स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक साने गुरुजी

स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक साने गुरुजी

साने गुरुजी यांचा आज स्मृतिदिन. साने गुरुजी हे अध्यापक, स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक, लोकशाही समाजवादाचे भाष्यकार आणि आंतर-भारती चळवळीचे प्रवर्तक होते. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने, परंतु ‘साने गुरुजी’ या नावानेच ते ओळखले जात. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी पालगड (ता. दापोली जि. रत्नागिरी ) येथे झाला. प्राथमिक शिक्षण पालगडला, माध्यमिक शिक्षण दापोली, औंध, पुणे येथे. बी. ए. ची पदवी घेऊन (१९२२) मुंबई विद्यापीठाची एम. ए. ची पदवी (१९२४) त्यांनी संपादन केली. अमळनेर ( जि.जळगांव ) येथील तत्त्वज्ञान मंदिरात अधिछात्र (फेलो), पुढे तिथल्याच ‘प्रताप हायस्कूल’ मध्ये शिक्षक व वसतिगृहप्रमुख म्हणून काम केले. १९३०-३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील सहभागामुळे धुळे, नाशिक आणि तिरुचिरापल्ली येथे तुरुंगवास भोगला.

दरम्यानच्या काळात साक्षरतेचे वर्ग चालविणे, खादी विकणे, काँग्रेससाठी निधी जमविणे, देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेल्यांच्या तसेच देशासाठी बलिदान केलेल्यांच्या कुटुंबीयांना सहाय्य करणे इत्यादी कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांचे निर्मूलन झाले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. १९४६ मध्ये पंढरपूरचे विठ्ठलमंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले आणि त्यांच्या मंदिरप्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला. १९४८ साली त्यांनी ‘साधना’ हे साप्ताहिक पुण्यात सुरू केले.

समाजवादी विचारप्रणालीच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक बंधुभाव वाढीला लागावा व समतेची प्रस्थापना व्हावी, हा त्यामागील हेतू होता. विद्यार्थी (मासिक), काँग्रेस (साप्ताहिक), कर्तव्य (सायंदैनिक) अशी अन्य नियतकालिकेही त्यांनी चालवली. साने गुरुजींनी कादंबरी, कथा, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र इत्यादी साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले. त्या दृष्टीने ‘श्यामची आई; (१९३५) हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक विशेष उल्लेखनीय होय. अशा या थोर समाजसेवकाचे ११ जून १९५० रोजी निधन झाले.

First Published on: June 11, 2022 4:30 AM
Exit mobile version