सुटलेला कॅच!

सुटलेला कॅच!

प्रातिनिधिक फोटो

ऑफिसमधील माझा एक ज्युनियर त्या दिवशी मला म्हणाला, सर मी आज जाम डिस्टर्ब्ड आहे. काही सूचत नाही. मी म्हटलं काय झालं. त्यावर तो बोलू लागला. आज मला माझ्या पहिल्या प्रेमाचे धक्कादायक दर्शन झाले. दहा वर्षानंतर ती मला दिसली. तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते. आम्ही दोघे एकमेकांकडे फक्त पाहत राहिलो. अगदी असहाय होऊन.

माणसाचं जीवन हा एक खेळ आहे. त्यात तो काही वेळा जिंकतो तर काही वेळा हरतो. जिंकल्यानंतर त्याला विलक्षण आनंद होतो. त्या आनंदाच्या भरात तो बेभान होऊन जातो. आपल्या खास मित्रांना ती आनंदाची बातमी तो सांगत सुटतो. आपला आनंद कुठे ठेऊ आणि कुठे नको, अशी त्याची अवस्था होऊन जाते. आनंद गगणात माझा मावेना, अशी त्याची अवस्था होऊन जाते. जेव्हा तो हरतो, त्यावेळी मात्र तो खिन्न होऊन बसतो. मनाने खचतो. स्वत:मध्ये स्वत:ला लपवण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात, काय तर आपण क्रिकेट खेळताना बरेच वेळा बरेच कॅच पकडलेले असतात. पण जो कॅच सुटतो, तो मात्र आपल्याला आयुष्यभर सतावत राहतो.

माणसाचा स्वभावच असा असतो की, हाती आलेल्या गोष्टीपेक्षा हातून सुटलेल्या गोष्टींची त्याला जास्त चुटपूट लागून राहते. ती आपल्याला मिळाली असती तर काय बहार आली असती, अशी स्वप्न त्याला केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाही दिसू लागतात. त्या दिवशी असंच झालं, माझा एक ऑफिसमधला ज्युनियर त्या दिवशी म्हणाला. सर, मी आज खूप डिस्टर्ब्ड आहे. डोकं खूप जाम झालंय. काहीच सूचत नाही. मी त्याला विचारलं काय झालं. तेव्हा तो म्हणाला, आज एक घटना घडली. त्यामुळे मला प्रचंड धक्का बसला. दहा वर्षांपूर्वीचं सगळं जीवन आठवलं. त्याचे ते बोलणे ऐकूण मी त्याला म्हटलं की, अरे असं काय झालं, सांग तरी. त्यावर तो म्हणाला, सर आपण ऑफिसच्या बाहेर जाऊ. तिकडे मी तुम्हाला सांगतो. मी म्हणालो ठिक आहे. आम्ही ऑफिसच्या बाहेर असलेल्या चहाच्या टपरीवर गेलो. पण तो चहा घेण्याच्या मूडमध्ये नव्हता. त्याला काही तरी सांगयचे होते.

तो म्हणाला, सर, आज मी ऑफिसला येत होतो. वाटेत चप्पल शिवणार्‍याच दुकान होते. तिथे एक मुलगी थांबली होती. तिची चप्पल तुटली होती. त्या उभ्या असलेल्या मुलीने माझ्याकडे पाहिले आणि मीही तिच्याकडे पाहिले. तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते. आमची दृष्टादृष्ट झाली. जणू काही आमची दृष्टी एकमेकांत अडकून पडल्यासाठी आमची स्थिती झाली. आमच्या दोघांच्या चेहर्‍यावर कुठलेच भाव नव्हते. दोघांचे चेहरे निर्विकार झालेले होते. कारण आम्ही दोघेही मनाने दहाबारा वर्षांपूर्वीच्या काळात गेलेलो होतो. त्यावेळी ती मुलगी आणि मी एकाच बिल्डिंगमध्ये रहात होतो. मी त्यावेळी अकरावीत होतो. ती मुलगी मला खूप आवडायची. त्यामुळे मी तिच्या मागे मागे असायचो. ती एक आध्यात्मिक बैठकीला जात असे. तिथेही मी देवदर्शनाच्या निमित्ताने जात असे. मी तिच्या मागे आहे हे तिलाही माहीत होते. पण पुढे आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली. बिल्डिंगमधले सगळे वेगवेगळ्या ठिकाणी राहयला गेलो.

नवीन बिल्डिंग झाल्यावर आम्ही आमच्या नव्या घरात रहायला आलो. पण ती मुलगी आली नाही. तिच्या आईवडिलांनी घर विकून ते दुसरीकडे गेले होते. ते जेव्हा मला कळले, तेव्हा मी खूप हळहळलो. मध्यंतरी दहाबारा वर्षे गेल्यानंतर काल ती अचानक अशी माझ्यासमोर अवतरली. काय वाटलं माझ्या मनाला म्हणून सांगू सर. मनाची विचित्र घालमेल झाली. इतकंच बोलून तो थांबला नाही. तुम्ही घेतला आहे का, असा अनुभव ? असा प्रश्न विचारून माझ्याकडे पाहत राहिला. त्याची नजर मला सांगत होती. तुम्हाला नाही कळणार माझी वेदना, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. त्याचही खरं होतं, कारण सुटलेला कॅच हा नेहमीच वेदनादायक असतो. वर्षानुवर्षे त्रास देत राहतो.

 

 

First Published on: July 18, 2018 7:00 AM
Exit mobile version