लिंगभाव: नैसर्गिक की सामाजिक?

लिंगभाव: नैसर्गिक की सामाजिक?

लिंगभाव ( प्रातिनिधिक फोटो )

‘जेंडर’ या शब्दाला मराठीत ‘लिंगभाव’ म्हटले जाते. या विषयावरच्या प्रशिक्षणात ‘जेंडर म्हणजे काय?’ असा प्रश्न विचारला की अनेकदा, ‘स्त्री’, ‘पुरुष’ अशी उत्तरे येतात. ‘लिंग’ आणि ‘लिंगभाव’ यात बऱ्याचदा गल्लत केली जाते. निसर्गाने स्त्री-पुरुषांमध्ये जे फरक केले त्याला ‘लिंग’ आणि त्याच फरकाचा आधार घेऊन समाजाने स्त्री-पुरुषांना ज्या भूमिका दिल्या आणि त्यांच्यातले सत्तासंबंध निर्धारित केले त्याला ‘लिंगभाव’ म्हणतात. मात्र, समाजात केवळ स्त्री आणि पुरुष याच दोन लिंगाची माणसे नसतात, हे ही आवर्जून नोंदवले पाहिजे. अशा व्यक्तींना ‘विभिन्नलिंगी’, ‘ट्रान्सजेंडर’, ‘इंटरसेक्स’ असे शब्द वापरले जातात. ‘स्त्री-पुरुष समानता’ हा शब्द अपुरा आहे, कारण त्यात विभिन्नलिंगी व्यक्तींची दखलच घेतलेली नाही. त्यामुळेच, आता ‘लिंगाधारित समानता’ असा सर्वसमावेशक शब्द वापरला जातो.

‘स्वयंपाक करणे’, ‘जेवण वाढणे’ या भूमिका स्त्रियांच्या तर ‘कमावून आणणे’, ‘संरक्षक असणे’ या पुरुषांच्या भूमिका मानल्या जातात. घरात स्वयंपाक करण्याला आणि जेवण वाढण्याला कोणताही आर्थिक मोबदला नसतो. मात्र, हॉटेलमध्ये स्वयंपाक केल्यास, जेवण वाढल्यास पैसे मिळतात! मग ही कामे करायला पुरुष तयार होतो! त्यामुळेच घरात स्वयंपाकाची जबाबदारी स्त्रियांवर असते तर हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये पुरुष अधिक प्रमाणात दिसतात. ‘पुरुषांना स्वयंपाक करणे जमत नाही’ असे मानले जात असल्याने स्त्रियांना घरच्या जबाबदाऱ्या सोडून सहसा कुठे जाता येत नाही. कुठेही जायचे झाले तर त्याचा त्यांच्यावर ताण येऊ शकतो. ‘लिंगभाव’ राजकारण काय असते याची कल्पना असलेली व्यक्ती विचारेल, ‘पुरुषांना स्वयंपाक येत नाही, हे नैसर्गिक आहे की सामाजिक?’ उत्तर अर्थातच ‘सामाजिक’ असणार, हे उघड आहे.

घराबाहेर पुरुषाला स्वयंपाक करता येत असेल तर घरात तो सहसा का करत नाही, यामागचे अर्थकारणही लिंगभाव संकल्पनेमुळे आपल्याला समजते. स्त्री चळवळीतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या कमला भसीन म्हणतात, ‘स्त्रिया स्वयंपाक करत असतील तर पुरुषांनाही तो करता आला पाहिजे, कारण स्त्रिया आपल्या गर्भाशयाने स्वयंपाक करत नाहीत!!’
भांडवलशाही व्यवस्थेत – त्यातही शहरी विभागात – मध्यमवर्गीय कुटुंबात नवरा आणि बायको अशा दोघांनीही नोकरी करून पैसे कमावल्याशिवाय अपेक्षित जीवनशैली प्राप्त होणे अवघड असते. एकाच्या पगारातून घर चालते तर दुसऱ्याच्या पगारातून घराचे, गाडीचे इ. हप्ते जातात. अशी आर्थिक अपरिहार्यता असल्याने मग स्त्रियाही घराबाहेर पडून पैसे कमावतात. मात्र घरकामाची प्रमुख जबाबदारी स्त्रीचीच असलेली आढळते.

लिंगभाव म्हणजे काय याची स्पष्टता यायची असेल तर महत्त्वाचा प्रश्न असेल, ‘नैसर्गिक की सामाजिक?’ पुरुष सर्वाधिक हिंसा करतात, हे खरेच. पण तो निसर्गत:/जन्मत: हिंसक असतो की त्याला तसा घडवला जातो? यावर विचार केला तर लक्षात येते की, जात, धर्म, लिंग, देशप्रेम इ.च्या नावाखाली चालणारे राजकारण पुरुषाला हिंसेला प्रवृत्त करते. अनेकदा हे ही दिसते की स्त्रिया हिंसा सहन करत राहतात. ‘स्त्रिया मुळातच सहनशील असतात’ असे त्याचे समर्थनही केले जाते. यावर, ‘नैसर्गिक की सामाजिक’ असा प्रश्न विचारला की हे सामाजिकच असल्याचे दिसते. लहानपणापासून मुलीला सतत सहनशील असण्याचे धडे दिले जातात. आपली पंधरा वर्षांची मुलगी रोज मारामाऱ्या करून येत असेल तर, ‘मुलीच्या जातीला हे शोभत नाही’ असे म्हटले जाईल. याउलट, पंधरा वर्षांचा मुलगा रोज मार खाऊन येत असेल तर, ‘बांगड्या भरल्या आहेस का?’ असे विचारून त्याचा अपमान करून, त्याला ‘दोन द्यायला आणि दोन घ्यायला’ प्रवृत्त केले जाईल. म्हणजे मुलीने मार देऊन यायचा नाही आणि मुलाने खाऊन यायचा नाही, अशी लिंगभावाची समांतरपणे घडण केली जाते. मुलीला स्त्रीत्वाचे तर मुलाला पुरुषत्वाचे ‘धडे’ दिले जातात. त्यातूनच आपण आपापल्या भूमिका पार पाडायला, भावनांचे प्रकटीकरण करायला शिकत असतो.

‘स्त्रिया हळव्या आणि पुरुष कठोर असतात’ असेही अनेकदा म्हटले जाते. हे ही नैसर्गिक नसून सामाजिक आहे. स्त्रिया कठोर असू शकतात आणि पुरुष हळवे. पुरुषांमधला हळवेपणा मारला जातो तर स्त्रियांमधला कठोरपणा दाबून टाकतात. पुरुष हळवा असेल तर त्याला ‘बायल्या’ म्हणून हिणवले जाते. मुलाने खेळण्यासाठी बाहुली मागितली तर त्याला ती दिली जाणार नाही, कारण त्याने ‘पुरुषी’ गुण आत्मसात करणे अपेक्षित असते. मुलीला मात्र बाहुली आणि भांडीकुंडी खेळायला देऊन तिच्यात स्त्रीत्व रुजवले जाईल. कारण मोठी झाल्यावर तिने ‘चूल आणि मूल’ ही प्रमुख जबाबदारी पार पाडून मगच इतर काही कर्तृत्व गाजवावे, अशी तिच्याकडून अपेक्षा असेल.

थोडक्यात, लिंगभाव हा सामाजिक-सांस्कृतिक असतो तर लिंग हे नैसर्गिक, शारीरिक, जीवशास्त्रीय असते. स्त्रियांना गर्भाशय असणे, मासिक पाळी येणे, पुरुषाला दाढी-मिशा असणे, वयात आलेल्या मुलांचा आवाज घोगरा होणे, बाळंतपणानंतर स्त्रीच्या स्तनांमध्ये दूध येणे, हे शरीराशी संबंधित फरक हेच नैसर्गिक आहेत, तर स्त्रियांनी लाजाळू आणि पुरुषांनी आक्रमक असणे, स्त्रियांनी जेवण वाढणे आणि पुरुषांनी जेवणे, स्त्रियांनी मोठ्याने हसायचे नाही आणि पुरुषांनी मोठ्याने रडायचे नाही, स्त्रियांचे केस लांब असणार तर पुरुषांचे आखूड, हे सारे सामाजिक आहे. यात आणखीही भर घालता येईल. खरे पाहता, मुख्यत: प्रजनन अवयवातले फरक सोडता स्त्री-पुरुषांमधील बाकीचे सारे फरक सामाजिकच आहेत. ‘स्त्रियांची शरीररचनाच अशी असल्याने त्यांचे स्थानही दुय्यम, कनिष्ठ असणार आहे’ या युक्तिवादाचे खंडन करण्यासाठी म्हणून ‘नैसर्गिक की सामाजिक’ हा खल आवश्यक ठरतो. मात्र, सत्तासंबंधांचा संदर्भ तपासल्याशिवाय लिंगभाव संकल्पनेची चर्चा पूर्ण होत नाही.


मिलिंद चव्हाण

First Published on: July 24, 2018 6:15 AM
Exit mobile version