अमर्यादा पुरुषोन्मत्त !

अमर्यादा पुरुषोन्मत्त !

एकाद्या गरीब वस्तीत रहाणार्‍या सभ्य लोकांना नेहमीच एक प्रश्न आपल्या मुलांच्या दृष्टीने शिणवत असतो. त्यांच्या कानावर सतत खूप घाण गलिच्छ शिव्या पडत असतात. त्यांना भीती वाटते की, आपली मुलेही असल्याच शिव्या देऊ लागतील. साधारण साठेक वर्षांपूर्वी सर्वच पुरुषांनी लैंगिक व्यवहारांवरून गलिच्छ शिव्या देणे हे त्या काळी शिष्टसंमत मानले जात असेल. पुरुष आहे, मर्द आहे शिव्या तर देणारच. त्यात काय एवढं…

या शिव्या आपल्याला आईबापांवरून पडू नयेत या काळजीपोटी अनेक स्त्रिया सतत पडतं घेत. नवर्‍याला, सासर्‍याला, दिराला राग येऊ नये म्हणून पडेल ते करीत. बापाला नि भावाला राग येऊन त्यांनी आपल्याला घाण शिव्या देऊ नयेत म्हणून आयाबहिणीही नेमून दिल्याप्रमाणे वागत. ओंगळाने ओटी भरली जाऊ नये एवढी एक प्रबळ इच्छा त्यांच्या मनात असे. मग आला काळ सभ्य मध्यमवर्गाचा. आता शिव्या देणारे पुरुष हे मर्द वाटेनासे झाले. ते असभ्य, असंस्कृत आहेत, नालायक आहेत अशी धारणा स्त्रियांच्याच काय पुरुषांच्याही, लहान मुलामुलींच्याही मनात रुजू लागली. शाळेत जाणारी मुलंमुली शिव्या देणार्‍या बापाकडे शंकेने पाहू लागली. तरीही शिव्या, विशेषतः लैंगिक व्यवहारांवरून शिव्या या कुणालातरी भिवविण्याचे साधन म्हणून कामात येतच होत्या. ही असभ्यता सार्‍या जगातून दूर व्हायला अजून बराच काळ जावा लागणार आहे.तरीही पूर्वीसुद्धा शिवराळपणा हा आपापल्या खाजगी अवकाशात होता. लिखित वाङमयात, साहित्यात शिवराळपणा काही वास्तव मांडण्याची गरज म्हणून येत राहिला. महाराष्ट्राच्या लाडक्या संत तुकोबांनीही शिव्यांचा वापर काही प्रमाणात केला. त्यातही एक विशिष्ट जाणीव होती, हेतू होता. दलित कवितेत त्या आल्या कारण त्यातून आसमंताचे वास्तव भान येत होते.

भारतात २०१३ मध्ये निवडणुकीचे वारे घोंघावू लागले आणि एका विचित्र सामाजिक सत्याचे दर्शन सर्वांनाच होऊ लागले. जी शिवीगाळीची भाषा केवळ घरात वा वस्तीत वापरली जात होती ती आता थेट समाज माध्यमांच्या खुल्या व्यासपीठावर दणदण करू लागली. यात सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय लोक सहभागी आहेत हे स्पष्ट होत आहे. यातील एक गोष्ट मात्र जुनीच आहे. विशेषतः स्त्रियांना नमते घ्यायला लावण्यासाठी त्यांचे शिवराळ ट्रोलिंग अधिक प्रमाणात होते. दुष्टता अशी की अशा ट्रोल होत असलेल्या स्त्रियांचा कैवार घेऊन जाणारेही पुन्हा त्याच प्रकारची शिवीगाळ करू लागतात. त्यांचे स्पष्टीकरण असे असते की त्यांना त्यांच्याच भाषेत समजवावे लागते. २०१३-१४ या वर्षानंतर आजतागायत, लैंगिक व्यवहारांवर उतरणार्‍या वैयक्तिक शिवीगाळीचा अनुभव मी घेतला आहे. माझ्या वयाला या मठ्ठ शिवीगाळीने काहीही फरक पडत नाही इतपत मी ज्येष्ठ वा वयोवृद्ध आहे. मी घाबरत नाही आणि त्या शिवीगाळीला कणभरही भीक घालत नाही. गप्प रहात नाही. राणा अय्यूब, बरखा दत्त, तिस्ता सेटलवाड, स्वाती चतुर्वेदीसारख्या तरुण, पण पेशाचे संरक्षक कवच काही प्रमाणात लाभलेल्या स्त्रियाही गप्प रहात नाहीत. पण सामान्य मतदार असलेल्या, किंवा राजकीय कार्यकर्त्या असलेल्या तरुण स्त्रियांनी जर एखादी ठाम विरोधी भूमिका घेतली तर त्यांना अशा प्रकारे शिवराळ ट्रोलिंग केले गेले तर त्या भेदरून जातील आणि गप्प रहातील याची या लोकांना खात्री असते. म्हणजेच स्त्रियांचे दमन करण्यासाठी भीतीचे शस्त्र आता भरबाजारात वापरले जात आहे.

मध्यंतरी काही नवीन काम करायला घ्यायचे म्हणून मी फेसबुक कमी करण्याचा मानस व्यक्त केला होता. तेव्हा एक गंमतीशीर पोस्ट फेसबुकवर माझ्या संदर्भात एका मठ्ठाने टाकली होती. त्यात मला नवर्‍याने बेदम मारले, माझा मुलगा आणि सून घर सोडून गेले, आडनाव बदलण्यासाठी त्यांनी अर्ज केला या गोष्टींना घाबरून मी फेसबुकवरून जाते आहे असे म्हटले होते. या पोस्टवर साजर्‍या गोजर्‍या नावांच्या काही महिलांनीही वाहवा केली होती पोस्टची. हे म्हणजे हसून लोटपोट करणारेच होते सारे… पण त्यात एक मुद्दा अधोरेखित झाला, की व्यक्त होणार्‍या विवेकी स्त्रीला थांबवण्यासाठी नवर्‍याचा मार हाच प्रभावी ठरतो यापलिकडे या मद्दड लोकांना काहीही सुचत नाही. याचेही कारण आहे, की अजूनही घराघरांत स्वतंत्र विचार करणार्‍या बाईमाणसांना विचार व्यक्त करण्यासाठी, ते कुठे कसे व्यक्त करावेत हे ठरवण्यासाठी नवर्‍याची वा घरातल्या इतर पुरुषांची अनुमती असावी लागते. नाहीतर मार पडण्याची शक्यता असते. किंवा मग घाणेरड्या शिव्या ऐकून घेण्याची शक्यता गृहीत धरून मागे सरावे लागेल असेही होऊ शकते.

समाज-माध्यमे घाण झाली आहेत असे अजिबात म्हणू नका. ती माध्यमे अखेर समाजाचे प्रतिबिंब दाखवतात. संघीभाजपाई असोत, काँग्रेसी वा उपकाँग्रेसी, वा आंबेडकरी असोत, भ्रष्टाचारी असोत वा भ्रष्टाचार विरोधाचं निशाण घेऊन एकत्र आलेले असोत. कुठल्याही छटेचे असोत, अनेक पुरुषांना स्त्रीबाबत बोलताना मर्यादा सोडायला काही वावगं वाटत नाही. पण या सर्वात अव्वल नंबर मिळवलाय तो स्वतःला हिंदुत्ववादी, मोदीवादी म्हणवून घेणार्‍या नीतीहीन भुतावळीतील शिवराळ पुरुषांनी. त्यांच्या पोस्ट्सवर लाईक देणार्‍या स्त्रिया एका झेंड्यासाठी निष्ठा दाखवायच्या नादात त्यांना फारसं टोकतही नाहीत. किंवा त्यांना अनफॉलोही करत नाहीत.आता नाखुआ, बग्गांसारख्या नामचीन शिवराळ ट्रोल्सना फॉलो करणारे महामहीमजी ज्यांचे हृदयस्वामी आहेत त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा तरी काय करणार.आपल्या महाराष्ट्रात अनेक चांगल्या चळवळी जन्म घेतात, वाढत जातात, तशीच एक चळवळ अलिकडेच मूळ धरू लागली आहे. आमच्या नवर्‍यांना दारू पाजणार्‍या कुठल्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मत देणार नाही अशी एक चळवळ काही स्त्रियांनी एकत्र येऊन सुरू केली आहे. कायद्याने वागा ही चळवळ प्रभावीपणे आणि नेटाने चालवणारे श्री. राज असरोंडकर यांनी याच धर्तीवर एका नवीन कृतीला सुरुवात केली आहे. ते म्हणतात ते इथे जसेच्या तसे दिलेच पाहिजे. कारण अशा विचारांच्या चळवळीमुळे आपला पितृसत्ताक शाब्दिक जुलुमांनी प्रदूषित झालेला सामाजिक अवकाश थोडा तरी स्वच्छ व्हायला मदत होईल.

असरोंडकर म्हणतात, इथे फेसबुकवर युवकांना एकमेकांना किंवा आपल्या विरोधकांना लुु वगैरे म्हणणं फार भूषणावह वाटतं. त्यात महिलाही सहभागी होताना दिसतात. विसंगती इथेच आहे. वास्तविक, लुु वगैरे शब्द केवळ शिवराळ नाहीत, तर ते पुरूषप्रधान समाजव्यवस्थेचे प्रतीकही आहेत, ज्या व्यवस्थेने इथे जातीवादापासून, स्त्रीचं दुय्यमत्व ते सामाजिक विषमतेपर्यंत अनेक समस्या जन्माला घातल्या. या व्यवस्थेला विरोध करणारीही अनेक तथाकथित सुधारणावादी मंडळी शिवराळपणात आघाडीवर दिसतात. जर संस्कृतीवाद्यासोबतच परिवर्तनवादी, सुधारणावादी, समतावादी, पुरोगामी, समाजवादी, आंबेडकरवादी आणि कोण कोण वादी मंडळी शिव्यांचा मुक्त वापर करत असतील तर त्या लाटेवर सत्तेने उन्मत्त झालेले लोक स्वार न होतील तरच नवल. यात सुरूवात कोण करतं, असाही प्रश्न उपस्थित केला जाईल, पण स्पष्ट सांगायचं तर ज्यांचं नातं संविधानिक विचारांशी आहे, शिव्या टाळण्याची जबाबदारी त्यांचीच पहिली आहे.फिरून या शिवराळ वादविवादांचा मोठा फटका महिलांनाच पडतोय. महिलांना समाजमाध्यमात व्यक्त होणं मुश्कील झालंय. त्यातही सत्तेच्या विरोधात लिहिणं तर जोखमीचं झालं. रखेल, रांड, माझ्याकडे पाठवा, घ्या हिला, चढा, रेट काय, तासाला एवढे पण कोणी देणार नाही, ही भाषा उघडपणे सर्रासपणे वापरली जातेय. प्रत्युत्तरातले लोकही तुझी आई पाठव, बहीण पाठव अशी आव्हानात्मक भाषा वापरताना दिसतात. या दोन्ही बाजूंच्या प्रवृत्तींविरोधात आपण निवडणुकीच्या बहाण्याने मोठी मोहीम उघडली पाहिजे.

अशा प्रतिक्रिया आपल्या स्वत: बाबतीत असो वा नसो, रिपोर्ट करा. आपले सरकार, ईमेलमार्फत पोलिसांना कळवा. शक्य झाल्यास थेट पोलीस तक्रार करा, न्यायालयात खाजगी केस दाखल करा.आक्षेपार्ह प्रतिक्रियांचा स्क्रीनशॉट घ्या, तो ती प्रतिक्रिया देणार्‍या व्यक्तिच्या कुटुंबातील, नात्यातील सदस्यांना मेसेंजरवर पाठवा आणि आपण या भाषेशी सहमत आहात का म्हणून विचारा. तिथे कोणतीही चर्चा करू नका किंवा वाद घालू नका. हीच गोष्ट दोघांच्या मित्रयादीतील सामाईक मित्रांबाबत करा. संबंधित पोस्टवर शिवराळपणाला विरोध करण्याचा आग्रह सामाईक मित्रमंडळींना करा. त्यांनी प्रतिसाद न दिल्यास मित्रयादीतून डच्चू द्या.हे लगेचचे उपाय नाहीत, पण दबावतंत्रं आहेत.मी आपणा सर्व वाचकांना याचा गांभीर्याने विचार करायची विनंती करते.आणि शिव्यांना आणि शिव्या देणार्‍यांना घाबरायचं नाही हे तर आपलं ठरलेलंच आहे.

First Published on: March 31, 2019 4:47 AM
Exit mobile version