गणराज रंगी नाचतो!

गणराज रंगी नाचतो!

गणपतीचा सण हा तमाम मराठी माणसांच्या मनाचा एक हळवा कोपरा आहे. डिजिटल युग की आणखी कुठलंही युग अवतरू दे, मराठी मनावरची या सणाची मोहिनी तसूभरही कमी होणं शक्य नाही! मराठी माणूस कोणत्याही युगात गणपतीचं आगमन तितक्याच धुमधडाक्यात साजरा करत राहील आणि तितक्याच जोशात गणपतीला निरोप देत राहील! त्याच्यासाठी गणपती हा सण भावभक्तीचा महिमा सांगण्यासाठी असतोच; पण गीतसंगीताच्या जल्लोषासाठीही असतो…आणि खरंच, गणपतीच्या या दिवसांत गणपतीवरच्या भक्तीसंगीताला एक अलोट पूर येत असतो. या दिवसांत महाराष्ट्रातल्या कोणत्याही गल्लीबोळांतून तुम्ही फिरा, गणपतीच्या गाण्याचे सूर तुमच्या कानामनाला स्पर्श करणार नाहीत असा एक दिवस या काळात जाणार नाही.

गणपतीचा हा सण जवळ आला की स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांनी गायलेलं ‘गणराज रंगी नाचतो’ हे गाणं नजरेसमोर येतं. महाराष्ट्रातल्या तमाम सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लता मंगेशकरांच्या याच गाण्याने होते, असं नेहमीच दिसून आलेलं आहे. या गाण्याची सुरुवात तबला आणि घुंगरांच्या ज्या नादाने होते तिथेच गणपतीचा हा सण आणि गल्लीबोळातला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्याची पावती मिळते. आज जवळ जवळ पन्नास वर्षे या गाण्याला झाली असतील; पण या गाण्याने गणेशोत्सव सुरू झाला नाही असं अघटित महाराष्ट्रात कधीच घडून आलेलं नाही, हा या गाण्याचा विशेष आहे आणि हे या गाण्याचं महत्त्व आहे.

हे गाणं जेव्हा आकाराला येत होतं तेव्हाचा काळ हा आजच्याइतका अत्याधुनिक नव्हता. कॉम्प्युटर हे प्रकरण तेव्हा कुणाच्या गावीही नव्हतं. गाण्याचं रेकॉर्डिंग हा गाण्याच्या अगणित रिहर्सल्सनंतरचा मामला होता. गाण्याचे शब्द तेव्हा नीट जोखून-पारखून घेतले जात होते, सूर-ताल नीट तोलून-मापून बेतले जात होते. आजच्यासारखं घिसाडघाईतलं ते गाणं नव्हतं. हे गाणं नंतर जेव्हा जेव्हा ज्या ज्या कुणी व्हर्जन साँग म्हणून गायलं तेव्हा तेव्हा या गाण्यासाठी पाश्चिमात्य वाद्यं वाजवली गेली; पण हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबध्द केलेल्या मूळ गाण्यात मात्र तबला, बासरी अशी पूर्णपणे भारतीय वाद्यं वाजवली गेली. त्यासाठी गाणंही खास कवयित्री शांता शेळकेंकडून लिहून घेण्यात आलं. ‘गणराज रंगी नाचतो, पायी घागर्‍या करिती रूणझुण, नाद स्वर्गी पोहोचतो’, हे शांताबाईंनी लिहून आणलेले ओघवते आणि अर्थप्रधान शब्द पाहिल्या पाहिल्या हृदयनाथ मंगेशकरांना पसंत पडले. गाण्याची एकूण चाल, तिची धाटणी पाहता हे गाणं लता मंगेशकरच गाणार हे निश्चित झालं.

तो काळ ध्वनिमुद्रिकांचा होता. त्या ध्वनिमुद्रिकेच्या एका बाजूला सुखकर्ता दु:खहर्ता ही आरती घालीन लोटांगणसह लता मंगेशकरांच्या आवाजात साकार होणार होती आणि त्यानंतर हृदयनाथ मंगेशकर मंत्रपुष्पांजली म्हणणार होते. दुसर्‍या बाजूला गणराज रंगी नाचतो या गाण्यासोबत ‘गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया’ हे गाणं असणार होतं, जे लता मंगेशकरच गाणार होत्या आणि जे शांताबाईंकडूनच लिहून घेण्यात आलं होतं. ही ध्वनिमुद्रिका बाजारात त्या काळात आली आणि हातोहात संपली होती. पण त्यानंतर आज पाच दशकं झाली तरी या ध्वनिमुद्रिकेवरच्या या संपूर्ण गाण्यांना गणपतीवरच्या आजवरच्या सगळ्या गाण्यांच्या आधी वाजण्याचा मान मिळतो. या गाण्यांचा गणेशोत्सवाच्या काळातला हा निश्चितच बहुमान आहे आणि तो आजतागायत टिकून आहे.

लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार द्वयीतले लक्ष्मीकांत कुडाळकर तर एकदा महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवांची आठवण सांगताना अगदी सहज म्हणाले होते, ‘गणराज रंगी नाचतो’ हे गाणं मी ऐकलं की मला तात्काळ कळतं की गणपती आले आहेत आणि गणेशोत्सव सुरू झाला आहे, हे गाणं आणि आपल्या घरात आलेला गणपती यांचं एक अद्भूत आणि अतूट नातं आहे, या गाण्याने आपल्याकडे गणपतीच्या सणाचं वातावरण उभं राहतं, समजा, गणेशोत्सव नसतानाही कुठे तरी एका समारंभात हे गाणं लागलं तरी गणपती हा देव आपल्या नजरेसमोर उभा राहतो ही या गाण्याची जादू आहे, यासारखं गणपतीचं मंगल गाणं पुन्हा होणे नाही, जसा सगळ्या देवादिकांमध्ये गणपतीचा मान आधी असतो तसंच या गाण्याचं आहे, गणपतीवरच्या सगळ्या गाण्यांमध्ये ‘गणराज रंगी नाचतो’ या गाण्याचा मान आधी आहे.

संगीतकार कल्याणजींचंही या गाण्याबद्दल असंच काही मत होतं. एकदा बोलता बोलता ते या गाण्याबद्दल म्हणाले, मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवात मी नेहमी बघत आलो आहे की गणराज रंगी नाचतो या गणपतीस्तुतीने गणेशोत्सवातल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात होते, हे गाणं लता मंगेशकरांच्या बहराच्या एका काळात रेकॉर्ड झालं होतं, ज्या काळात लता मंगेशकर अतिशय बिझी होत्या, अशा एका काळात हे गाणं त्यांच्याकडून गायलं गेलं आहे आणि गाण्यातलं वातावरण आपल्या आवाजातून असं काही उभं केलं गेलं आहे की ते ऐकताना आपण जणू गणपतीच्या मंदिरात उभे आहोत असं वाटायला लागतं. लता मंगेशकरांच्या आवाजातला भक्तिभाव ही तर एक अनोखी चीज आहे आणि त्यात हे गाणं तर भक्तिभावातली वेगळीच उंची आहे.

कल्याणजींचा हा मुद्दा पुढे न्यायचा तर लता मंगेशकरांच्या गाण्यातली त्या काळातली, त्या वयातली ती कोवळीक हीसुध्दा या गाण्याची जमेची बाजू आहे. आलम जगातल्या एका स्वरसम्राज्ञीच्या स्वर्गिय आवाजातली त्या काळातली ती कोवळीक आणि त्या कोवळीकेचा त्या गणपतीच्या गाण्याला झालेला भक्तवत्सल स्पर्श या दोन्ही गोष्टी आज या गाण्यात प्रकर्षाने दिसून येतात. या गाण्यातला सुरुवातीलाच ऐकू येणारा तो घुंगरांचा आणि तबल्याचा आवाज हा वातावरणात अनपेक्षितपणे उमटणारा झंकार आहे आणि तो अनपेक्षितपणे कानावर येताच त्यामागून लतादीदींच्या आवाजात ऐकू येणारे गणराज रंगी नाचतो हे बोल सार्‍या आसमंतात भावभक्तीच्या लहरी निर्माण करतात. नारद तुंबरू करिती गायन, करी शारदा वीणावादन, ब्रह्मा धरितो तालही रंगून, मृदुंग धीमी वाजतो या शांताबाईंनी वर्णनात्मक लिहिलेल्या ओळीतील धीमी हा शब्द लतादीदींच्या आवाजातून व्यक्त होताना तो उच्चारही धीमेपणाचं अगदी सार्थ वर्णन करतो.

आजचं जग टेक्नॉलॉजीचं आहे. त्यातून ही टेक्नॉलॉजी स्थिर नाही. ती चंचल आहे. प्रत्येक क्षणाला बदलती आहे. अपग्रेड हा या अस्थिर आणि बदलत्या टेक्नॉलॉजीचा परवलीचा शब्द आहे. अशा बदलत्या काळातही गणराज रंगी नाचतो या गाण्याला आजच्या चंचल-चपळ नव्या पिढीकडून लाइक्स मिळत असतात हे खरंतर एक मोठं अप्रूप आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर कुणी तरी गोरे परदेशी व्हायोलिनवर गणराज रंगी नाचतो हे गाणं वाजवत असल्याचा व्हिडिओ पाठवला जातो तेव्हाही या गाण्याबद्दल एक प्रकारचं अप्रूपच वाटतं. गणराज रंगी नाचतो या गाण्याची गेली पाच दशकं चालत आलेली मोहिनी हा खरोखरच एक वेगळा विषय आहे. एका पिढीने दुसर्‍या पिढीला दिलेलं हे नुसतंच गाणं नाही तर ते देणं आहे. गेली पाच दशकं, गणपती येताना या गाण्याला मिळणारा पहिल्या क्रमांकाचा बहुमान पुढचीही अनेक दशकं तसाच मिळत राहील याची ही हमी आहे. निरंजनातल्या वातीप्रमाणे संथ तेवत राहणारं हे गाणं चिरंतन टिकेल ते त्यामुळेच!

First Published on: September 1, 2019 6:18 AM
Exit mobile version