लेखिका गौरी देशपांडे

लेखिका गौरी देशपांडे

गौरी देशपांडे यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९४२ रोजी झाला. गौरी देशपांडे या चौकटीबाहेर लिहिणार्‍या मराठीतील लेखिका म्हणून परिचित होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी-मराठी व मराठी-इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले.

प्रसिद्ध लेखिका, संशोधक इरावती कर्वे या गौरी देशपांडे यांच्या मातोश्री होत. दिनकर धोंडो उर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील. जाई निंबकर या इंग्रजी व मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व गौरी देशपांडे यांचे आजोबा होते. ‘समाजस्वास्थ्य’ या लैंगिक शिक्षण देणार्‍या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे गौरी देशपांडे यांचे सख्खे काका.

गौरी देशपांडे यांचे पुण्यातच प्रामुख्याने वास्तव्य राहिले आहे. काही काळ मुंबईत, बर्‍याचशा परदेशवार्‍या व विंचुर्णी,मराठी साहित्याला स्त्री लेखिकांची मोठी परंपरा लाभली आहे. ताराबाई शिंदे, लक्ष्मीबाई टिळक ह्यांच्यापासून ते अगदी आजच्या कविता महाजन, मोनिका गजेंद्रगडकर ह्याच्यापर्यंत असंख्य स्त्रियांनी निरनिराळ्या पातळीवरून स्त्री आयुष्याच चित्र वाचकांपुढे उभं केलं. ह्या सगळ्या प्रभावळीत गौरी देशपांडे यांनी केलेल्या लिखाणाचं वेगळेपण हे विशेष आहे. त्याआधीच्या बर्‍याचशा साहित्यात स्त्रियांचे कौटुंबिक प्रश्न किंवा पुरुषी वर्चस्वामुळे निर्माण झालेले प्रश्न चर्चिले गेले होते. गौरी देशपांडे यांची पिढी ही स्वातंत्र्योत्तर पिढी होती.

स्त्रियांपुढचे प्रश्न बदलले होते. संपले नव्हते. स्त्रीने शिक्षणासाठी, नोकरीसाठी घराचा उंबरठा ओलांडण्याची सवय समाजाला झाली होती. गौरी यांची पिढी ह्या प्रश्नांपासून पुढे आली होती. समाजाने स्त्रीकडे ‘व्यक्ती’ म्हणून बघावं अशा विचारांच्या प्रभावाखाली होती.गौरी देशपांडे यांच्या साहित्याची सविस्तर सूची विद्या बाळ, गीताली वि. म., वंदना भागवत संपादित, मौज प्रकाशन गृह प्रकाशित कथा गौरीची या पुस्तकात वाचावयास मिळते. ‘Beetween Births’ या १९६८ साली प्रकाशित झालेल्या इंग्रजी काव्यसंग्रहाने गौरी देशपांडे यांचा लेखनप्रवास सुरू झाला.

गौरी देशपांडे यांच्या लेखनात तिच्या मुक्त विचारांचं प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसतं. तिचं लेखन स्त्रीवादी असण्यापलीकडे जाऊन स्वातंत्र्यवादी, व्यक्तिवादी होतं. वेगवेगळ्या पातळीवरचं प्रेम, त्या प्रेमाची मोजावी लागणारी किंमत आणि त्या प्रेमाच्या मर्यादा ह्याबद्दलचे विचार तिच्या लेखनात दिसतात. स्त्रीवादाच्या वाटेवरून जाणार्‍या कोणत्याही आधुनिक, मराठी साहित्यप्रेमी माणसाला गौरी देशपांडे हे नाव टाळून पुढे जाता येत नाही. तो एक अपरिहार्य टप्पा असतो, असंच तिचं लेखनकर्तृत्व आहे. लेखणीचा ’धीट’पणामुळे विशेष गाजली. दिवाळी अंकांमधून तिनं लिहिलेल्या काही छोटेखानी ‘लोक’कथाही लक्षणीय आहेत.

गौरी देशपांडे यांच्या साहित्याबद्दल जी चर्चा झाली, ती मात्र तिने रंगवलेल्या देशीविदेशी प्रियकरांबद्दल आणि नायिकेच्या शरीरसंबंधांबद्दल. गौरीच्या लेखनात ह्या शरीरसंबंधांबद्दल धीट भाष्य आहे. ह्या धीटपणामुळे गौरीवर ‘बंडखोर लेखिका’ हा शिक्का मारला गेला. ह्या सगळ्या वर्णनातून गौरीने स्त्रियांच्या मानसिक आंदोलनांबद्दल आणि त्यांच्या लैंगिकतेबद्दल जे भाष्य केलं होतं, त्याकडे मात्र दुर्लक्ष झालं. अशा या महान लेखिकेचे १ मार्च २००३ रोजी निधन झाले.

First Published on: February 11, 2021 1:00 AM
Exit mobile version