चंपू!

चंपू!

जयवंत दळवी यांची ‘महानंदा’ कादंबरी बहुतांशी लोकांनी वाचली आहे, असा माझा समज आहे. मात्र ज्यांनी ती वाचली नसेल तर त्यांनी अजूनही ती वाचून काढावी. तळकोकणातील रूढी आणि परंपरावर चितारलेल्या या कादंबरीने मानवी जीवन ढवळून काढले आहे. प्रेम, नाती, संबंध, निसर्ग, देऊळ, देव, देवाची सेवा, माणूस, देवाची बंधने, गायन कला, गाण्याच्या माध्यमातून देवाची आराधना हे सारे एकमेकांच्या हातात हात घालून अशा काही कलागुतीने आपल्या समोर येतात की, आपण थक्क होऊन जातो. याच कादंबरीवर ‘महानंदा’ सिनेमा आला होता. त्याआधी त्यावर नाटक आले होते ‘गुंतता हृदय हे’. ‘गो मानू, चटय टाक. मामा इलेत. बस हा मी इलय, च्याय घेऊन. पानाच्या पेटयेत सगळा हा मा, बघ हा. मामांशी जरा गजाली मार’, असे सांगणारी आणि नऊवारीतील सौंदर्याचे अमाप लेणे घेऊन आपल्यासमोर उभी राहिलेली कल्याणी आजही काळजाचा ठोका चुकवते. कल्याणी, महानंदा (मानू), मामा, मामी आणि मामाचा भाचा अशा पाच पात्रांभोवती फिरणार्‍या नाटकाच्या अखेरीस परिस्थितीने कल्याणीच्या आयुष्याची झालेली चित्तरकथा, चारचौघींप्रमाणे सुंदर संसाराचे स्वप्न रंगवत असताना आपल्या आईप्रमाणे महानंदाच्या नशिबी शेवटी भावीण म्हणून देवाची सेवा करण्याचा आलेला भोग आणि शेवटी वेड्या झालेल्या कल्याणीने जिवाच्या आकांताने ‘ गो मानू… माका सोड मगो. माका कित्याक बांधलास… म्हणून मारलेली किंचाळी काळीज चिरणारी होती…’

आज हे सारे माझ्या डोळ्यासमोर उभे आहे ते चंपूच्या रूपात. आता ती या जगात नाही. पण, तिचे अभिजात देखणेपण, देऊळ, गाणे, देवाची सेवा करता करता तालेवार गावकराशी तिचा आलेला संबंध, त्याच्यापासून झालेली उत्पत्ती, सर्व काही ठीकठाक असताना शेवटी आपल्या नशिबी ठेवलेल्या बाईची आलेली वेदना हे सारे माणसाच्या नशिबाची एक छोटी गोष्ट डोंगराएवढी होऊन जाते. गावचे आम्ही मानकरी असल्याने तळकोकणात आमच्या गावी देऊळ आणि परिसरात आम्हाला मोठा मान आहे. तो परंपरेने आला आहे. त्यात आमचे असे मोठे कर्तृत्व नाही. पण, मी गावी गेलो की, चंपूच्या घराला भेट दिल्याशिवाय कधीच मुंबईला परतलो नाही. माझी त्या घराशी आंतरिक ओढ होती. ती का होती? मला माहीत नाही. पण, तिच्याशी दोन घटका गजाली मारताना मानवी स्वभावाचे कंगोरे जाणून घेण्यात मला खूप रस होता. माणसे, त्यांचे प्राक्तन, त्याच्याबरोबर जुळवून घेत त्यांनी आयुष्याशी केलेली तडजोड आणि एक सल कायम ठेवून या जगाचा घेतलेला निरोप एक जिवंत कथा समोर दत्त म्हणून उभी असते, वाट पाहत असते कागदावर उतरण्याची! काळ भरभर डोळ्यासमोरून सरकत असतो…

‘रे, संजय मुंबईसून कधी इलय. आवस बापूस काय म्हणता. बरे असत मा. बापूस गिरणेत काम करून थकलो आसात. चंपून ईचारल्यान म्हणान सांग. थांब हा… च्याय घेऊन इलय’, असे म्हणत ती नऊवारी सावरत चुलीकडे गेलेली असते. तिच्या दारातून कधी कोणी च्यायपाणी घेतल्याशिवाय गेला असे कधी झाले नाही. मुख्य म्हणजे तिचा सदैव हसरा चेहरा. ती आता उतारवयात होती. पण, तिच्या तारुण्याच्या काळात तिची पसरलेली कीर्ती मला वडील सांगत तेव्हा पडद्यावरच्या नट्या झक मारतील, असे तिचे रूप होते. चापून चोपून नेसलेली नऊवारी. गळ्यात मंगळसूत्र, दोन दागिने, नाकात चमचमणारी खड्याची फुली, भरलेला चुडा आणि चार सोन्याच्या बांगड्या, केसांचा आंबडाही नीट बांधून त्यावर सुरंगीचा वळेसार… डोळ्यात हलकेसे काजळ आणि पानाचा विडा सतत तोंडात ठेवून तो घोळवत समोरच्या माणसावर प्रेमाचा वर्षाव केल्यासारखे तिचे बोलणे… सर्व काही लाघवी होते. मुळात ती गोरीपान होती, तिला खूप पावडर लाली लावण्याची कधीच गरज भासली नाही. तिच्या एका नजरेत समोरच्याला घायाळ करण्याची मोठी ताकद होती. पण, तिने आपल्या प्रेमाचा कधी बाजार मांडला नाही. तिला भेटायला खूप तालेवार येत, पण, बाईने आपल्या घरंदाज रुबाबाने खूप जवळ येऊ पाहणार्‍या लोकांना कायम दूर ठेवले होते. कोणाबरोबर किती अंतर ठेवायचे हे तिला माहीत होते. तिचे लग्न खरेतर देवाबरोबर लागले होते. तिला फार काही माहीत नसताना तिच्या आईने हा देवच तुझा आता तारणहार आहे, असे सांगत परंपरेने तिला देवाला वाहिले आणि तिचा बाप असणार्‍या एकाच गावकराबरोबर एकनिष्ठने राहिली.

आई वारल्यानंतर चंपूलाही दुसरा मार्ग नव्हता. गावातल्या एका श्रीमंत गावकाराबरोबर शेवटपर्यंत त्याची ठेवलेली बाई ‘देवळीण’ म्हणून राहिली. त्याच्यापासून तिला दोन मुले झाली. मुलीला मात्र तिने देवाला वाहिली नाही. शेजारच्या गोव्यात तिचे लग्न लावून दिले. मुलगा मोठा होऊन मुंबईत नोकरीला गेला. आता चंपू उतारवयात असली तरी तिची देहबोली अजूनही तिच्या तरुणपणाची कहाणी सांगणारी होती. माझे बाबा सांगत, चंपू फक्त दिसायलाच सुंदर होती असे नाही, तिचा आवाजही देववाणी होता. बाई देवळात हातात तंबोरा घेऊन बसली आणि सोबत बाबू मेस्त्रीचा तबल्यावर सराईतपणे फिरणारा हात, गजा वेंगुर्लेकरांची पेटीवर नजाकतीने फिरणारी बोटे असली की देऊळ मंत्रमुग्ध होऊन जाई. चंपू तिच्या आईकडून गायनाचा वारसा घेऊन आली होती. तास दोन तास तिच्या स्वरांचा अभिषेक असा काही रंगात येई की सांजवेळेला एक नाद सार्‍या आसमंतात भरून राही. देवाशी तिचे हे एकरूप होताना पाहणे म्हणजे देवाशी तिचा चाललेला संवाद असे… फक्त बाबाच नाही तर आमच्या सर्व भावबंधांसाठी तिचे गाणे हा अमृताचा वर्षाव होता…

चंपू च्याय घेऊन येईपर्यंत तिच्या जीवनाचा फ्लॅशबॅक माझ्या समोरून झरझर पुढे जात होता. माझी तंद्री लागली होती. शेवटी तिनेच मला हाक मारली, ‘रे कसल्या इचारात पडलंय. सोड ते. गरमशी च्याय घे आधी. गोडाचो शिरो पण केलय. सुशेगाद खा. मुंबईत पैसो हा, पण सुख खूय आसा… मेली, माणसा धावतत नुसती’. चंपूने माझ्यासमोर बसून पानाची पेटी उघडलेली असते. तिचा पान खाण्याचा आवडीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. मी च्याय पिता पिता विचारतो, गे, आताशी देवळात जातंय मा. बाकी लग्न कार्य. देवाची कामा. तिच्या उत्तरात पहिल्यासारखा उत्साह नसतो… जीवात कुडी आसा तोवर माका या करूकच व्हया. देवाशिवाय माझा आता आसा कोण. झिल आणि चेडू आपापल्या मार्गाने गेले. बरा झाला. सुटली. गाव, देव करत बसली असती तर हिसरच पडान रवली असती. बरा झाला देव रामेश्वर पावलो. बाबलो गावकार जितो आसापर्यंत माका काय एक कमी पडला नाय. रामेश्वर आणि तो माझे देवच ते. आता तो नाय पण दहा पंधरा कुणगे असत, खंडीभर भात मिळता. आंब्याची पाच पंचवीस कलमा असत, घराभोवती नारळा सुपारीची बाग हा… माका एकट्याक पुरान उरता. गावकरान माका काय एक कमी पडान दिल्यान नाय. थकलो तरी काठी टेकीत येय. त्याच्या बायलेपेक्षा माझ्यार तेचा प्रेम होता… असे सांगताना चंपूचे डोळे भरून आलेले असतात. गळा दाटलेला असतो… त्याची बायल आणि पोरासुद्धा बरी हा. गावकारीन मोठ्या मनाची हा… आपल्या घोवाची दुसरी बायल म्हणान कधी दु:स्वास केल्यानं नाय. पण, मी ठेयलेली. माका माझी पायरी माहयत होती… आणि पुन्हा एकदा तिचे डोळे भरून येतात.

गावात लग्न कार्य असले की चंपूला देवानंतर मोठा मान होता. तिची साडी चोळीने ओटी भरण्यापासून ते तांदूळ, नारळ, एक रक्कम एक गाव रित म्हणून तिला द्यावाच लागे. शिवाय दसरा, दिवाळी, जत्रा, देवाची लग्न या सार्‍या कार्यात ती पुढे असे… रात्री बारा वाजता देवाची पालखी निघाली की साजशृंगार केलेली चंपू हातात कापसाचा पंखा घेऊन देवाला वारे घालत पुढे निघाली की तिचे रूप बघण्यासाठी आणि गाणे ऐकण्यासाठी गावच नाही तर सारा परिसर गोळा झालेला असे… वडिलांकडून मी सारे ऐकलेले होते. आता जत्रेत ती पालखीसोबत जात नाही. देवळात शांत बसलेली असते… पान खात असलेल्या चंपूला मी हळूच विचारतो, गे आताशे जत्रा कसे झकपक असतत. नाय तर तुमच्या वेळेक. साफ काळोख… तिचे उत्तर तयार, रे कसले गजाली सांगतय. ‘पेट्रोमॅक्सच्या उजेडात जी जत्रा चला त्याची मजा आताच्या लायटीत नाय झिला. चंद्राच्या परकाशात देऊळ आणि आवाट न्हावन निघा… आणि त्या चांदरातीत देवाचा गाणा म्हणजे देवच खाली इल्यासारखो माका वाटा. मी आणि माझा गाणा… माका मग काय एक दिसा नाय. मी हळूच सांगे, गे एखादा पद म्हण मगे. नको रे आता मी सकाळी उठाण तंबोरो घेनय ना… आवाजही फिरना नाय. तरी मी तिला गळ घाल्यानंतर ती एखादे भजन अशा तन्मयतेने गात असे की माझी चंपूच्या घरची फेरी सार्थकी लागे…

जाताना आईने घरून दिलेली भेट तिच्या हाती देताना मला आपल्या मायेच्या माणसाला दिल्यासारखे वाटे. त्यात न विसरता साडी चोळी असे, पण आईने थोडेसे पैसेही दिलेले असत. बाबा गेल्यानंतर आईने देवाचा हा वारसा पुढे चालू ठेवला होता… तिचा निरोप घेताना मला प्रत्येक वेळी वाटे की चंपू आता भेटणार की नाही. पण, ती बरीच वर्षे भेटत राहिली आणि अचानक मुंबईत एके दिवशी चंपू हे जग सोडून गेल्याचे कळले… आमच्या गावचा एक सांस्कृतिक वारसा काळाच्या उदरात गडप झाल्यासारखा वाटला. ती गेल्यानंतरही गावी गेल्यावर मी तिच्या घरी एक चक्कर मारतोच. आतासे तिचे घर बंद असते. मुलगा कधी तरी बायका पोरांना घेऊन येतो. पण, काही दिवसांकरता. तिच्या असण्याने त्या घराला आणि देवळाला एक अभिजात असे रूप आणि देवगाणे लाभले होते. जत्रेत पालखी निघते तेव्हा माझी नजर चंपूला शोधत असते. किमान देवळात तरी ती दिसेल, असे वाटून जाते… पण, ती या जगात नसते, हे कळूनही खरे वाटत नाही. जगात जे जे सुंदर, सात्विक वाटते तेथे चंपू आहे असा मला कायम भास होतो…

First Published on: December 8, 2019 5:48 AM
Exit mobile version