचे चित्रण देश-विदेशातील वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होते. त्यावेळी पंतप्रधानांच्या आणि त्यातही पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या शेजारी बसण्याची संधी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली.

यासाठी निकोप राजकारणाचे संस्कार गरजेचे असतात. देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेतच, पण त्याही आधी त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांचे संस्कार आणि कुटुंबातूनच मिळालेलं सभ्यतेचे बाळकडू यामुळेच आपल्या प्रतिस्पर्धी पक्षनेत्यांशी सभ्यतेचे आणि निकोप राजकारण्यांचं वर्तन देवेंद्र करू शकले. जी मंडळी किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात पक्षप्रमुखांचे कान भरण्यासाठी किंवा युवासेनाप्रमुखांकडे पालिकेतल्या कागाळ्या करण्यासाठी पोचतील त्यांना नि:शब्द करण्याची तयारी ठाकरे पितापुत्रांनी दाखवायला हवी. याचं कारण पंतप्रधान हे मुंबई महाराष्ट्रात आले होते, अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मोटारीपर्यंत जाऊन सोडण्याची जबाबदारी राजशिष्टाचार मंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांची होती.

मात्र ते करण्याचा विसर चुकून आदित्य यांना पडला असावा किंवा सरकारी अधिकार्‍यांनी कर्तव्यामध्ये कसूर केल्यामुळेदेखील ते राहून गेलं असावं, त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या मोटारीपर्यंत जाऊन सोडण्याची जबाबदारी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पार पाडली, ती एक पक्षाचा कार्यकर्ता आणि त्याच वेळेला राज्यातील एक सुजाण आणि सभ्य लोकप्रतिनिधी म्हणूनच. फडणवीस हे मोदी यांना सोडण्यासाठी मोटारीपर्यंत गेले. त्यावेळेस त्यांच्याबरोबर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर होते. मुख्यमंत्र्यांना शस्त्रक्रियेमुळे शारीरिक हालचाल करताना वेदनांमुळे मर्यादा येत असल्या तरी आदित्य ठाकरे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांना राजशिष्टाचारानुसार सोडायला न जाणं याचं कोणतंही राजकीय भांडवल फडणवीस यांनी केलं नाही. उद्धव ठाकरे हेदेखील संयमी आणि संस्कारी राजकारणी म्हणून ओळखले जातात. मात्र गेल्या काही काळात ते ज्या पक्षांबरोबर आहेत ते पक्ष आणि त्यांच्या स्वपक्षातील काही वाचाळवीर यांच्यामुळे ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्या यापुढे वाढू नयेत आणि शिवसेना निरोगी राहावी यासाठी स्वतः ठाकरेंनीच राजकीय निकोपता जागवण्याची गरज आहे.

First Published on: February 9, 2022 6:00 AM
Exit mobile version